केंद्र सरकारने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये (१० फेब्रुवारी, २०२४ पर्यंत) एकूण प्रत्यक्ष कर मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेने १७.३० टक्क्यांनी अधिक आहे. करपरतावा (रिफंड) वजा जाता निव्वळ कर वसुली २०.२५ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनी कराच्या माध्यमातून ९.१६ टक्के तर वैयक्तिक प्राप्तिकरामध्ये २५.६७ टक्के वाढ झाली. प्राप्तिकर खात्याने १ एप्रिल, २०२३ पासून १० फेब्रुवारी, २०२४ पर्यंत २.७७ लाख कोटी रुपयांचे परतावे (रिफंड) करदात्यांना दिले आहेत. प्राप्तिकर कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांमुळे करदात्यांची संख्यादेखील वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रश्न : मी ऑक्टोबर, २०२२ मध्ये ठाण्यात एक घर खरेदी केले होते. आता मला ते विकून नाशिकला एक घर खरेदी करावयाचे आहे. मी ठाण्याचे घर विकून त्यावर झालेल्या भांडवली नफ्यावरील कर, नाशिकला घर घेऊन, वाचवू शकतो का?

  • संदीप जोगळेकर

उत्तर : एक घर विकून त्या घरावर झालेल्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याएवढी रक्कम नवीन घरात गुंतविल्यास कर भरावा लागत नाही. करदाता कलम ५४ नुसार वजावट घेऊ शकतो. आपण ऑक्टोबर, २०२२ मध्ये घर विकत घेतल्यानंतर ते २४ महिन्यांच्या आत विकल्यास ती संपत्ती अल्पमुदतीची होते आणि त्यावर होणारा नफा हा “अल्पमुदतीचा” होतो. अशा अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी आपल्याला कलम ५४ नुसार वजावट मिळू शकत नाही. यावर उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागतो. कलम ५४ नुसार वजावट फक्त दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यासाठी मिळते. आपण ऑक्टोबर, २०२४ नंतर (खरेदी केल्या तारखेपासून २४ महिन्यानंतर) ठाण्याचे घर विकून नवीन घर घेतल्यास आपल्याला कलम ५४ नुसार वजावट घेता येईल, कारण ती संपत्ती ऑक्टोबर, २०२४ नंतर दीर्घ मुदतीची होईल.

प्रश्न : मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. मला निवृत्ती वेतन मिळते आणि बँकेतील बचत खात्यावर आणि मुदत ठेवींवर व्याज मिळते. बचत खात्याच्या व्याजावर कलम ८० टीटीएनुसार १०,००० आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक किंवा पोस्ट ऑफिसकडून मिळालेल्या व्याजावर ५०,००० रुपयांपर्यंत ८० टीटीबीनुसार वजावट घेता येते. मी ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे मला दोन्ही कलमानुसार ६०,००० रुपयांपर्यंत वजावट घेता येईल का?

  • शंकर सावंत

उत्तर : कलम ८० टीटीबीनुसार ज्येष्ठ नागरिक जे निवासी भारतीय आहेत त्यांना बँक, सहकारी बँक आणि पोस्ट ऑफिसमधून मिळालेल्या व्याजावर (बचत किंवा मुदत ठेवींवरील व्याज) ५०,००० रुपयांची वजावट घेता येते. जे ज्येष्ठ नागरिक नाहीत किंवा अनिवासी भारतीय आहेत (ज्येष्ठ नागरिक असले तरी) त्यांना या कलमानुसार वजावट घेता येत नाही. त्यांना फक्त बचत खात्यावरील व्याजावर कलम ८० टीटीएनुसार १०,००० रुपयांची वजावट घेता येते. ज्या करदात्यांना कलम ८० टीटीबीच्या तरतुदी लागू आहेत, त्यांना कलम ८० टीटीए नुसार वजावट घेता येत नाही. त्यामुळे आपण ज्येष्ठ नागरिक असाल आणि निवासी भारतीय असाल तर आपल्याला फक्त कलम ८० टीटीबीनुसार ५०,००० रुपयांपर्यंतची वजावट घेता येईल.

प्रश्न : माझी नुकतीच मुंबईला बदली झाली आहे. मी एक जानेवारी, २०२४ पासून एक वर्षासाठी करारनामा करून घर भाड्याने घेतले आहे, त्याचे भाडे महिन्याला ५५,००० रुपये आहे. मला या भाड्यावर उद्गम कर (टीडीएस) कापावा लागेल का? आणि तो कधी आणि कसा भरावा लागेल?

