प्रत्येक व्यक्तीला आपल्या गुंतवणुकीवर अधिकाधिक परतावा अपेक्षित असतो. त्याबरोबर आपली गुंतवणूक सुरक्षित असावी व आपल्याला गरज भासेल तेव्हा चटकन पैसे मिळावेत अशी अपेक्षा असते. शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीवर जेवढ्या अधिक परताव्याची अपेक्षा कराल, तेवढीच जोखीम देखील वाढत जाईल. मात्र यावर शेअर बाजारात ‘एफडी’ शेअर्सचा एक उत्तम पर्याय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेअर बाजारात दीर्घकालावधीत बहुतांश दिग्गज कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे. विशेषतः सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्या किंवा निफ्टी ५० मधील पहिल्या कंपन्यांची कामगिरी खूपच सरस राहिली आहे. या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना सरासरी १० ते १५ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. शिवाय यातील काही कंपन्यांनी विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो यांनी गुंतवणूकदारांना कायम लाभांश, समभाग पुर्नखरेदी किंवा बक्षीस समभागांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची मूळ गुंतवणूक कित्येक पटींनी वाढवली आहे. या अशा कंपन्यांचा समभागांना ‘एफडी’ शेअर्स म्हटले जाते.

हेही वाचा… SBI च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, डिजिलॉकरमध्ये वैयक्तिक कागदपत्रे सुरक्षित ठेवता येणार; ‘अशा प्रकारे’ तुम्हीही घेऊ शकता फायदा

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘इन्फोसिस’ने फेब्रुवारी १९९३ मध्ये प्रारंभिक समभाग विक्री केली. त्यावेळी कंपनीने ९५ रुपये प्रतिसमभागाप्रमाणे विक्री केली. नंतर बाजारात तो सूचिबद्ध होताना १४५ रुपयांवर व्यवहार सुरू केला. आता आपण शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीची ताकद काय असते ते बघूया. जर फेब्रुवारी १९९३ मध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने इन्फोसिसमध्ये १०,००० रुपयांची गुंतवणूक केली असती तर २५ वर्षांनंतर त्याने केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य २.५५ कोटी रुपये असते. म्हणजेच २५ वर्षात कितीतरी पट परतावा गुंतवणूकदाराला प्राप्त झाला असता. याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो, टीसीएसमध्ये दीर्घाकालावधीसाठी गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार आता कोट्यधीश झाले आहेत.

शेअर बाजारात गुंतवणूक करताना….

सामान्य मध्यमवर्गीय गुंतवणूकदार मुख्यत्वे बँकांमधील मुदत ठेव, सोने-चांदी, पोस्ट ऑफिसमधील योजना, स्थावर मालमत्ता यामध्ये गुंतवणूक करतो. आणि शेअरबाजार आणि म्युच्युअल फंडात अतिशय कमी गुंतवणूक करतो. मात्र गेल्या ३०-३५ वर्षांचा अभ्यास केल्यास, शेअर बाजारातून केलेल्या गुंतवणुकीवर सर्वाधिक १५-१६ टक्क्यांपर्यंत परतावा मिळाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र त्यासाठी गुंतवणूकदारांनी जागरूक आणि चौकस असण्याची व थोडी जोखीम पत्करण्याची गरज असते. ‘डायरेक्‍ट इक्विटी एसआयपी’मध्ये जोखीम बरीच कमी करता येऊ शकते; कारण येथे नियमितपणे प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम ठराविक समभागांमध्ये गुंतविली जाते. साधारण ३ ते ४ वर्षे सातत्याने गुंतवणूक केली तर उत्तम परतावा मिळू शकतो.

हेही वाचा… EPFO: १ लाख पगारावर ४७ हजारांहून अधिक पेन्शन मिळणार; ‘या’ तारखेपर्यंत निर्णय घेण्याची संधी

एकरकमी सर्व गुंतवणूक केली आणि मग बाजार कोसळला तर जोखीम तर वाढतेच शिवाय गुंतवणूकदाराचा शेअर बाजारावरील विश्वासच उडू शकतो. अगदी “सेन्सेक्‍स’ अथवा “निफ्टी’मधील उत्तम ट्रॅक रेकॉर्ड असणाऱ्या ४ ते ५ कंपन्यांचे शेअर नियमित घेतले तर कोणताही मानसिक ताण न घेता उत्तम फायदा होऊ शकतो. पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा शेअर बाजारातील गुंतवणूक “स्मार्ट’ प्रकारात मोडते. फक्त त्यासाठी जागरूकतेची गरज असते. तुमच्या आर्थिक सल्लागाराचा आणि स्वतः अभ्यास करून शेअर बाजारात आणि म्युच्युअल फंडात नियमित गुंतवणूक केल्यास त्याची सुमधुर फळे पुढील ४ ते ५ वर्षांमधे चाखायला मिळतील.

शेअर निवडताना

शेअर बाजारात एखाद्या कंपनीच्या समभागात गुंतवणुकीचा निर्णय घेताना त्या कंपनीची माहिती आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने कंपनीची आर्थिक स्थिती, भविष्यातल्या योजना, मालमत्ता व जबाबदाऱ्या, नवीन व्यवसाय उपक्रमांमध्ये गुंतवणूक आणि धोरणात्मक भागीदारी याबाबत माहिती घ्यावी.

  • कंपनीचा व्यवसाय कुठला आहे? कुठे आहे? कंपनीचे प्रवर्तक कोण आहेत? कंपनीचा व्यवसाय कुठे चालतो? कंपनीची भूतकाळातील आणि वर्तमानातील कामगिरी कशी आहे? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायला हवीत.
  • कंपनीच्या भविष्यातील योजना, आर्थिक स्थिती, त्यातील सातत्य पाहणे आवश्यक आहे.
  • त्या कंपनीची स्पर्धा कोणत्या कंपनीशी आहे? भविष्यात त्या कंपनीच्या वस्तूंना आणि सेवांना किती मागणी राहील? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायला हवीत.

(शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. त्यामुळे गुंतवणुकीचे निर्णय तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने घ्या. लेखात लेखकाने कोणत्याही कंपनीचा शेअर खरेदी करण्याबाबत सल्ला दिलेला नाही.)

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra do you have fd shares in your portfolio mmdc dvr
Show comments