‘डी मार्ट’ या कंपनीतर्फे चालवल्या जाणाऱ्या स्टोअर्समध्ये एफएमसीजी, अखाद्य, वस्त्र प्रावरणे, धान्य, दूध आणि दुग्धजन्य उत्पादने, फळे, भाज्या, गृहपयोगी वस्तू आणि घरातील लागणाऱ्या वस्तू, चपला, खेळणी, लहान मुलांचे कपडे आणि दैनंदिन वापरातील वस्तू विकल्या जातात. 2002 मध्ये पहिले दालन या कंपनीतर्फे सुरू करण्यात आले आणि आजमितीस महाराष्ट्र, गुजरात, दमण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगण, तामिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, एनसीआर, चंदिगड आणि पंजाब या ठिकाणी मिळून १४ दशलक्ष स्क्वेअर फुट एवढ्या क्षमतेचे व्यवसाय क्षेत्र आहे.
यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत एकूण १७ नवीन दुकाने कंपनीतर्फे सुरू करण्यात आली. EBITDA मार्जिन मध्ये वार्षिक १५% ची वाढ नोंदवण्यात आली. तर करोत्तर नफा १४.९% नी वाढलेला दिसला.
हेही वाचा…प्राप्तिकर कायद्याचे कलम ८० सी खूप महत्त्वाचे, तुम्हाला कसा मिळणार फायदा?
आपल्या वेगळ्या व्यवसाय शैलीने रिटेल बाजारात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या राधाकृष्ण दमानी यांच्या ‘डी-मार्ट’ ह्या नावाने साखळी दुकाने चालवणाऱ्या अव्हेन्यू सुपर मार्ट या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे आकडे समाधानकारक आले आहेत. कंपनीची विक्री १७ टक्क्यांनी वाढून ११,५६९ कोटी इतकी होती. कंपनीचा नफा मागच्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत १४.९% वाढून ६४१ कोटी रुपयांवर स्थिरावला. कंपनीची भारतभरातील एकूण दालने आता ३४१ वर पोहोचली आहेत.
२०२३-२४ या आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाही मध्ये भारतात एकूणच सगळ्या एफएमसीजी कंपन्यांचा विक्रीचा आकडा वाढता राहिला होता. यामध्ये ग्रामीण बाजारपेठेचा वाटा कमी आणि शहरी बाजारपेठेचा वाटा अर्थातच अधिक राहिला. या उलट तिसऱ्या तिमाहीत उत्पादन खर्च वाढल्याने नफ्याचे प्रमाण घटलेले दिसले. ग्रामीण बाजारातील कमी झालेला उत्साह, कृषी क्षेत्रातील घटलेले उत्पन्न, जाहिरातीवरील वाढलेला खर्च या तुलनेत तितकेच राहिलेले विक्रीचे आकडे सर्वच कंपन्यांसाठी आव्हानात्मक आहेत. डिसेंबर अखेरीस महागाईच्या दरात घट झालेली असली तरीही त्याचे प्रत्यक्ष बाजारातील परिणाम दिसण्यास अजून कालावधी लागणार आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर हा तीन महिन्याचा कालावधी सणासुदीचा मानला जात असला तरीही एफएमसीजी वगळता अन्य वस्तूंच्या विक्रीमध्ये म्हणावा तसा उत्साह दिसला नाही. एफएमसीजी मध्ये खाद्यतेलाच्या वाढत्या भावामुळे नफ्यावर थोडेसे बंधन आले.
‘आमच्या कंपनीने तिसऱ्या तिमाही अखेरीस मागील वर्षाच्या तुलनेत १७ टक्के वाढ नोंदवत चांगला व्यवसाय केला आहे. नित्य वापरातील वस्तू आणि वस्त्र प्रावरणे यांची विक्री आता स्थिर होते आहे आणि दिवाळीनंतरच्या काळात विक्री अशीच राहण्याची शक्यता आहे. यावर्षीच्या सणासुदीच्या निमित्ताने जेवढी विक्री होणे अपेक्षित होते त्यापेक्षा कमी विक्री नोंदवली गेली. विशेषतः एफएमसीजी वगळता अन्य क्षेत्रामध्ये हा बदल झालेला दिसला याचे प्रमुख कारण महागाई हेच आहे’, असं मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नेविल नरोना यांनी सांगितलं.
मुख्य शहरांबरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील शहरांमध्ये सुरू झालेल्या ‘डी-मार्ट’ च्या नवीन दुकानांमुळे येत्या काही महिन्यात व्यवसायामध्ये वाढ झालेली दिसेल असे कंपनीचे म्हणणे आहे. नित्य वापरातील वस्तू विकत घेण्यासाठी कंपनीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म चा वापर वाढताना दिसत आहे.
हेही वाचा…विचारल्याविण हेतू कळावा: उमदा मल्टीकॅप
निकालाची ठळक वैशिष्ट्ये
· एकूण विक्रीमध्ये वार्षिक १७ टक्के वाढ होऊन १३२४७ कोटी
· प्रतिशेअर मूल्य (Earning per Share) तिसऱ्या तिमाहीसाठी ११.३२ रुपये; मागच्या वर्षीच्या याच तिमाहीतील ९.९० पेक्षा वाढलेले दिसले.
· तिसऱ्या तिमाहीत पाच नवी दालने सुरू करण्यात आली.