महेंद्र लूनिया
२१ व्या शतकाला सुरुवात झाली आणि सगळे जगच डिजिटल व्हायला लागले आणि त्याचाच एक भाग म्हणजे ‘डिजिटल गोल्ड’ होय. या ‘डिजिटल गोल्ड’ने गुंतवणूकदारांबरोबरच सर्वसामान्यांसाठीसुद्धा विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ‘डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणूक करत असताना शुद्धतेची खात्री मिळते व जीएसटीची रक्कम लागत नाही. खरेदी करताना किंवा विक्री करताना भावाची खात्री मिळते, त्याचबरोबर प्रत्यक्ष सोने हाताळण्याची गरज पडत नाही.
शिवाय डिजिटल गोल्ड हे डिजिटल स्वरूपामध्ये आपल्याला सांभाळता येतं, त्यामुळे चोरी व्हायची कोणतीह शक्यता नाही. डिजिटल गोल्ड डिमॅटमध्ये किंवा वॉलेटमध्ये राहिल्यामुळे ते जास्त सुरक्षित असते आणि त्याचे हस्तांतरण आपण अत्यंत सोप्या प्रकारे करू शकतो. हे सर्व फायदे आपल्याला प्रत्यक्ष सोन्यापेक्षा ‘डिजिटल सोन्या’मध्ये मिळतात.
तर आता आपण ‘डिजिटल गोल्ड’चे कोणते व किती पर्याय आहेत हे त्यांच्या फायद्या- तोट्यासह पाहूयात:
शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सोन्यामध्ये गुंतवणुकीचा पर्याय आहे गोल्ड ETF. हे गोल्ड ETF रिलायन्स आणि निप्पॉनसारख्या कंपन्या मार्केटमध्ये घेऊन आल्या, ज्याच्या एका युनिटची किंमत केवळ पन्नास रुपयांच्या आसपास आहे. याची प्युरिटी म्हणजे शुद्धता ही २४ कॅरेट असते आणि हे गोल्ड एटीएफ सेबीद्वारे नियंत्रित केले जातात. हे गोल्ड आपण सर्वसामान्य शेअर्सप्रमाणे शेअर बाजारामध्ये खरेदी-विक्री करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जीएसटीची रक्कम या ठिकाणी लागत नाही. केवळ पन्नास रुपये किंमत असल्याकारणाने आपण कितीही छोट्या प्रमाणामध्ये त्याची खरेदी-विक्री करू शकतो.
मल्टीकमॉडिटी एक्सचेंज म्हणजेच एमसीएक्समध्ये सोन्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण खरेदी विक्री करू शकतो. या कॉन्ट्रॅक्टची साईज एक ग्रॅम, आठ ग्रॅम, १०० ग्रॅम आणि एक किलो अशी आहे. हे कॉन्ट्रॅक्ट्स एक महिन्याआड पाच महिन्याचे आपण घेऊ शकतो. परंतु दीर्घ कालावधीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कुठल्याही प्रकारची लिक्विडिटी नसल्यामुळे त्यामध्ये खरेदी-विक्री होत नाही. हे कॉन्ट्रॅक्ट्स शक्यतो बाजारामध्ये सोन्याची मोठी उलाढाल करणारे व्यापारी आपल्या सोन्याच्या खरेदी विक्रीच्या परिस्थितीला संतुलित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरतात. या ठिकाणी होणारा आधुनिक फायदा म्हणजे तुम्हाला संपूर्ण कॉन्ट्रॅक्टची रक्कम भरायची गरज पडत नाही. विविध ब्रोकर आपल्या ग्राहकांना केवळ पाच टक्क्यांपासून २५% मार्जिन रक्कम भरून खरेदी करण्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट उपलब्ध करून देतात. त्यामुळे तुमची पूर्ण रक्कम सुद्धा या ठिकाणी द्यावे लागत नाही. फायदा मात्र तुमच्या संपूर्ण कॉन्ट्रॅक्टवर होतो.
