National Pension System Calculation: अनेक पगारदार लोक त्यांच्या कमाईचा एक मोठा भाग केवळ त्यांच्या गरजा किंवा छंद पूर्ण करण्यासाठी खर्च करतात. यामध्ये निवृत्तीच्या नियोजनाचा ते कोणताही विचार करीत नाहीत. विशेष म्हणजे असे सुरू असताना अनेक वर्ष उलटून गेल्यावर भविष्यातील खर्चाच्या व्यवस्थेबाबत त्यांना चिंता सतावू लागते. असाच प्रकार ३५ वर्षीय आयुषचा आहे. त्याला काम करून १० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण आजपर्यंत त्याने निवृत्तीनंतरच्या उत्पन्नाचा किंवा पेन्शनचा विचारही केलेला नाही. आजपासून २५ वर्षांनंतर जेव्हा तो महागाईकडे पाहतो, तेव्हा निवृत्तीनंतर दरमहा किमान ७० ते ७५ हजार किंवा १ लाखांपेक्षा जास्त रकमेची गरज असल्याचं त्याला भासते.
NPS हा एक चांगला पर्याय
जेव्हा आयुषने आर्थिक नियोजनाचे ज्ञान असलेल्या एका तज्ज्ञाशी सल्लामसलत केली, तेव्हा त्याला सरकारी पेन्शन योजना राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम म्हणजेच NPS बरोबरच इतर काही पर्यायांची माहिती मिळाली. निवृत्तीसाठी हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. ही सरकारची सेवानिवृत्ती बचत योजना असून, केंद्र सरकारने १ जानेवारी २००४ रोजी सुरू केली. या तारखेनंतर नोकरीत रुजू होणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आवश्यक आहे. वर्ष २००९ नंतर ती खासगी कर्मचाऱ्यांसाठीही खुली करण्यात आली.
कोण गुंतवणूक करू शकतो?
१८ ते ७० वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक (सरकारी कर्मचारी किंवा खासगी क्षेत्रातील कर्मचारी) राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत गुंतवणूक सुरू करू शकतो. अनिवासी भारतीय देखील यासाठी पात्र आहेत. NPS मध्ये किमान २० वर्षे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. खाते उघडल्यानंतर वयाच्या ६० वर्षांपर्यंत किंवा मॅच्युरिटी होईपर्यंत योगदान द्यावे लागते.
हेही वाचाः विश्लेषण: सरकारकडून EPFO च्या व्याजदरात वाढ; आतापर्यंत वाढ का रोखली होती?
सेवानिवृत्तीची गणना कशी करावी?
कोणत्या वयात गुंतवणूक सुरू केली: ३५ वर्षे
NPS मध्ये दरमहा गुंतवणूक: १०,००० रुपये
एकूण : २० वर्षे गुंतवणूक
तुमची एकूण गुंतवणूक : ३० लाख रुपये
गुंतवणुकीवर अंदाजे परतावा: १० % प्रतिवर्ष
पेन्शन संपत्ती : ९४,९१,८६२ रुपये
निव्वळ नफा: ६४,९१,८६२ रुपये
पेन्शन वेल्थची वार्षिकी योजनांमध्ये गुंतवणूक: ४० टक्के
वार्षिकी दर: ८ टक्के
एकरकमी मूल्य: ५६,९५११७ रुपये
पेन्शन संपत्ती: ३७,९६७४५ रुपये
मासिक पेन्शन: २५३११ रुपये
SWP मध्ये एकरकमी मूल्य ठेवा म्हणजे ५६.९५ लाख
SWP मध्ये अंदाजे परतावा: १०% प्रतिवर्ष
१ वर्षात व्याज: ५,६९,५१२ रुपये
दरमहा व्याज: ४७,७६० रुपये
एकूण मासिक उत्पन्न: मासिक पेन्शन २५,३११ रुपये आणि SWP कडून ४७,७६० रुपये
(२५,३११ रुपये + ४७,७६० रुपये = ७३०७१ रुपये म्हणजे सुमारे ७३००० रुपये)
तुमचे पैसे कुठे गुंतवले आहेत?
NPS मध्ये जमा केलेली रक्कम गुंतवण्याची जबाबदारी PFRDA ने नोंदणीकृत पेन्शन फंड व्यवस्थापकांना दिली आहे. ते तुमची गुंतवणूक इक्विटी, सरकारी रोखे आणि गैर सरकारी रोख्यांमध्ये तसेच निश्चित उत्पन्न साधनांमध्ये गुंतवतात. नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मध्ये २ प्रकारची खाती उपलब्ध आहेत. यामध्ये टियर-१ खाते हे पेन्शन खाते आहे. तर टियर-२ खाते हे ऐच्छिक बचत खाते आहे. टियर-१ खाते असलेले एनपीएस सदस्य टियर-२ खाते उघडू शकतात.