तृप्ती राणे
सुबत्ता हा शब्द ऐकला की मनाला दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात – समृद्धी आणि समाधान! आपण एखाद्याला जेव्हा तुझी/तुमची समृद्धी होवो असं म्हणतो तेव्हा त्या मागे असते ती कधीही न आटणारी संपत्ती लाभावी ही भावना! आणि समाधान म्हणजे मला जे हवं आहे, जेव्हा हवं आहे ते माझ्याकडे नेहमीच सहजासहजी असतं आणि मला माझ्या इच्छा (वाजवी!) पुरवता येतात. ही परिस्थिती जेव्हा आपल्याकडे तयार होते तेव्हा आपोआपच मनातली साशंकता, संकोच, चिंता कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि त्याचबरोबर धीटपणे निर्णय घेण्याची व जास्त जोखीम घ्यायची क्षमता वाढते. तेव्हा सुबत्ता म्हणजे नुसता भरपूर पैसा किंवा प्रॉपर्टी असणं नाही, तर त्यातून जाणवणारी चिरंतन समृद्धी आणि समाधान. इथे आपण गरजांच्या पलीकडे जातो आणि कमावलेल्या इस्टेटीचा पुरेपूर आनंद घेतो.
नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्यातील अनेक जण नवीन धोरणं आखतात. अपेक्षा असते ती एखादा चांगला बदल स्वतःमध्ये आणण्याची जेणेकरून आयुष्य अजून चांगल्या पद्धतीने जगता येईल, नवी आव्हाने स्वीकारता येतील, नव्या आकांक्षांना पंख देता येतील, आपल्या आयुष्याचं चीज झाल्यासारखं वाटेल! तेव्हा या वर्षांमध्ये पुढचं पाऊल टाकताना मला असं वाटलं की, का नाही सुबत्तेचं धोरण मनावर घ्यावं? आपण मुलांना सांगतो की भरपूर शिका आणि मोठे व्हा, पुढे चांगल्या पगाराची नोकरी करा, चांगल्या पद्धतीने व्यवसाय करा आणि भरपूर संपत्ती गोळा करा! तर मग मोठ्या झालेल्यांनी या वर्षी आर्थिक सुबत्तेचा विचार आणि त्यानुसार कृती करायला काहीच हरकत नसावी, बरोबर ना?
सुबत्ता मिळवण्यासाठी पहिली तयारी करायची ती मनाची – सुबत्ता ही सर्वांसाठीच असते, फक्त ती मिळवणं आणि सांभाळणं हे मात्र कौशल्याचं काम असतं! आपल्या आजूबाजूला आपण अशा व्यक्ती पाहिलेल्या आहेत ज्यांना पैसे किंवा प्रॉपर्टी सहजासहजी मिळते परंतु त्यातून त्यांची समृद्धी होत नाही. किंवा कधी कधी तर मिळालेलं सगळंच जातं. जरी यात आपण काही दोष आपल्या नशिबाला दिला, तरीसुद्धा नशीब बदलायची ताकद हेसुद्धा आपल्याकडेच असते हे मात्र नक्की. तेव्हा सद्य:परिस्थिती कशीही असोत, आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी आपण आपल्या मनाचा टॉवर योग्य फ्रीक्वेन्सीला ट्यून करूया आणि सुबत्ता मिळवायचं ध्येय निश्चित करून घेऊया.
तुम्हाला कदाचित हा प्रश्न पडला असेल की मी आर्थिक स्तंभामध्ये सुबत्तेचं पारायण का बरं सुरू केलंय? आर्थिक नियोजन किंवा गुंतवणुकीबद्दल का सांगत नाहीये? हे वाटणं अगदी साहजिक आहे, कारण आर्थिक विश्व हे थेट आकड्यांकडे बोट दाखवतं. रक्कम, परतावा आणि वेळ – या आकड्यांच्या पुढे काहीच नसतं. पण इथे एक बाब वाचकांनी नक्की लक्षात घ्यावी की नियोजन, गुंतवणूक, पोर्टफोलिओ हे सगळे सुबत्तेच्या मार्गावरचे टप्पे आहेत, हे गंतव्यस्थान नाही! तेव्हा सर्वप्रथम ध्यास कशाचा हवा हे निश्चित करूया कारण त्यानुसार कृती असेल.
