आनंद म्हाप्रळकर
स्वातंत्र्य हे व्यक्तीला मिळणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार असतो मग ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य असो वा वैयक्तिक स्वातंत्र्य. परंतु जेव्हा गोष्ट आर्थिक स्वातंत्र्याची होते तेव्हा ते पूर्णपणे त्या व्यक्तीच्या कामावर आणि कष्टावर अवलंबून असते.
आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे हे प्रत्येकाचे ध्येय असते परंतु नुसते पैसे कमवून आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होत नाही त्यासाठी एका विशिष्ट मार्गावरून गेल्यास ते लवकरात लवकर प्राप्त करणे शक्य असते. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीच्या गरजा भागवण्यासाठी त्या व्यक्तीला दररोज काम करण्याची आवश्यकता नसते. आर्थिक स्वातंत्र्य हे व्यक्तीच्या उतारवयासाठी महत्वाचे असते. आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यानंतर व्यक्ती आपले उर्वरित जीवन आपल्या आवडीचे काम करत जगू शकतो ज्यात त्याला दैनंदिन खर्चाची चिंता होणार नाही, यामुळे व्यक्ती चिंतामुक्त आयुष्य जगू शकते.
हेही वाचा…Money Mantra : फिनटेकचा वापर का वाढला आहे?
आर्थिक स्वातंत्र्यासाठी वैयक्तिक वित्त समस्यांचे निवारण करणे गरजेचे असते. समस्येचे निवारण करण्याआधी जर ती समस्या समजली तरच त्या समस्येचे कारण शोधून त्यास सोडवणे सोपे होऊ शकते म्हणूनच समस्येचे निवारण करण्यासाठी समस्या काय आहे हे जाणून घेणे आवश्यक असते.
बऱ्याच जणांचे आर्थिक स्वातंत्र्य लवकरात लवकर मिळावे असे स्वप्न असते पण आर्थिक स्वातंत्र्य प्रत्येकाला वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात हे मिळत असते. काही जणांना वडिलोपार्जित संपत्ती मिळालेली असते जी त्यांना काम न करता खूप लवकर आर्थिक स्वातंत्र्य देते परंतु त्यांनी त्याची बचत न केल्यास त्यांना त्यांच्या उतार वयात काम करायला लागू शकते. आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्या व्यक्तीच्या जीवनात शिस्त असायला हवी. त्याचे खर्च त्याची कमाई यातून किती बचत करणे जरुरी आहे हे त्या व्यक्तीस कळणे आवश्यक असते.
हेही वाचा…Money Mantra: शेअर बाजारात आता पुढे काय?
तरुण पिढी ज्यास आजकाल जनरेशन Z आणि मिलेनिअल्स म्हणून ओळखली जाते. त्या पिढीने जर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले तर त्यांना आर्थिक स्वातंत्र्य लवकर मिळू शकतो. या पिढीने बचतीचा नफा जाणून घेणे गरजेचे आहे कारण जेव्हा लग्न, मुलं ह्यांचा काहीही खर्च नसतो तेव्हा कुटुंबाकडून पैशांबाबतीत तक्रार नसते. कुठल्याही प्रकारचे कर्ज, विमा नसतो तेव्हा पैशाची बचत गुंतवणूक करणे शक्य असते आणि वैद्यकीय, तंत्रज्ञान अशा क्षेत्रात सुरुवातीपासूनच कमाई जास्त होत असते. यावेळी अनावश्यक खर्च जसे गरज नसताना सोशल मीडियावर बघून महागड्या वस्तू घेणे, माहिती न घेता पैसे गुंतवणे टाळून सगळ्याची माहिती काढून बचत केल्यास पुढे जाऊन लग्न केल्यावर, मुलं झाल्यावर त्यावेळी होणाऱ्या खर्चामधून बचत करणे अवघड जाते कारण तो खर्च करणे आवश्यक असतो मग तेव्हा ह्याच बचतीचा पुढे उपयोग होऊ शकतो. आर्थिक स्वातंत्र्यासाठी जीवनात शिस्त आणि वित्त व्यवस्थापन गरजचे असते कारण आपात्कालीन स्थितीत आणि सेवानिवृत्तीनंतर बचत उपयोगात येते.
हेही वाचा…Money Mantra:‘विकसित भारताचा’ लाभार्थी
आर्थिक स्वातंत्र्य हे जीवनात महत्वाचे आहे परंतु कुठे कशी किती बचत करायची हे एक आर्थिक नियोजक फायदेशीर पद्धतीने सांगू शकतो. एक आर्थिक नियोजक ग्राहकांना त्यांच्या सध्याच्या पैशाच्या गरजा व्यवस्थापित करण्यात आणि त्यांची दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे गाठण्यास मदत करतो. यामध्ये बचत, गुंतवणूक, विमा, सेवानिवृत्ती बचत, कर ह्या सर्वांबद्दल मार्गदर्शन केले जाते. ज्यामुळे जो पैसा ग्राहक कमवत आहे तो पुढे जाऊन त्याच्या आरामदायी जीवनास उपयोगी पडेल.