सुधाकर कुलकर्णी
आजकालच्या तरुणाईला नोकरी/ व्यवसाय/ वैवाहिक जीवन सुरु करतानाच सगळ्या गोष्टी हव्या असतात.(उदाहरणार्थ घर, गाडी, मोठा टीव्ही , फ्रीज, एसी, महागडा मोबाईल ई.) याचे कारण बहुतेक मध्यमवर्गीयांच्या घरात या गोष्टी दिसून येतात. मात्र या आधीच्या पिढीने या वस्तू एकेक करून सुरुवातीच्या १०-१२ वर्षात आपल्या गरजेच्या प्राधान्यानुसार जमवलेल्या असतात हे आजच्या तरुणाईच्या लक्षात येत नाही.
आजकाल गरज आणि हौस यातील सीमारेषा धूसर होत चालली आहे. परिणामी हौस हीच गरज समजली जात आहे. विशेष म्हणजे अशा वस्तू खरेदी करण्यास बिगर वित्तीय संस्था (एनबीएफसी), क्रेडीट कार्ड देणाऱ्या बँका, खाजगी बँका सढळ हाताने सहजगत्या कर्ज देऊ करत आहेत. आपल्या उत्पादनाची विक्री व्हावी म्हणून उत्पादक कंपन्या बिगरवित्तीय संस्था (एनबीएफसी), क्रेडीट कार्ड देणाऱ्या बँका, यांच्या सहकार्याने झिरो इंटरेस्ट लोन यासारखे प्रलोभन ग्राहकास दाखवीत आहेत. परिणामी बऱ्याचदा ग्राहक आपल्याला आवश्यक नसलेली वस्तू सुद्धा विकत घेतो.
खरे तर आपल्याकडील असलेला पैसा हा आपल्या प्राथमिक गरजांसाठी वापरणे आवश्यक असते आणि उरलेल्या पैशाची बचत करून त्यातून आपल्या हौसेची वस्तू खरेदी करणे उचित असते. यामुळे कर्जबाजारीपण येत नाही. गरजा विचारात न घेता आपल्या इच्छापूर्ण करण्यासाठी खर्च केल्यास प्रसंगी गरजेच्या वस्तू /बाबी विकण्याची वेळ येऊ शकते. याबाबतचा जगप्रसिद्ध इन्व्हेस्टर श्री. वॉरेन बफे यांचे एक वाक्य प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे.
If you buy things, you do not need, soon you will have to sell things you need.”
“थोडक्यात आपण जर अनावश्यक गोष्टी खरेदी करत बसलात तर लवकरच आपल्याबर आवश्यक वस्तू विकण्याची वेळ येऊ शकते”
गरज आणि हौस याचा ताळमेळ असा घालावा
घरासाठी घेण्यात येणारे कर्ज आपल्या उत्पन्न व अन्य आवश्यक बाबींसाठी होत असलेला खर्च विचारता घेऊनच कर्ज घ्यावे , केवळ कर्ज मिळतेय म्हणून मोठे घर घेण्याचे टाळावे. सर्वसाधारणपणे घरच्या किमतीच्या जास्तीतजास्त ५० ते ६०% इतकेच कर्ज घ्यावे तसेच कर्जाचा ईएमआय आपल्या मासिक उत्पन्नाच्या ४० ते ४५% इतकाच असेल असे पाहावे. असे केल्याने कर्जाची परतफेड करणे शक्य होऊ शकते. आजकाल बँका घराच्या किमतीच्या ८५ ते ९०% इतके कर्ज देऊ करतात यामुळे जास्त कर्ज घेऊन मोठे घर घेण्याचा मोह होऊ शकतो. असे मोठे कर्ज घेतल्याने भविष्यात नोकरी जाणे अथवा व्यवसायात काही अडचण आल्यास कर्ज थकीत होऊन प्रसंगी घर विकण्याची नामुष्की येऊ शकते. दुसरे असे की जर आपण वाढत्या उत्पन्नामुळे व वाढत्या गरजेपोटी नवीन मोठे घर घेणार असला तर आधीचे राहते घर विकून नवीन घर घेणे फायद्याचे असते. असे केल्याने आधीच्या घरच्या विक्रीयतून येणारी रक्कम नवीन घराची खरेदी करण्यासाठी वापरल्याने नवीन घरासाठी कमी कर्ज घ्यावे लागेल व त्यामुळे कमी होणारा हप्ता हा निश्चितच जुने घर भाड्याने देऊन येणाऱ्या भाड्यापेक्षा जास्त असेल.
