यापूर्वीच्या लेखामध्ये आपण प्राप्तिकर विवरणपत्र वेळेत का दाखल करावे, त्याची चार महत्त्वाची कारणे समजून घेतली आणि आता आपण उर्वरित महत्त्वाची कारणे समजून घेणार आहोत. त्याचा याचा वापर आपल्याला कुठे व कसा करून घेता येवू शकतो ते समजून घेवू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : Money Mantra: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात अर्थव्यवस्था वेगाने वाढण्याचे संकेत!

१. पत्त्याचा विश्वसनीय पुरावा

प्राप्तिकर विवरणपत्र पत्ता पडताळणीकरिता आता वैध मानले जात आहे. त्याचा वापर करून आधार कार्डदेखील मिळवता येते. आधार कार्ड, वाहन परवाना (लायसन्स), पासपोर्ट आणि यांसारख्या इतर कागदपत्रांसाठी रहिवासी पत्त्याचे पुरावे आवश्यक आहेत. करदात्याकडे असलेले त्याच्या नियोक्त्याचे ओळखपत्र स्वीकारले जात नाही, परंतु अशा प्रकरणांमध्ये प्राप्तिकर विवरणपत्राद्वारे सरकारी विभागाकडे कळविलेला पत्ता म्हणून स्वीकारला जाऊ शकतो.

आणखी वाचा : Money Mantra: ‘डिजिटल गोल्ड’चे फायदे काय?

२. कमाईचा अस्सल पुरावा

फॉर्म १६ सामान्यत: नियोक्त्यांद्वारे त्यांच्या कर्मचाऱ्यांना असलेल्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून दिला जातो. प्राप्तिकर विवरणपत्र स्वयंरोजगार किंवा स्वतंत्र कंत्राटदारांसाठी वास्तविक उत्पन्न पडताळणी म्हणून काम करते. त्यामध्ये संपूर्ण आर्थिक वर्षातील व्यक्तीचे उत्पन्न आणि खर्च यांचा संपूर्ण लेखाजोखा समाविष्ट असतो. सबब प्राप्तिकर विवरणपत्र उत्पन्नाची माहिती संकलित करीत असल्याने करदात्याशी व्यवहार करणाऱ्यांना आर्थिक स्थिती समजू शकते.

आणखी वाचा : Money Mantra : प्राप्तिकर विवरणपत्र वेळेत दाखल का करावे ? (भाग पहिला)

३. विमा खरेदीचे उच्च कव्हरेज
रुपये पन्नास लाखांहून अधिक किमतीच्या जीवन विमा पॉलिसी अनेक लोक खरेदी करीत आहेत. तथापि, जोपर्यंत आयुर्विमा उतरविणाऱ्या कंपन्यांना विमेदाराचे वार्षिक उत्पन्न दर्शविणारे प्राप्तिकर विवरणपत्र रेकॉर्ड विमेदार दाखवत नाही तोपर्यंत विमा कंपन्या ती जोखीम वा जबाबदारी स्वीकारत नाहीत. विमेदाराच्या कामाच्या आधारे त्याला मिळणारे उत्पन्न विम्याचे किती जोखीम कव्हरेज सदर व्यक्तीस मिळते हे विमा कंपनी ठरवते. आणि थोडक्यात विमा कंपनीला विमेदारारची जोखीम स्वीकारताना त्याच्या उत्पन्नाची सांगड घालण्यासाठी प्राप्तिकर विवरणपत्र उपयोगी पडते व परिणामी विमेदाराचा फायदा होतो

४. कर्ज वा क्रेडिट कार्डाच्या अर्जासाठी एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज:

जेव्हा व्यक्ती त्याच्या कुटुंबासाठी किंवा व्यवसायासाठी नवीन गाडी किंवा नवीन घर खरेदीसाठीच्या कर्जासाठी अर्ज करते, तेव्हा बँकेस काही महत्त्वपूर्ण कागदपत्रांची आवश्यकता असते. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो आयडेंटिफिकेशन इत्यादी. अशी ही काही कागदपत्रे आवश्यक असू शकतात. याच्या व्यतिरिक्त, उत्पन्नाचा एक भक्कम पुरावा म्हणून एक महत्त्वाचा दस्तऐवज ज्याची वित्तीय संस्थांकडून आवर्जून मागणी केली जाते व ती म्हणजे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्याचा पुरावा. मागील तीन वर्षांच्या प्राप्तिकर विवरणपत्राची माहिती हमखास बँकांकडून मागितली जाते. याच्या आधारे व्यक्तीच्या भूतकाळातील आणि सध्याची आर्थिक परिस्थिती तपासून पाहता कर्जाची परतफेड सध्याच्या उत्पन्नाच्या आधारे कर्जदार करू शकेल की नाही हे निर्धारित करण्यासाठी ही पडताळणी केली जाते.

सबब, उत्पन्नाच्या दाखल्यावरच सदर व्यक्तीस कर्ज मिळणार आहे की नाही हे बँक ठरवीत असल्याने प्राप्तिकर विवरणपत्रास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. असे हे प्राप्तिकर विवरणपत्र केवळ बँक कर्जाची विनंती करतानाच उपयुक्त आहे असे नाही, तर ते तुम्हाला क्रेडिट कार्डसाठी अर्ज करतानाही उपयुक्त ठरू शकते. क्रेडिट कार्ड जारी करण्यापूर्वी, क्रेडिट कार्ड कंपन्या तुमची आधीची कमाई दर्शविणारी प्राप्तिकर विवरणपत्रे तपासतात व नंतर जोखीम मर्यादा ठरवितात. थोडक्यात, ज्या करदात्यांना गृह व वाहनकर्ज घ्यायचे असेल तर कोणतीही बँक सर्वसाधारणपणे कर्जदाराचे वार्षिक उत्पन्न प्राप्तिकर विवरणपत्राच्या व इतर निकषांच्या आधारे ठरवितात तथापि, एखाद्या करदात्याने एकदम दोन विवरणपत्रे भरली असतील तर सदर व्यावसायिक वार्षिक उत्पन्न फक्त कर्ज काढण्यासाठीच भरले आहे व म्हणून खरे नसावे, असा त्यांचा ग्रह होतो असा अनुभव आहे व म्हणून देय तारखेअखेर विवरणपत्र भरणे अगत्याचे आहे.

