डॉ. दिलीप सातभाई
केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सार्वभौम सुवर्ण रोख्यांची विक्री दोन मालिकेत जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरहुकूम भारतीय रिझर्व्ह बँकेने या वर्षाच्या पहिल्या मालिकेत सुवर्ण रोख्यांची विक्री २३ जून २०२३ पर्यंत सुरू राहणार असे जाहीर केले आहे. दुसरी खरेदी मालिका ११ ते १५ सप्टेंबर २०२३ दरम्यान विक्रीसाठी खुली असेल. ही सरकारी योजना असल्याने सर्वाधिक सुरक्षित आणि अधिक चांगला परतावा देणारी व मूळ मूल्य देखील वाढवणारी आहे.
त्याचे हे विशेष-
१. अनुत्पादक गुंतवणूक उत्पादक कार्यासाठी : सोन्यातील गुंतवणूक अनुत्पादक मानली जाते. या उलट सदर गुंतवणुकीचे पैसे उत्पादक कारणासाठी वापरले गेले तर अर्थव्यवस्थेची व परिणामी देशाची प्रगती होवू शकते. देशात आयात होणारी अदमासे एक हजार टन सोन्याची आयात आपण कमी करू शकलो, तर देशकल्याण तर होईलच त्याखेरीज विदेशी चलनाचीदेखील बचत होईल. याला पर्याय म्हणून या रोख्यांची विक्री केली जात असून भौतिक सोने घेण्याऐवजी कागदोपत्री सोने खरेदी करण्याकरीता प्रोत्साहित केले जात आहे व त्यात स्वतःचे व देश हितही साधले जाणार असल्याने ते सर्वांच्या फायद्याचे ठरावे. गेल्या काही वर्षांत या योजनेमुळे सोन्याच्या आयातीत दहा टक्के घट झाली आहे, हे या योजनेचे यश मानायला हवे
२. आंतरराष्ट्रीय दबाव: आंतरराष्ट्रीय नाणे निधीने चीनचे युआन हे चलन आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी स्वीकृत केले होते त्यामुळे अमेरिकन डॉलर्सला स्पर्धा निर्माण झाली. त्यात चीनकडून उधारीवर घेतलेल्या मालाच्या बदल्यात अमेरिकेने बॉण्डस दिले; त्याची परतफेड आता सुरु होईल त्यामुळे डॉलर्सवर दबाव येऊ शकतो व त्यामुळे इतर चलनावर देखील त्या प्रमाणात दबाव येऊन रुपयाची किंमत कमी होऊन आयातीचा खर्च वाढेल व त्यामुळे सोन्याची किंमत वाढेल असा होरा आहे.
हेही वाचा… Money Mantra: सार्वभौम सुवर्ण रोखे कुठे मिळतील?
३. भांडवली नफ्यातून मुक्ती : प्राप्तीकर कायद्यानुसार विक्री केलेल्या सुवर्ण रोख्यांचा भांडवली नफा मुदतपूर्तीपश्चात करमुक्त करण्यात आला आहे व हा महत्वाचा फायदा ठरावा. जरी रोख्यांची मुदत आठ वर्षे असली तरी योग्य बाजारमूल्याचा फायदा घेण्यासाठी रोखीकरण करण्याचा पर्याय पाचव्या, सहाव्या, सातव्या वर्षानंतर उपलब्ध आहे तर आठव्या वर्षी रोखीकरण करणे क्रमप्राप्त आहे. सदर रोखे शेअर बाजारात नोंदणी होणार असल्याने गरजू लोकांना आवश्यकतेनुसार मुदतपूर्व रोखीकरण करणे शक्य होवू शकेल, अशीही व्यवस्था करण्यात आली आहे तर तीन वर्षावरील रोख्यावरील होणारा भांडवली नफ्याकरीता खरेदीमूल्य भाववाढ निर्देशांकाची निगडीत करण्याची सवलत देण्यात आली आहे.
४. कर्जासाठी तारण: ज्यावेळी गरज लागेल त्या वेळी हे सुवर्ण रोखे घेतलेल्या कर्जासाठी तारण म्हणून ठेवता येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. तात्पुरत्या आर्थिक टंचाईवर मात करण्यासाठी अशा रोख्यांचा मोठा उपयोग होवू शकतो हाही महत्वाचा फायदा ठरावा. कर्ज-ते-मूल्य (एलटीव्ही) गुणोत्तर कोणत्याही सामान्य सोने कर्जासाठी लागू होईल, कारण रिझर्व्ह बँकेने ते वेळोवेळी अनिवार्य केले आहे
५. व्याजाची सुविधा: आपण जेव्हा सोने विकत घेतो तेव्हा कालपरत्वे त्याचे फक्त भांडवली मूल्य कमी किंवा जास्त होते. त्यावर व्याज मिळत नाही. या योजनेत केंद्र सरकारने प्रती वर्षी २.५० टक्के दराने व्याज देण्याची तरतूद केली आहे व ती गेल्या टप्प्यातील विक्रीपेक्षा पाव टक्क्याने कमी आहे. कोणत्याही सराफाच्या अशा योजनेपेक्षा ही सरकारी योजना संपूर्ण भरवशाची आहे. या रोख्यांवर मिळणारे व्याज हे जरी प्राप्तीकर कायद्याअंतर्गत करपात्र असले तरी दर सहा महिन्यानंतर ते मिळणार असल्याने या गुंतवणुकीतील नियमित उत्पन्नाची रुची कायम राहू शकते. व्याजाखेरीज भांडवल वृद्धी हा या सुवर्ण रोख्याचा खास फायदा आहे.
