उद्योग- व्यवसायाचे उत्पन्न
प्राप्तिकर कायद्यानुसार ‘उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न’ (बिजनेस आणि प्रोफेशन) हा उत्पन्नाचा एक स्त्रोत आहे. ‘उद्योग’ या संज्ञेमध्ये कोणताही व्यापार, वाणिज्य किंवा उत्पादन वगैरेचा समावेश होतो. उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टीने श्रम आणि कौशल्य वापरून पद्धतशीरपणे आणि सातत्याने केलेला प्रयास म्हणजे उद्योग. ‘व्यवसाय’ या संज्ञेमध्ये बौद्धिक कौशल्याचा समावेश होतो. यामध्ये ‘ठराविक व्यवसाया’चा (यामध्ये डॉक्टर्स, वास्तुविशारद, वकील, सीए, इंजिनिअर, अंतर्गत सजावटकार, चित्रपट कलाकार आदी) समावेश होतो. जे करदाते उद्योग-व्यवसाय करतात त्यांना प्राप्तिकर कायद्यानुसार अनुपालनाच्या काही अतिरिक्त तरतुदींचे पालन करावे लागते. यामध्ये लेखे ठेवणे, लेखापरीक्षण करून घेणे, उद्गम कर (टीडीएस) कापून तो सरकारकडे जमा करणे आदींचा समावेश होतो. अर्थात यासाठी कायद्यात ठराविक उलाढालीची मर्यादा आहे, सर्वांनाच हे लागू होते असे नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : Money Mantra : मार्ग सुबत्तेचा : गुंतवणुकीचा भक्कम पर्याय : स्थावर मालमत्ता

शेअर्स, सिक्युरिटीज, डिबेंचर वगैरेचे व्यवहार करतात त्या करदात्यांना तो त्यांचा ‘व्यापार’ आहे की ‘गुंतवणूक’ हे ठरवावे लागते. यावर त्याच्या नफा किंवा तोट्याची करपात्रता अवलंबून असते. असे व्यवहार ‘व्यापार’ समजल्यास त्याचे उत्पन्न ‘उद्योग व्यवसायाचे उत्पन्न’ असते आणि ‘गुंतवणूक’ म्हणून समजल्यास ‘भांडवली नफा’. उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नावर करदात्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागतो (करदात्याचे उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास ३०% पेक्षा जास्त) आणि गुंतवणुकीवर झालेल्या भांडवली नफ्यावर अल्पमुदतीसाठी १५% आणि दीर्घमुदतीसाठी १०% (१ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर) इतक्या सवलतीच्या दराने कर भरता येतो. जे करदाते शेअरबाजारात नियमित व्यवहार करतात त्यांना आपले व्यवहार ‘व्यापार’ आहे की ‘गुंतवणूक’ हे ठरविण्याची मुभा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिलेली आहे. जे करदाते शेअरबाजारात ‘फ्यूचर्स आणि ऑपशन्स’चे व्यवहार करतात त्याचे उत्पन्न हे ‘उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न’ म्हणूनच गणले जाते.

आणखी वाचा : Money Mantra: प्राप्तिकर जुनी व नवीन करप्रणाली – फरक काय ? अपवाद कोण? (भाग दुसरा)

भांडवली नफ्याचे उत्पन्न

कोणत्याही संपत्तीची विक्री केल्यानंतर होणारा नफा हा ‘भांडवली नफा’ या उत्पन्नाच्या स्त्रोतात गणला जातो. प्राप्तिकर कायद्यात संपत्तीची व्याख्या दिलेली आहे. सोने, घर, जमीन, प्लॉट, दुकान, समभाग, वगैरे संपत्तीची उदाहरणे आहेत. ज्या व्यक्ती खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी विक्रीवर होणारा नफा हा ‘धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नात’ गणला जातो. उदा. ज्या व्यक्ती सोन्याचांदीचा व्यापार करतात त्यांच्यासाठी सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीवर होणारा नफा हे धंदा-व्यवसायाचे उत्पन्न आहे. इतर व्यक्तींसाठी याच्या विक्रीवर होणारा नफा हा भांडवली नफा आहे. संपत्तीच्या प्रकारानुसार आणि त्याच्या धारण काळानुसार त्याची करपात्रता ठरते.

आणखी वाचा : Money Mantra: प्राप्तिकर कायद्यानुसार उत्पन्नाचे प्रकार किती? (भाग पहिला)

संपत्ती कोणत्या प्रकारची आहे यावर भांडवली नफा अवलंबून असतो. प्राप्तिकर कायद्यात भांडवली नफ्यासाठी ‘संपत्ती’ ची व्याख्या दिलेली आहे. यानुसार संपत्ती म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. संपत्तीच्या व्याख्येत सर्व प्रकारच्या संपत्तीचा समावेश होतो परंतु यामध्ये व्यापारातील साठा, ग्रामीण भागातील शेत जमीन, सोने रोखे (गोल्ड बॉण्ड), वैयक्तिक वस्तू यांचा समावेश होत नाही. वैयक्तिक वस्तूंमध्ये कपडे, भांडी, गाडी, फर्निचर, इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. म्हणजे या वस्तूंच्या विक्रीवर होणारा नफा हा करपात्र भांडवली नफा म्हणून गणला जात नाही. परंतु काही वैयक्तिक वस्तू मात्र यातून वगळण्यात आल्या आहेत. यामध्ये सोने-चांदी पासून तयार केलेले दागिने, शिल्पे, चित्रे, पुरातत्व वस्तूंचा संग्रह वगैरेंचा समावेश आहे. म्हणजेच सोन्याचे दागिने जरी वैयक्तिक वस्तू असली तरी त्याच्या विक्रीवर होणारा नफा हा करपात्र भांडवली नफा म्हणून गणला जातो.

भांडवली नफ्यावरील करपात्रता त्याच्या धारणकाळावर अवलंबून असते. या धारणकाळानुसार भांडवली नफा हा अल्प मुदतीचा आहे किंवा दीर्घमुदतीचा आहे हे ठरते.

इतर उत्पन्न : जे उत्पन्न वरील कोणत्याही स्त्रोतात विभागले जाऊ शकत नाही ते इतर उत्पन्नात गणले जाते. लाभांश, व्याजाचे उत्पन्न, जमिनीचे भाडे इतर उत्पन्नाची उदाहरणे आहेत. यामध्ये संपत्ती “वाजवी बाजार मूल्यापेक्षा” कमी किमतीत खरेदी केल्यास फरकाची रक्कम खरेदी करणाऱ्याच्या उत्पन्नात गणली जाते. प्रत्येक प्रकारच्या उत्पन्नासाठी वजावटी आणि करआकारणी वेगवेगळी असल्यामुळे करदात्याने उत्पन्न योग्य उत्पन्नाच्या स्त्रोतात गणणे गरजेचे आहे.
पुढील लेखात नवीन करप्रणाली आणि जुनी करप्रणाली काय आहे, कोणती करप्रणाली करदात्याला फायदेशीर आहे किंवा नाही हे कसे ठरवावे याविषयी माहिती घेऊ.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra according to income tax rules total how many types of income comes under this rules mmdc vp 70