गेल्या काही दिवसांपासून पोस्ट ऑफिसमधील योजनांकडे सर्वसामान्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पोस्टातील योजनाही गुंतवणुकीत चांगला परतावा देत असून, सुरक्षाही प्रदान करतात. पोस्ट ऑफिसद्वारे ऑफर केलेल्या पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्येही तुम्ही ठराविक रक्कम गुंतवून दरमहा निश्चित व्याज मिळवू शकता. तुम्ही जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेत गुंतवणूक करू शकता.
ही योजना काय आहे?
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी लहान बचत योजना आहे, जी गुंतवणूकदारांना दरमहा निश्चित रक्कम बाजूला ठेवून त्यात गुंतवणूक करण्याची संधी देते. या रकमेवर व्याज जोडले जाते आणि दर महिन्याला गुंतवणूकदारांना दिले जाते. या योजनेची पात्रता काय आहे, व्याजदर काय आहेत आणि फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.
हेही वाचाः टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याच्या दरानं डोळ्यांत आणले अश्रू, घाऊक बाजारात आठवड्याभरात ३० टक्क्यांची वाढ
पात्रता काय आहे?
जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही भारताचे रहिवासी असणे अनिवार्य आहे. तुम्ही एनआरआय असाल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकत नाही. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय १० वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
हेही वाचाः फेड रिझर्व्हच्या विधानानंतर जागतिक बाजारात घसरण, सेन्सेक्स-निफ्टीही कोसळले, नेस्लेचे शेअर्स वधारले
तुम्ही किती गुंतवणूक करू शकता?
या योजनेत तुम्ही एकल खातेधारक असल्यास किमान १००० आणि जास्तीत जास्त ९ लाख गुंतवू शकता. जर तुम्ही संयुक्त खाते उघडले (जास्तीत जास्त ३ सदस्य), तर तुम्ही किमान १००० आणि जास्तीत जास्त १५ लाख गुंतवू शकता.
व्याजदर किती आहे?
सरकार तुम्हाला १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत मासिक उत्पन्न योजनेवर वार्षिक ७.४ टक्के व्याज देते.
अटी आणि शर्थी काय आहेत?
- हे पोस्ट ऑफिस खाते ५ वर्षांनी परिपक्व होते.
- ठेवीच्या तारखेपासून १ वर्षाची मुदत संपण्यापूर्वी तुम्ही कोणतीही ठेव रक्कम काढू शकत नाही.
- खाते उघडण्याच्या तारखेपासून १ वर्षानंतर आणि ३ वर्षांपूर्वी खाते बंद केल्यास मूळ रकमेतून २ टक्के इतकी रक्कम वजा केली जाते आणि उर्वरित रक्कम दिली जाते.
- खाते उघडण्याच्या तारखेपासून ३ वर्षांनंतर आणि ५ वर्षांपूर्वी खाते बंद केल्यास मूळ रकमेतून १ टक्का इतकी रक्कम वजा केली जाते आणि उर्वरित रक्कम दिली जाते.
- तुम्हाला खाते बंद करायचे असल्यास संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह अर्ज जमा करून खाते मुदतपूर्व बंद करून घेता येते.
- तसेच खाते उघडण्याच्या तारखेपासून ५ वर्षांची मुदत संपल्यानंतर संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह अर्ज सादर करून खाते बंद केले जाऊ शकते.
- मॅच्युरिटीपूर्वी खातेधारकाचा मृत्यू झाल्यास खाते बंद केले जाऊ शकते आणि रक्कम नामनिर्देशित व्यक्ती/कायदेशीर वारसांना परत केली जाऊ शकते.