  • एक वाचक

    उत्तर : वैयक्तिक करदाते आणि हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) यांनी कोणत्याही व्यक्तीला वैयक्तिक कारणासाठी दरमहा ५०,००० रुपयांपेक्षा जास्त भाडे दिले तर त्यांना उद्गम कराच्या तरतुदी (कलम १९४-आयबी) लागू होतात. आपले भाडे दरमहा ५५,००० रुपये असल्यामुळे आपल्याला उद्गम कराच्या तरतुदी लागू होतील. यासाठी उद्गम कराचा दर ५ टक्के इतका आहे. हा उद्गम कर आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कापावा लागतो किंवा भाडे करारनामा वर्षाच्या आतमध्ये संपला तर करारनाम्याच्या शेवटच्या महिन्यात उद्गम कर कापावा लागतो. आपला भाडे करारनामा दोन आर्थिक वर्षात विभागला गेला असल्यामुळे आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे मार्च, २०२४ मध्ये तीन महिन्यांच्या भाड्यावर ५ टक्के दराने उद्गम कर कापावा लागेल आणि तो महिना संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत हा उद्गम कर आपल्याला फॉर्म २६ क्यूसीमध्ये चलन भरून तो सरकारकडे जमा करावा लागेल. उद्गम कर जमा करण्याच्या मुदतीनंतर १५ दिवसांत फॉर्म १६ सी डाऊनलोड करावा लागतो. पुढील आर्थिक वर्षासाठी (२०२४-२५), करारनामा संपल्याच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर, २०२४ मध्ये एप्रिल, २०२४ ते डिसेंबर, २०२४ या कालावधीच्या भाड्यावर उद्गम कर कापून तो महिना संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत सरकारकडे जमा करावा लागेल. या घरभाड्यावरील उद्गम कर भरताना टॅन (टॅक्स डिडक्शन अकाऊंट नंबर) घेणे गरजेचे नाही. पॅनवरूनच तो भरता येतो.

प्रश्न : माझा किरकोळ वस्तूंच्या खरेदी-विक्रीचा उद्योग आहे. मागील वर्षापर्यंत मी माझ्या वार्षिक उलाढालीच्या ८ टक्के (रोखीने असल्यामुळे) नफा दाखवून, कलम ४४ एडीनुसार अनुमानित कराच्या तरतुदीनुसार कर आणि विवरणपत्र भरत होतो. यावर्षी माझी वार्षिक उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे आणि माझा नफा ८ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे अनुमानित कराच्या तरतुदीनुसार कर भरल्यास जास्त कर भरावा लागेल. मी प्राप्तिकर कायद्याच्या इतर तरतुदीनुसार कर भरू शकतो का?

  • कृष्णा ठाकूर

उत्तर : आपण करत असलेला उद्योग कलम ४४ एडीनुसार “पात्र उद्योग” असल्यामुळे आणि वार्षिक उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे आपल्याला अनुमानित कराच्या तरतुदी लागू होतात. अनुमानित कराच्या तरतुदीनुसार, आपल्याला ५ वर्षासाठी याच्यानुसार नफा दाखविणे अपेक्षित आहे. या तरतुदीनुसार एकूण उलाढालीच्या ८ टक्के (रोखीने असल्यास ८ टक्के किंवा चेक किंवा डिजिटल स्वरूपात असल्यास ६ टक्के) किंवा त्यापेक्षा जास्त नफा दाखविल्यास तुम्हाला लेखे ठेवणे आणि लेखापरीक्षण करणे बंधनकारक नाही. आपण मागील ५ वर्षात कोणत्याही वर्षी ४४ एडी या कलमानुसार नफा दाखवून विवरणपत्र दाखल केले असेल आणि या वर्षी ४४ एडी या कलमानुसार नफा न दाखविता विवरणपत्र दाखल करावयाचे असेल तर आपल्याला या कलमानुसार लेखे ठेवणे आणि त्याचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक असेल. म्हणजेच आपण एखाद्या वर्षात कलम ४४ एडीनुसार नफा दाखविणे बंद केले तर त्याला पुढील ५ वर्षे लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे. आपले एकूण उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा कमी असेल तर त्यांना अनुमानित कराच्या तरतुदी लागू होत नाहीत.

लेखक मुंबईस्थित सनदी लेखापाल आहेत.

pravindeshpande1966@gmail.com

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra new home investment discount only for long term capital gains mmdc ssb