भारतातील तरुण वर्गाच्या बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम त्याच्या खर्च करण्याच्या प्रक्रियेत जाणवतो. पूर्वी हॉलीवूडपटांतून सर्रासपणे ‘क्रेडिट कार्ड’ स्वाईप करून वस्तू विकत घेतानाची दृश्ये दिसायची. पण आता घरोघरी इंटरनेट त्याप्रमाणे ‘घरोघरी क्रेडिट कार्ड’ ही स्थिती आहे. पूर्वी क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागायचे, आता क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी ग्राहकाला नाही तर क्रेडिट कार्डचा ग्राहक मिळण्यासाठी कंपन्यांना प्रयत्न करावे लागतात. तुमचा मासिक पगार किती आहे? व्यवसाय असेल तर उत्पन्न किती आहे? यानुसार तुम्हाला वेगवेगळ्या दर्जाची क्रेडिट कार्ड मिळतात. इथे दर्जा हा शब्द ‘लेव्हल’ म्हणून लक्षात घ्या. गोल्ड, प्लॅटिनम, कोरल, डायमंड असे वेगवेगळे शब्द क्रेडिट कार्ड कंपन्या आपल्या मार्केटिंग साठी वापरतात.
क्रेडिट कार्डची लिमिट म्हणजेच खर्च करायची क्षमता त्याच्याशी संबंधित असायला हवी. पण तसं नाही, तुम्ही जास्तीत जास्त खर्च करावा आणि जास्तीत जास्त पैसे क्रेडिट कार्डनेच खर्च करावेत यासाठी कंपन्या प्रयत्नशील असतात. म्हणूनच आपण क्रेडिट कार्ड वापरताना व्यवस्थित विचार केला पाहिजे. नाहीतर वरवरच्या आमिषांना बळी पडून आपण खड्ड्यात जाण्याची शक्यता यात अधिक असते.
हेही वाचा… Money Mantra Mutual Fund: म्युच्युअल फंड कशासाठी?
कंपनीला कसे पैसे मिळतात?
क्रेडिट कार्ड वापरणाऱ्याला एक ठराविक वेळेची मर्यादा दिलेली असते. म्हणजेच समजा क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या एका माणसाला १० जून ते १० जुलै एवढ्या कालावधीसाठी क्रेडिट दिले आहे म्हणजेच उधार दिलेली आहे. तर तो उधारीचा कालावधी संपल्यावर आपल्याला क्रेडिट कार्ड कंपनी एक स्टेटमेंट पाठवते आणि त्या स्टेटमेंट मध्ये तुम्ही वापरलेले पैसे किती दिवसात परत द्यायचेत हे लिहिलेलं असतं. म्हणजेच ते पैसे २५ जुलै पर्यंत द्यायचे असतील तर २५ जुलैच्या आत तुम्ही क्रेडिट कार्डचं बिल भरल्यास तुम्हाला कोणताही ‘एक्स्ट्रा चार्ज’ लागत नाही, कोणताही दंड लागत नाही, व्याज लागत नाही.
मिनिमम अमाऊंट ड्यू आणि बिलाची रक्कम यातला फरक समजून घ्या !
एक उदाहरण घेऊया, बिलाची रक्कम ३५,२०० होती याचाच अर्थ तुम्ही मागच्या महिन्यात कंपनीच्या क्रेडिट कार्डाचा वापर करून ३५,२०० रुपये उधार वापरले आहेत आणि आता तुम्हाला तुमचं क्रेडिट कार्ड सुरू ठेवायचा असेल तर ‘ड्यू डेट च्या’ आधी तुम्हाला दोन पर्याय असतात. एक पर्याय, सगळी रक्कम भरून कार्ड सुरू ठेवायचं किंवा बँक तुम्हाला ऑफर देते फक्त रुपये १०,२०० भरा आणि तुमचं क्रेडिट कार्ड तसेच सुरू राहील! याचा बऱ्याचदा ग्राहक चुकीचा अर्थ घेतात. ही बँकेने तुम्हाला दिलेली सोय नसून तुमच्यासाठी वाढलेला खर्च ठरते. मिनिमम अमाऊंट ड्यू भरल्यावर उरलेले पैसे तुमच्या पुढच्या महिन्याच्या क्रेडिट कार्डच्या बिलात वाढवले जातात. पण ते नुसतेच वाढवले जात नाहीत. त्यावर सणसणीत व्याज आकारलं जातं आणि ते घर कर्ज, वाहन कर्ज अशा कर्जापेक्षा खूपच जास्त असतं. मग पुन्हा पुढच्या महिन्यात स्टेटमेंट आलं की त्या महिन्यात वापरलेले म्हणजेच उधार घेतलेले पैसे आणि मागच्या महिन्यातले थकलेले पैसे असे एकत्र बिलाच्या स्वरूपात पाठवले जातात. ग्राहकाला संपूर्ण बिल वाचता येत नाही आणि तो पुन्हा मिनिमम भरतो आणि पुन्हा एकदा कर्जाचा आणि व्याजाचा सिलसिला सुरू होतो.