हेही वाचा… Money Mantra: विमान उद्योग बाजारपेठेत गुंतवणूक करावी की, नाही?
६. दलालांची कसर वा कमिशन : म्युच्युअल फंड किंवा शेअर्स किंवा इटीएफ किंवा आयुर्विमा आदी प्रकारांत गुंतवणूक केली असता गुंतवणुकीकरिता नेमलेल्या मध्यस्थांना द्यावे लागणारे कमिशन प्रत्यक्षात गुंतवणूकदार देत नसला तरी अप्रत्यक्षरीत्या ते त्यालाच द्यावे लागते हे सर्वश्रुत आहे अशा खर्चिक कमिशनामुळे मूळ गुंतवणूक कमी होते. तथापि, सुवर्ण रोखे योजनेत याचा विचार होवून असे अप्रत्यक्ष कमिशन गुंतवणूकदारास द्यावे लागणार नाही याची काळजी घेतली आहे. तसेच हे रोखे पेपर फॉर्म मध्ये देखील मिळणार असल्याने डीमेट खाते ठेवण्याचा व त्याचे वार्षिक शुल्क भरण्याचा खर्चही वाचू शकतो. म्हणून गुंतवणूकीतील कोणताही भाग अनुत्पादक कारणांसाठी वापरला जाणार नाही, हा ही गुंतवणूकदाराच्या दृष्टीने महत्वाचा फायदा आहे. याच कारणास्तव मध्यंतरी अदमासे सहाशे कोटी रुपयांची सुवर्ण इटीएफ योजनेतील गुंतवणूक कमी झाली आहे हे या योजनेचे यश आहे
७. सवलतीच्या दरात विक्री : या टप्प्यातील सुवर्ण रोखे सोन्याच्या बाजार मूल्यापेक्षा प्रति ग्रॅम पन्नास रुपयांनी स्वस्त मिळणार असल्याने गुंतवणूकदाराची अधिक बचत होणार आहे व हेच या टप्प्यातील रोख्याचे आकर्षण ठरावे. दिवाळीत खरेदी होणाऱ्या भौतिक सोन्याच्या व्यवहारातील प्रत्यक्ष फायदा देशास व्हावा या हेतूने हा टप्पा घोषित करण्यात आला आहे.
८. रोख पैसे देवूनही खरेदी: सद्य कायद्यांतर्गत सुवर्ण रोखे प्रती व्यक्ती मागे वीस हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम देवून खरेदी करण्याची मुभा आहे, याचा फायदा गुंतवणूकदारास होवू शकतो. तथापि, या रक्कमेपेक्षा अधिक रक्कमेचे सुवर्ण रोखे खरेदी करावयाचे असल्यास धनादेश वा डिमांड ड्राफ्टद्वारे पैसे भरावे लागतील हे निश्चित.
९. रोख्यांवर अडीच टक्के दराने व्याज भौतिक सोने खरेदी केल्यास त्यावर व्याज मिळत नाही पण या रोख्यांवर अडीच टक्के दराने व्याज मिळणार असून ते करपात्र आहे.
हेही वाचा… Money Mantra: सेवानिवृत्तीनंतरचे नियोजन कसे कराल?
१०. सदर सुवर्ण रोखे आठ वर्षे मुदतीचे असून पाच वर्षानंतर बाहेर पडण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. तथापि, जर कमी कालावधीसाठी सोन्यात गुंतवणूक करावयाची असेल तर ‘गोल्ड इटीएफ; किंवा सुवर्ण बचत म्युच्युअल फंडात करण्याचे पर्याय निवडावे.
११. सुवर्ण रोखे कोठे व कसे मिळतील ? सुवर्ण रोखे सर्व शेड्युल्ड बँका, स्टॉक होल्डिंग कोर्पोरेशन ऑफ इंडिया, ठराविक निर्देशित पोस्ट ऑफिसेस, मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. हे रोखे गुंतवणूकदाराने ऑनलाइन किंवा डिजिटल पद्धतीने खरेदी करणे अपेक्षित आहे त्यामुळे चोरीची व सांभाळण्याची भीती नाही. या रोख्यांद्वारे भौतिक सोने मिळणार नसून त्या ऐवजी सोन्याच्या किंमतीचे पैसे मिळणार आहेत.
१२. पुढील रोखे यापुढे हे रोखे ११ ते ते १५ सप्टेंबर दरम्यान विक्रीस येणार आहेत त्यामुळे या वेळेस शक्य नसणाऱ्या गुंतवणूकदारांना आर्थिक नियोजनाद्वारे सुवर्ण रोख्यात गुंतवणूक करणे भविष्यात शक्य होणार आहे. मुला- बाळांच्यासाठी भावी आयुष्यासाठी लागणाऱ्या सोन्याच्या खरेदीचे उत्तम नियोजन करण्यासाठी ही सरकारी योजना असल्याने कोठेही फसले जाण्याची शक्यता नसल्याने उत्तम गुंतवणूक ठरावी.
१३. भावी नियोजन: भविष्यात विविध कारणास्तव कराव्या लागणाऱ्या सोन्याच्या खरेदीकरिता नियोजनात्मक आखणी या रोख्यांद्वारे करता येवू शकेल इतके हे मौल्यवान रोखे आहेत .भौतिक सोने सांभाळणे कठीण असते त्यासाठी लॉकेर्सची गरज व परिणामी लॉकेर्सचे भाडे हा खर्चाचा भारच होवू शकतो या खेरीज सोने चोरांपासून सांभाळणे ही देखील जोखीम आहे व या सर्व बाबी सुवर्ण रोख्यात गुंतवणूक केल्यास टाळता येतील व देशहित ही साधता येईल हे महत्वाचे!