‘ममाअर्थ’ अर्थात होनासा कन्झ्युमर लिमिटेड या कंपनीचा पब्लिक इश्यू आजपासून गुंतवणूकदारांसाठी खुला असणार आहे. एकूण ३६५ कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी कंपनी उपलब्ध करून देणार आहे तर, कंपनीचे सध्याचे प्रमोटर, गुंतवणूकदार आणि अन्य शेअरहोल्डर्स आपापला हिस्सा विकून सुमारे चार कोटी इक्विटी शेअर्स आयपीओ मधून बाजारात आणणार आहे. सध्याचा कंपनीचा बाजारातील हिस्सा आणि विक्रीचे आकडे बघितल्यास कंपनीचे बाजारातील मूल्य साधारणपणे साडेदहा हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. वरुण अलघ आणि गझल अलघ यांच्यासहित मेरीको कंपनीचे हरीश मारीवाला बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी या आयपीओ मध्ये स्वतःचे शेअर्स विकणार आहे असे कंपनीने स्पष्ट केले आहे. वरुण अलघ आणि गझल अलघ या दांपत्याने सात वर्षांपूर्वी दिल्ली जवळील गुरुग्राम येथे या ब्रँडची सुरुवात केली. ममाअर्थ बरोबरच he Derma Co., Aqualogica, Dr Sheth’s, Ayuga, BBLUNT हे ब्रँड कंपनीतर्फे विकले जातात.
महत्त्वाच्या तारखा
३१ ऑक्टोबरला गुंतवणूकदारांना आपले शेअर्स नोंदवता येतील, ही मुदत दोन नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. शेअर्ससाठी मागणी नोंदवताना ३०८ ते ३२४ रुपये प्रति शेअर या किंमतीत मागणी नोंदवता येईल.
आयपीओचा आकार
याच कंपनीच्या अंतर्गत एकूण सहा ब्रँड कार्यरत आहेत. जर आपण असे गृहीत धरले की गुंतवणूकदार ३२४ प्रति शेअर या किमतीला मागणी नोंदवणार आहेत, तर या पब्लिक इश्यू मधून कंपनीला १७०० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. या पब्लिक इश्यूमधील एक कोटी शेअर्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहेत. त्यांना प्रति शेअर ३० रुपये सूट मिळणार आहे.
कंपनीच्या व्यवसायाविषयी
आर्थिक वर्ष २०२२-२३ चा विचार करायचा झाल्यास हा ब्रँड भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणारा ब्रँड ठरला. स्थापनेपासून अवघ्या सहा वर्षातच कंपनीचा व्यवसाय १००० कोटी रुपयांच्या वर गेला आहे. लहान बालकांसाठी, स्त्रियांसाठी सौंदर्यप्रसाधने, चेहऱ्याला – शरीराला व केसांना लावण्याची सौंदर्यप्रसाधने सुगंधी द्रव्य या सर्व व्यवसायामध्ये कंपनी कार्यरत आहे. कंपनीचा व्यवसाय ई-कॉमर्स या माध्यमातून जोरदार होतोच यात दरवर्षी २% ची वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षांचा विचार करायचा झाल्यास कंपनीचा एकूण व्यवसाय आणि विक्री सलग वाढताना दिसते आहे.
पब्लिक इश्यू मागील उद्देश
कंपनी सौंदर्य प्रसाधने क्षेत्रात कार्यरत आहे व या पब्लिक इश्यूमधून मिळालेला पैसा मुख्यत्वे कंपनीचा चेहरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा आणि कंपनीचे बाजारातील प्रतिमा निर्मितीचे उद्देश सफल व्हावेत यासाठी वापरला जाणार आहे. जाहिरात आणि जनसंपर्क याद्वारे निवडक ग्राहकांपर्यंत असलेली कंपनीची ओळख पूर्ण भारतभर आणि सर्व ग्राहक वर्गामध्ये पोहोचावी हा कंपनीचा उद्देश आहे व यासाठी १८२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कंपनीला स्वतःची दालने सुरू करायची आहेत व यासाठी २० कोटी रुपये बाजूला काढण्यात आले आहेत. फक्त सौंदर्यप्रसाधने न विकता भविष्यात कंपनीला ब्युटी सलून व्यवसायामध्ये उतरायचे आहे. यासाठी २६ कोटी रुपये एका उपकंपनीमध्ये गुंतवण्यात येतील.
एका वेळेला किती शेअर्स घेता येतील ?
आयपीओ मध्ये एका वेळी ४६ शेअर्स विकत घेण्यासाठी बोली लावता येईल व जास्तीत जास्त ५९८ शेअर्स विकत घेता येतील. कंपनीने १५ टक्के शेअर्स हाय नेटवर्थ गुंतवणूकदार आणि दहा टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी बाजूला काढले आहेत/ राखीव ठेवले आहेत.
कंपनीच्या संदर्भातील जोखीम
· कंपनीच्या सर्व उत्पादनांपैकी स्वतः तयार केलेली उत्पादने कोणतीच नसल्याने दुसऱ्यांनी तयार केलेल्या उत्पादनांवर कंपनीचा व्यवसाय अवलंबून आहे.
· कंपनीच्या एकूण उत्पादनांपैकी फक्त दहा उत्पादनांमधून जवळपास ३० टक्के विक्री नोंदवली जाते.
· भविष्यात जे नवीन ब्रँड बाजारात आणायचे ठरवणार आहे ते ब्रँड ग्राहकांकडून नापासंत केले गेले तर त्याचा थेट परिणाम कंपनीच्या नफ्यावर होऊ शकतो.
· गेल्या सहा वर्षाचा नफ्या-तोट्याचा आकडा बघितल्यास कंपनीने ‘निगेटिव्ह कॅश फ्लो’ म्हणजेच जेवढे पैसे मिळाले त्यापेक्षा जास्त खर्च केले अशी परिस्थिती सुद्धा अनुभवलेली आहे.
· कंपनी बाजारपेठेतील अग्रगण्य कंपनी असली तरीही अजूनही सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत ती पोहोचलेली नाही, अस्तित्वात असलेल्या ब्रँड पासून कंपनीला असणारा धोका कायम आहे.
अंदाजे ९ नोव्हेंबर पर्यंत गुंतवणूकदारांच्या डिमॅट अकाउंट मध्ये त्यांना मिळालेले शेअर्स जमा होतील व १० नोव्हेंबर रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये अधिकृतपणे ट्रेडिंग सुरू होईल.
कोटक महिंद्रा कॅपिटल, सिटी ग्रुप, जे एम फायनान्शियल, जेपी मॉर्गन इंडिया हे या कंपनीच्या आयपीओ साठी प्रमुख सल्लागार असणार आहेत.
या लेखांमध्ये कंपनीच्या पब्लिक इश्यूविषयी माहिती देताना गुंतवणूकदारांना पब्लिक इश्यू मध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला देण्याचा हेतू नाही. गुंतवणूकदारांनी कंपनीने प्रसिद्ध केलेले रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस आणि जोखीम विषयक माहिती पत्रक वाचून आपल्या गुंतवणूकदाराच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करावी.