५. शिष्यवृत्तीचे फायदे

शिष्यवृत्ती देणाऱ्या सरकारी आणि खासगी विविध संस्थांनी प्राप्तिकर विवरणपत्राला उत्पन्नाच्या दस्तऐवजाचा स्रोत म्हणून पाहणे सुरू केले आहे. विशिष्ट संस्था आणि/किंवा विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीचा आधार घेऊ इच्छिणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या बाबतीतील गरिबीचा निकष उत्पन्नाच्या आधारे ठरविला जातो. त्यासाठी आता प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यास सांगण्यात येत आहे, हा नवीन बदल आहे. प्राप्तिकर विवरणपत्र संभाव्य विद्यार्थ्याचे वा माता-पित्यांचे उत्पन्न सिद्ध करण्याची क्षमता स्थापित करण्यात मदत करते.

६. स्टार्टअप उपक्रमांसाठी निधी

एखादी नवीन कंपनी सुरू करण्याची किंवा विद्यमान कंपनी वाढवण्याची योजना आखत असताना, होतकरू उद्यमी भांडवलदार किंवा बीज गुंतवणूकदारांसारख्यांना बाहेरील स्रोतांकडून निधीची आवश्यकता असू शकते. व्यवसायाची आर्थिक स्थिरता आणि नफा यांचे मूल्यांकन करण्यासाठी हे गुंतवणूकदार तुमच्या प्राप्तिकर विवरणपत्राच्या तपशिलांची चौकशी करू शकतात. ते प्राप्तिकर विवरणपत्र फॉर्म वापरून ऑडिट केलेल्या अहवालातील डेटा क्रॉस-चेक करू शकतात.

७. स्वतंत्र कंत्राटदार आणि व्यावसायिकांसाठी फायदे

पगारदारवर्गास जसा उत्पन्नाचा दाखला फॉर्म १६ स्वरूपात मिळतो तसा स्वयंरोजगार किंवा स्वतंत्र कंत्राटदारांना प्राप्त होत नाही. त्यांच्या उत्पन्नाची खात्री देणारा प्राप्तिकर विवरणपत्र हा एकमेव पुरावा आहे. किंबहुना, एकमात्र रेकॉर्ड असते जे दाखवते की त्यांनी किती उत्पन्नावर किती प्राप्तिकर भरला आहे. या पुराव्याशिवाय, म्हणजे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केले नाही तर त्यांना निधीच्या समस्या आणि व्यवहारातील समस्या येऊ शकतात.

८. विलंब शुल्क

अंतिम मुदतीनंतर प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्यास आयटी विभागातर्फे सदर व्यक्तीला विलंब शुल्क आकारले जाईल. साधारणपणे, उत्पन्न रुपये पाच लाखांपेक्षा जास्त असल्यास, जुन्या प्रणालीत व रुपये सात लाखांपेक्षा जास्त असल्यास रुपये पाच हजारचे विलंब शुल्क आकारले जाते. या रकमेपेक्षा कमी उत्पन्न असणारे प्राप्तिकर विवरणपत्र असल्यास विलंब शुल्क एक हजार रुपये आहे. देय प्राप्तिकरावर आर्थिक वर्ष संपल्यापासून प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करावयाच्या तारखेपर्यंत १२% दराने व्याजदेखील लागणार असल्याने आर्थिक नुकसान संभवते. याखेरीज, जर विवरणपत्र मुदतीत भरले नाही तर प्राप्तिकर कायद्याच्या कलम २७१ अंतर्गत पाच हजार रुपयांचा दंड लागू शकतो. करचुकवेगिरीसारख्या गंभीर परिस्थितीत करनिर्धारकांना कठोर अटकेचा सामना करावा लागू शकतो, अशा तरतुदीदेखील कायद्यात समाविष्ट आहेत. सबब प्राप्तिकर विवरणपत्र वेळीच दाखल करणे नक्कीच फायद्याचे व म्हणून शहाणपणाचे ठरावे.

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याचे महत्त्व

प्राप्तिकर विवरणपत्र भरणे ऐच्छिक आहे, असे म्हणून बरेच लोक त्याकडे निरर्थक आणि बोजड म्हणून दुर्लक्ष करतात. कर भरणे पाहण्याचा हा फारसा आरोग्यदायी मार्ग नाही. दरवर्षी प्राप्तिकर विवरणपत्र भरणे हे राष्ट्रातील प्रत्येक जबाबदार नागरिकाचे नैतिक आणि सामाजिक कर्तव्य म्हणून पाहिले जाते. हे एक आधार म्हणून काम करते, ज्याच्या आधारावर सरकार नागरिकांच्या खर्चाची रक्कम आणि साधनांची गणना करते आणि इतर प्रकारच्या सवलतींव्यतिरिक्त अधूनमधून रिफंडची विनंती करण्यासाठी मूल्यांकनकर्त्याला एक व्यासपीठ ऑफर करते. सबब प्राप्तिकर विवरणपत्र भरणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे!

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra importance of filing income tax returns before due date mmdc vp