टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या भारतातील सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने आपले भविष्यकालीन इरादे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात आहेत हे स्पष्ट केले आहे. ‘टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस’चे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी आपल्या कंपनीच्या शेअर होल्डर्सना लिहिलेल्या पत्रात याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून जागतिक बाजारपेठा अस्वस्थ आहेत तरीही टीसीएसने आपली कामगिरी उत्तम ठेवली आहे. भागधारकांना समाधानकारक डिव्हिडंड देऊन कंपनीने आपली परंपरा कायम राखली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आयटी बिझनेससाठी कठीण काळ सुरू असताना टीसीएस भविष्याची गरज ओळखून आपला बिजनेस आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अधिक बळकट करणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम प्रज्ञा यामुळे भविष्यात आयटी बिझनेसचे रूप बदलणार आहे. यासाठी डिजिटल पायाभरणी करण्याची गरज आहे, असेही चंद्रशेखरन म्हणाले. येऊ घातलेली 5G टेक्नॉलॉजी, इंटरनेट ऑन थिंग्स (IOT) आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स यामुळे ग्राहक आणि कंपन्या दोघांसाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. या अनुषंगाने कोणती प्रॉडक्ट डेव्हलप करावी लागतील यासाठी टीसीएस स्वतःची संशोधन करणारी टीम उभारणार आहे. स्टार्टअप आणि शिक्षण क्षेत्रात संस्थांबरोबर भागीदारी करणे हा सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
जसजसे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे व्यवसायाचे स्वरूप बदलेल तसतसे सध्या असलेले मनुष्यबळ मागे पडू नये म्हणून त्यांना नवीन गोष्टी शिकवाव्या लागतील. प्रशिक्षण द्यावे लागेल, गरज पडल्यास नव्या दमाचे कर्मचारी सुद्धा घ्यावे लागतील, असे चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे. भारतातील आणि जगभरातील उत्तम युवा आणि गुणवंत वर्क फोर्स अर्थात टीसीएसचे कर्मचारी अधिकाधिक सक्षम आणि ज्ञानाने अद्ययावत कसे राहतील याचा कंपनी कायमच विचार करेल, असे चंद्रशेखर यांनी सांगितले. सध्या कंपनीकडे सहा लाखांहून अधिक मनुष्यबळ आहे आणि त्यातील ३५ टक्के महिला आहेत हे महत्त्वाचे ! पुरवठा साखळी (Supply Chain Management ) या व्यवसायांमध्ये खूप मोठ्या संधी आहेत. बदलती भूराजकीय समीकरणे लक्षात घेता भविष्यात व्यापार वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रातून होईल आणि त्यामुळे नव्या पुरवठा साखळ्या निर्माण होताना भारताची भूमिका महत्त्वाची असेल, यासाठी टीसीएस आपली सेवा, सल्ला देईल. ऊर्जा क्षेत्र पुढील काळात आपले व्यवसायाचे स्वरूप बदलणार आहे आणि आपण ‘स्थित्यंतराच्या’म्हणजे व्यावसायिक बदलाच्या (Business Transition )स्थितीमध्ये आहोत. याप्रसंगी नवनवीन उत्पादने, नवीन बिजनेस मॉडेल तयार होताना त्यात माहिती तंत्रज्ञान उद्योग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
टीसीएस भविष्यात नवीन व्यवसाय संधीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करेल. यामध्ये ‘प्रेडिक्टिव्ह ॲनॅलिटिक्स’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. इंटरनेट, समाज माध्यमे आणि एकूणच व्यवहारांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यामुळे प्रचंड प्रमाणात विदा (डेटा) तयार होत असतो. आपल्याकडे उपलब्ध असलेला डेटा वापरून भविष्यातील घटना किंवा ट्रेंड काय असेल, याचे भाकीत वर्तवणे म्हणजेच प्रेडिक्टिव्ह ॲनॅलिटिक्स आहे. ‘जनरेटिव्ह आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ म्हणजेच ‘चॅट जीपीटी’सारखे तंत्रज्ञान वापरून नवीन कंटेंट कसा निर्माण होईल, यावर भरीव संशोधन करण्याची गरज आहे. रशिया-युक्रेन युद्ध, वाढती महागाई आणि वर खाली होणारे कमोडिटीचे दर यामुळे एकूणच जागतिक बाजारपेठेला स्थिरता नव्हती. या वातावरणात व्यवसाय करणे, नवीन क्लाइंट मिळवणे आणि कंपनीसाठी सतत नव्या ऑर्डर तयार करणे हे आव्हानात्मक आहे.
आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी टीसीएसने आपली कामगिरी बाजारपेठेच्या अपेक्षेच्या अनुरूप ठेवली आहे. कंपनीचा एकूण व्यवसाय सव्वादोन लाख कोटीच्या घरात झाला व ही वाढ १७.६% होती. गेल्या आर्थिक वर्षात टीसीएसचा निव्वळ नफा ४२३०३ कोटी रुपये एवढा होता. मागच्या वर्षीपेक्षा त्यात भरीव वाढ झालेली दिसली. मार्च अखेरीस कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन २४.१% होते. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अन्य कंपन्यांपेक्षा ते अधिक आहे. जागतिक बाजारातील अस्थिरतेच्या वातावरणात सुद्धा टीसीएसचे ऑर्डर बुक म्हणजेच टीसीएसच्या हातात असलेल्या एकूण प्रोजेक्टची किंमत ३४.१ अब्ज डॉलर इतकी आहे.