व्याज किती असतं?
प्रत्येक क्रेडिट कार्ड कंपनीच्या वेबसाईटवर किंवा तुम्हाला क्रेडिट कार्ड देताना जो ईमेल आलेला असेल, एखादं ब्रोशर मिळाले असेल त्यात याची माहिती लिहिलेली असते. वेळोवेळी क्रेडिट कार्ड व्याज दर बदलत असतात. साधारणपणे भारतातील क्रेडिट कार्ड विकणाऱ्या कंपन्यांच्या आकडेवारीचा अंदाज घेतला तर दर महिना अडीच ते साडेतीन टक्के म्हणजेच वार्षिक ३०% ते ४२% एवढ्या भरभक्कम दराने तुम्ही बँकेला पैसे परत करत असता. नाईलाजाने, आपत्कालीन वेळी खर्च केलेले पैसे आणि अज्ञानामुळे खर्च केलेले पैसे वेगळे असतात. मेडिकल इमर्जन्सी असेल, घरी आकस्मिक खर्च निघाले आणि तुम्हाला वेळेत पूर्ण पैसे देता आले नाहीत तर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरणे हे एखाद वेळेस समजून घेता येऊ शकेल पण ही सवय लागणे अत्यंत धोकादायक आहे.
अनेक क्रेडिट कार्ड वापरताय?
कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काम करणाऱ्यांना विविध बँकांची असलेल्या टाय-अपमुळे अनेक क्रेडिट कार्ड मिळू शकतात. म्हणजेच एका व्यक्तीकडे पाच -दहा – पंधरा क्रेडिट कार्ड सुद्धा असतात ! कोणत्यातरी कार्डवर कुठल्यातरी विशिष्ट वस्तू किंवा सेवेची ऑफर आहे म्हणून ते कार्ड घेतले जाते. एका बँकेच्या क्रेडिट कार्डवर हॉटेलमध्ये कॅशबॅक मिळते, एका कंपनीच्या क्रेडिट कार्डवर ऑनलाइन शॉपिंग मध्ये डिस्काउंट मिळते, एका कंपनीच्या क्रेडिट कार्डवर पेट्रोल आणि डिझेलमध्ये कॅशबॅक किंवा पॉईंट मिळतात म्हणून अनेक क्रेडिट कार्ड्स वापरण्याकडे आजकाल तरुणाईचा कल दिसतो. पण यातील धोका असा सगळ्या कार्डांच्या ड्यू डेट्स लक्षात राहिल्या नाहीत तर फक्त तुमच्या दुर्लक्षामुळे तुम्हाला व्याजाचा भुर्दंड पडतो.
एका क्रेडिट कार्डचे बिल दुसऱ्या कार्डने भरायचं का?
कधी कधी एका क्रेडिट कार्डचे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने भरण्याची सवय लागते. पण एक वेळ अशी येते की शेवटच्या कार्डच्या ‘ड्यू डेटला’ जे पैसे भरायचेत ते तुम्हाला स्वतःच्या खिशातूनच भरायचे असतात त्यावेळी एकदम खिशाला चटका लागू शकतो! क्रेडिट कार्ड वापरणे यात काहीही चूक नाही! किंबहुना बँकेने तुम्हाला बिनव्याजी पैसे वापरायची सोयच करून दिलेली आहे पण वरचे मुद्दे लक्षात ठेवले तर खिशातून आपल्या निष्काळजीपणामुळे पैसा नक्कीच जाणार नाही! नाही तर क्रेडिट कार्डाच्या वापराने कर्जाच्या विळख्यात सापडलेली अनेक उदाहरणे आहेत.