सुबत्तेकड़े मोर्चा वळवण्यामागे एक अजून महत्त्वाचं कारण आहे. करोनामुळे जगातील सर्वच बँकांनी हात ढिले सोडले आणि पैसे छापून लोकांच्या हातात दिले. व्याजदर कमीत कमी (काही ठिकाणी तर शून्य किंवा त्याहीपेक्षा कमी) झाल्याने भरपूर कर्ज घेतली गेली आणि त्याचीच परिणती झाली ती शेअर बाजाराच्या उसळीमध्ये! भरपूर प्रमाणात गुंतवणूक आणि परतावे हे आपण मार्च २०२० ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत पहिले. आणि त्यांनतर रशिया-युक्रेन युद्ध, महागाई, पुरवठा साखळीतील व्यत्यय, बिघडलेली जागतिक भू-राजकीय समीकरणे, वाढणारे व्याजदर हे सगळे पचवत आणि हेलकावे खात भारतीय बाजाराने नवीन उच्चांक १ डिसेंबर २०२२ ला नोंदविला! परंतु ऑक्टोबर २०२१ चा उच्चांकापर्यंतचा प्रवास हा डिसेंबर २०२२ पर्यंतच्या प्रवासाच्या तुलनेत वेगळा होता! खालील आलेखातून तुमच्या लक्षात येईल की पहिला प्रवास एकाच दिशेकडे होता, तर दुसऱ्या प्रवासात अनेक स्पीड ब्रेकर लागले. वार्षिक परतावा बघायचा तर निफ्टी ५० ने ५ टक्के परतावा दिला, परंतु तोसुद्धा जून २०२२ मध्ये चांगलीच खालची (-१०.५ टक्के) पातळी गाठल्यानंतर!
तर येणाऱ्या काळामध्ये गुंतवणुकीतून परतावे सहजासहजी मिळणार नाहीत असं काहीसं चित्र आत्ता तरी दिसतंय. महागाई समूळ नष्ट होणार नाही, जागतिक अस्थिरता राहणार आहे, प्रगत अर्थव्यवस्थांना महागाई आणि विकास दर दोन्हीही सांभाळताना नाकी नऊ येणार आहे, रशिया-युक्रेन युद्धामुळे जे काही घडलं आहे त्याचे पडसाद हे सर्वच अर्थव्यवस्थांना जाणवणार आहेत. आपल्याकडे भारतातसुद्धा या सर्व गोष्टींचा परिणाम तर दिसणारच. तरीसुद्धा वाचनात आलेल्या बातम्यांनुसार आणि काही महत्त्वाच्या संस्थानांच्या आढाव्यांनुसार आपली अर्थव्यवस्था ही येत्या पाच-१० वर्षांसाठी गुंतवणूकदारांसाठी अतिशय आकर्षक आहे. आपल्या बाबतीत लोकसंख्येतील तरुणांचं प्रमाण, वाढणाऱ्या आकांक्षा, जलद शहरीकरण, पायाभूत सुविधांमधील प्रगती आणि वाढती मिळकत हे सर्व मुद्दे आपल्या अर्थव्यवस्थेला प्रगतीपथावर नेण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यात जर सरकारी धोरणे व्यवस्थित राबवली गेली, देशाची कर्ज कमी झाली आणि उत्पादन क्षेत्राची प्रगती योग्य वेळी झाली तर येत्या काळात महासत्ता होण्यापासून आपल्या देशाला कोणीही थांबवू शकत नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. परंतु वाट सरळ आणि सोपी नसून वळणावळणाची असणार आहे. गाडीचा प्रवास हा ‘योग्य वेळी ब्रेक आणि योग्य वेळी वेग’ धोरण राबवून करावा लागणार आहे. शेवटी गाडी वेळेवर आणि प्रवासी सुस्थितीत पोहोचणं दोन्हीही तेवढंच महत्वाचं नाही का?
म्हणूनच या वर्षी नुसती गुंतवणूक न करता सुबत्तेचा ध्यास घ्यायचा आहे. या वर्षी माझ्या लेखनाचा रोख हा जितका गुंतवणूक आणि परताव्यांवर असणार तितकाच तो निरनिराळे गुंतवणूक पर्याय, पोर्टफोलिओची बांधणी, ॲक्टिव्ह पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि सर्वात मुख्य – जोखीम व्यवस्थापनाकडे असेल. अधूनमधून आपण महत्त्वाच्या जागतिक आणि देशांतर्गत घटना ज्यांचा परिणाम आपल्या सुबत्तेवर होऊ शकतो, यांचा आढावा घेणार आहोत. वयाच्या आणि मानसिकतेच्या आधारावर निरनिराळे पोर्टफोलिओ, त्यांची जोखीम आणि व्यवस्थापन हेसुद्धा आपण नवीन पद्धतीने जाणून घेणार आहोत.
तर मग चला, सुबत्तेचा आनंद मिळवण्यासाठी सज्ज होऊया! सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!
लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार
trupti_vrane@yahoo.com