याव्यतिरिक्त काही बाबी/वस्तू दैनदिन जीवनात गरजेच्या असतात मात्र या वस्तू खरेदी करण्याने मालमत्ता निर्माण होत नाही. उदा: दैनदिन प्रवासाठीचे वाहन (दुचाकी/चारचाकी), घरातील टीव्ही, फ्रीज,अन्य गरजेच्या वस्तू, मोबाईल या वस्तू आजकाल चैनीच्या राहिल्या नसून बदलत्या जीवनशैली मुळे गरजेच्या झाल्या आहेत. अशा वस्तू शक्य तोव्हर कर्ज घेऊन खरेदी करू नयेत(अपवाद: चारचाकी वाहन/कार). या वस्तू गरजेच्या असल्या तरी विविध मॉडेल्समध्ये उपलब्ध असतात व त्यानुसार त्यांच्या किंमती कमी अधिक असतात. अशा वस्तू खरेदी करताना केवळ कोणाची तरी बरोबरी किंवा आपले इम्प्रेशन वाढते असे समजून महागड्या वस्तू खरेदी करण्याकडे आजकाल कल वाढत असल्याचे दिसून येते.असी खरेदी ही गरज नसून एक अनावश्यक चैन असते. या वस्तूंचे नवनवीन मॉडेल्स बाजारात वरचेवर येत असल्याने आपण आज घेलेल्या महागड्या वस्तूचे बाजार मूल्य नजीकच्या काळात अगदी नगण्य असते. ( हे बाय बॅक योजने अंतर्गत आपल्या वस्तूला देऊ केलेल्या किमतीवरून दिसून येते.) अशा सर्व कर्जांचा मिळून एकत्रित मासिक हप्ता आपल्या एकूण मासिक उत्पन्नाच्या १० ते १५% पेक्षा जास्त असू नये.( यात कार लोन ईएमआयचा समावेश आहे). तसेच झीरो इंटरेस्ट लोन, बाय नाऊ पे लेटर यासारख्या स्कीम मध्ये शक्य तोव्हर खरेदी करू नये या मुळे बऱ्याचदा अनावश्यक खरेदी होऊन आपण कर्जाच्या सापळ्यात सापडण्याची शक्यता असते.
आपल्याला जर आर्थिक शिस्त असेल तरच क्रेडिट कार्डचा वापर करा अन्यथा डेबिट कार्ड वापरणे हितावह असते. आपल्या क्रेडिट कार्डवरील मासिक खर्च आपल्या कार्ड लिमिटच्या २० ते २५% पर्यंत मर्यादित ठेवा , आजकाल बहुतेक सर्व गोष्टी अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या यासारख्या ऑनलाईन पोर्टलवर उलब्ध असल्याने बऱ्याचदा केवळ उत्सुकेतेपोटी या साईटवर आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहत असतो व त्यावरील डिस्काऊंटची टक्केवारी पाहून व खिशात क्रेडिट कार्ड असल्याने केवळ स्वस्त मिळतेय म्हणून मुळातच गरज नसलेली वस्तू खरेदी केली जाते. केवळ कार्डवर लिमिट आहे म्हणून हौसेखातर अनावश्यक खरेदी करू नका, आपल्याला जेवढी रक्कम बिल आल्यावर वेळेत भरणे शक्य आहे तेवढाच खर्च आपल्या क्रेडिट कार्डावर करा. एक किंवा दोनच क्रेडिट कार्ड वापरा. आपल्या क्रेडिट कार्डचे संपूर्ण बिल देय तारखेच्या आत भरा, (आजकाल बँका बिलासाठी हप्त्याची सवलत देऊ करत आहेत अशी सवलत वापरू नका )
विविध माध्यमातून होणारा जाहिरातींचा भडिमार, डिस्काऊंटचे आमिष सुलभ कर्जाची उपलब्धता यामुळे सारखे काही तरी नवीन खरेदी करण्याची सवय तरुण पिढीस लागल्याचे दिसून येते. ही जीवनशैली जरी सुरवातीला आकर्षक वाटत असली तरी यामुळे आर्थिक नियोजन अभावानेच होते इतकेच नाही तरी कर्जाचे हप्ते कमी होण्याऐवजी सातत्याने वाढतच राहतात. प्रसंगी कर्जबाजारी होण्याची वेळ येते, परिणामी वसुलीचे तगादे सुरु होतात व यातून मनस्ताप व अवहेलना होऊ लागते.
हे सर्व टाळावयाचे असेल तर आपला होणारा खर्च गरजेच्या गोष्टींसाठी करून चैनीच्या वस्तूंची खरेदी शक्य तोवर आपल्याकडील शिल्लक रकमेतूनच करावा. उदाहरणार्थ वाढदिवस, बारसे, वास्तुशांत, यासारखे समारंभ करताना क्रेडिट कार्डाचा वापर करून अनावश्यक खर्च करू नये. याचा अर्थ असे समारंभ करूच नयेत असे नाही तर समारंभाचा बडेजाव टाळून साधेपणाने करावा जेणे करून समारंभाचा आनंदही घेता येईल व पैशाची उधळपट्टी टाळली जाईल. थोडक्यात आपल्या गरजांसाठी आवश्यक तो खर्च जरूर करावा त्यात अनावश्यक काटकसर करू नये मात्र हौसमौज करण्यासाठी कर्ज काढू नये म्हणजेच ऋण काढून सण करू नये.