सोवरीन गोल्ड बॉण्ड अर्थात सार्वभौम सुवर्ण रोखे:
डिजिटल गोल्डच्या प्रकारांमध्ये सर्वात उत्तम प्रकार म्हणजे सार्वभौम सुवर्ण रोखे होय. या प्रकारामध्ये ग्राहक केवळ एक ग्रॅम सोन्याची रक्कम देऊन एक युनिट खरेदी करू शकतात. रिझर्व बँक वर्षभरामध्ये विविध वेळेस विविध सिरीजद्वारे हे रोखे विक्रीस काढत असते. महत्त्वाचे म्हणजे, ज्या वेळेस रिझर्व बँक अशाप्रकारे सुवर्णरोखे बाहेर काढते, त्यावेळेस तुम्ही डिजिटल प्रकारांमध्ये त्याचे पैसे भरलेत तर तुम्हाला पन्नास रुपये प्रतिग्रॅमचे डिस्काउंट मिळते. एक ग्रॅम सोन्यामध्ये गुंतवणूक करता येते. फेस व्हॅल्यूवर दर सहा महिन्याला सव्व टक्का व्याज रिझर्व बँक तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करते. म्हणजेच सोन्यामध्ये केलेली ही गुंतवणूक सोन्याचा भाव वाढत असताना त्याचा लाभ आपल्याला देते.
हेही वाचा… Money Mantra: तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ‘FD’ शेअर्स आहेत का?
शिवाय, वार्षिक अडीच टक्के रक्कम आपल्याला व्याज म्हणूनही मिळते. खरं सांगायचं तर ‘सोने पे सुहागा’ अशी ही लाईफ टाईम ऑफर आपल्याला कायमच मिळत आहे. हे रोखे खरेदी केल्यानंतर जर तुम्ही ते पाच वर्षे विकले नाहीत तर तुम्हाला वाढलेल्या रकमेवर कुठल्याही टॅक्स द्यावा लागत नाही. म्हणजेच, टॅक्स फ्री परतावा आपण मिळवू शकतो. परंतु गरज भासल्यास आपण आज खरेदी केलेले सुवर्णरोखे उद्या शेअर बाजारामध्ये विकू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बाजार भाव मिळतो. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अधिक रक्कम कापली जात नाही. खरेदी करताना जीएसटी लागत नाही विक्री करताना भाव फरक द्यावा लागत नाही. एवढे सगळे फायदे आणि चोवीस तास लिक्विडिटी खरोखरच सर्वसामान्यांनी आपलं सोनं खरेदी करून तिजोरी बंद ठेवण्यापेक्षा किंवा हे सोनं लॉकरमध्ये ठेवण्यापेक्षा डिमॅट मध्ये सुवर्णरोखे खरेदी केले तर व्याजही मिळू शकेल सहज सोपं हस्तांतरण करता येईल असा सर्वात सोपा प्रकार म्हणजे सार्वभौम सुवर्णरोखे.
गोल्ड वॉलेट:
नोटबंदीनंतर बऱ्याच कंपन्या या ‘गोल्ड वॉलेट’च्या संकल्पनेमध्ये उतरल्या आहेत. या वॉलेट्समध्ये तुम्हाला अगदी पाच रुपये दहा रुपयांचेसुद्धा सोने खरेदी करता येते. हे वॉलेटमधले सोने तुम्ही केव्हाही विकू शकता. या ठिकाणी ग्राहकांनी लक्षात घेण्यासारखी एकच गोष्ट आहे की, त्या वॉलेट्सवर असणारा सोन्याचा भाव तुम्हाला पाहून घ्यावा लागेल. त्यानंतर प्रत्येक वॉलेट सांभाळण्यासाठी या कंपन्या तुम्हाला विविध प्रकारचे चार्जेस लावत असतात, याचाही विचार करावा लागेल.
यानंतरचा अजून एक प्रकार येऊ घातला आहे आणि तो आहे ‘इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट’ अर्थात ईजीआर. या प्रकारामध्ये तुमच्याकडे असणारे सोने तुम्ही जवळच्या ‘गोल्ड वॉल्ट मॅनेजर’कडे देऊ शकता. या सोन्याला ते वितळवतात आणि त्याची प्रतवारी ठरवून त्याप्रतवारीची ‘गोल्ड रिसीट’ तुम्हाला डिमॅटमध्ये दिली जाते. यासाठी तुम्हाला काही चार्जेस जरूर लागणार आहेत आणि त्याच्या सविस्तर नोंदी अजून पूर्णपणे उपलब्ध झालेले नाहीत. प्रत्यक्ष सोने खरेदी करून त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी वरील पर्याय खरोखरच उपयोगाचे आहेत.