Money Mantra: गेला आठवडाभर भारतीय शेअर बाजाराची सुरू असलेली नकारात्मक वाटचाल पुन्हा एकदा सावरताना दिसते आहे. सलग सहा दिवस आपटी खाल्ल्यानंतर काल शुक्रवारी शेअर बाजारामध्ये खरेदीदार पुन्हा परतल्याचे चित्र दिसून आले. मध्यपूर्वेतील युद्धसदृश परिस्थिती, अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हचा व्याजदराबाबतचा निर्णय आणि एकूणच जागतिक अस्थिरता याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर झालेला दिसला. प्रमुख निर्देशांकांमध्ये मागच्या आठवड्यामध्ये सुरू झालेली घसरण आज थांबली असे दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा: Money Mantra: युलिप्स योजना वेगळ्या कशा?

रियल इस्टेट, ऊर्जा आणि वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज जोरदार खरेदी दिसून आली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स एक टक्क्याने वाढून ६३७८२ वर पोहोचला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी फिफ्टी १९००० ही पातळी पुन्हा ओलांडून १९०४७ वर बंद झाला. गुरुवारी अमेरिकन स्टॉक मार्केट घसरल्याचे दिसून येत होते. तरीसुद्धा शुक्रवारी बाजारामध्ये उत्साह कायम दिसला. मुख्य निर्देशांकांमध्ये तेजी दिसलीच त्याचबरोबर मिडकॅप आणि स्मॉल कॅप मध्ये सुद्धा तेजी दिसून आली. निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स दोन टक्क्यांनी आणि निफ्टी मिडकॅप इंडेक्स दीड टक्क्यांनी वाढलेला दिसला.

आणखी वाचा: Money Mantra: एनपीएस आणि रिस्क प्रोफाईल

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर उलाढाल दिसून आली. यामध्ये स्टेट बँकेचा शेअर अर्थातच आघाडीवर होता, याचा परिणाम निफ्टी पीएसयू बँक इंडेक्सवर दिसला. आठवड्याभरामध्ये या इंडेक्समध्ये चार टक्क्यांची घसघशीत वाढ दिसली. निफ्टीमधील आघाडीच्या ५० कंपन्यांपैकी जवळपास सर्वच कंपन्या खरेदीदारांच्या यादीत होत्या. कोल इंडिया या कंपनीचा शेअर सर्वाधिक वाढलेला दिसला; ही वाढ तीन टक्क्यांपेक्षा जास्त होती. एचसीएल टेक्नॉलॉजी, ॲक्सिस बँक, स्टेट बँक, बजाज ऑटो यांचे शेअर्स दोन ते तीन टक्क्यांनी वाढले. यूपीएल, आयटीसी, हिंदाल्को, डॉक्टर रेड्डीज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अगदी नाममात्र घसरण दिसून आली.

आणखी वाचा: Money Mantra: Post Retirement Income: रिटायरमेंटनंतरचं उत्पन्न करपात्र की करमुक्त?

निफ्टीची १९ हजाराची खेळी यशस्वी होईल का ?

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे निफ्टी गडगडलेला असला तरी मध्यम आणि दीर्घ काळासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचे चित्र अजूनही आशादायकच आहे. गुंतवणूकदारांसाठी मानसिक दृष्ट्या आधार ठरलेल्या १९ हजार या पातळीच्या वर निफ्टी बंद झाल्याने पुन्हा एकदा १९७०० ही पातळी महत्त्वाची मानली जात आहे.

या आठवड्यामध्ये बाजारातील काही शेअर्समध्ये जोरदार खरेदी झालेली दिसली. यातील काही उल्लेखनीय शेअर्स पुढील प्रमाणे – पंजाब नॅशनल बँक (पाच टक्के), श्रीराम फायनान्स (सात टक्के), सुझलॉन एनर्जी (दोन टक्के), नोव्हार्टीस इंडिया (सहा टक्के), कॅनरा बँक (सहा टक्के), फिनिक्स मिल्स (चार टक्के). श्रीराम फायनान्स आणि कॅनरा बँकेचे शेअर्स ५२ आठवड्याच्या उच्चांक पातळीवर पोहोचले.

रिलायन्स जिओ आणि मारुतीचा निकाल उत्साहवर्धक

मारुती सुझुकी या कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल शुक्रवारी घोषित झाले. या आकड्यांनी बाजाराचा उत्साह वाढवला. मारुती सुझुकीने या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत घसघशीत ८०% ची वाढ नोंदवली. याच कालावधीत मारुतीच्या जवळपास साडेपाच लाख गाड्या विकल्या गेल्या. यामध्ये लहान गाड्यांच्या तुलनेत एसयूव्ही या प्रकारातील गाड्यांच्या विक्रीचे प्रमाण अधिक होते, ही मारुतीच्या दृष्टीने आशादायक बाब मानली पाहिजे. मारुतीच्या वाढलेल्या नफ्याचे श्रेय कमी झालेला उत्पादनाचे खर्च आणि अन्य उत्पन्नातील वाढ हेच आहे. या कालावधीत कंपनीने ६० हजारापेक्षा अधिक गाड्यांची निर्यात केली व एकूण विक्रीमध्ये साडेसहा टक्के वाढ नोंदवली गेली. आठवड्याखेरीस मारुती सुझुकीचा शेअर एक टक्क्यांनी वाढून १०,५४५ रुपयांवर बंद झाला.

भारतीय शेअर बाजारासाठी महत्त्वाचे असलेल्या रिलायन्स जिओ लिमिटेड या कंपनीचा निकाल अपेक्षेप्रमाणेच दमदार जाहीर झाला आहे. जिओच्या व्यवसायामध्ये सुद्धा वाढ होताना दिसते आहे हे महत्त्वाचे. रिलायन्स जिओ या कंपनीचा दुसऱ्या तिमाहीतील नफा १२ टक्क्याने वाढून पाचहजार कोटी रुपये एवढा नोंदवला गेला. कंपनीचे एकूण उत्पन्न मागच्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत नऊ टक्क्यांन वाढले. रिलायन्सच्या शेअर मध्ये १.७७ % वाढ झाली आणि तो २२६५ वर स्थिरावला. जिओ फायनान्सचा शेअर ३ % ने वाढून २२२ वर स्थिरावला.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra share market update maruti reliance jio quarterly results nifty bse sensex israel hamas war effect mmdc vp