मिलिंद देवगावकर
“नमस्कार!!”
“यावे, यावे!”
“आज इकडे कुणीकडे?”
“अरे बरेच दिवस भेट नाही म्हंटले बघावे असलास तर!” इति विनयराव.
विनयराव आणि बापू शाळेतील मित्र. आता तसे दोघेही रिटायर्ड.तसे म्हणजे नोकरीतून निवृत्त पण काहीतरी उद्योग चालूच.
मधल्या काळात बापू सर्वसाधारण विमा (General Insurance) व्यवसायात उतरले तर विनयरावांनी वकिली सुरू केली.
“अरे अण्णा! दोन कडक चहा पाठव” बापूंनी आवाज दिला.
“नशीब अण्णालाच सांगितलं आहेस म्हणजे चहा मिळणार”
विनयरावांनी हसत हसत टोमणा मारला.
“लेका, आमच्याकडे ‘नाना’ चहावाला नाहीये” बापूंनी विनयच्या पाठीवर थाप मारत टोमणा टोलावला.
“हा! अरे, मी आलो कशाला तर, आता गणपतीत पराग नवीन कार घेतोय.”
“मागे एकदा तू कारच्या पॉलिसीवरील ‘नो क्लेम बोनस’ विषयी बोलला होतास, आता त्याला २/३ वर्षे झाली. तेव्हा म्हंटल आपला हक्काचा माणूस आहे तर समक्ष भेटूनच बोलू आणि समजून घेऊ म्हणून आलो.” -विनयराव.
“साहेब चहा!” अण्णाच्या पोराने दोन कटींग टेबलावर आदळले.
“अरे काही नाही! एकदम सहज सोपे आहे.” बापू चहाचा घोट घेत,घेत उत्तरले.
हेही वाचा : Money Mantra: शेअर बाजारात उतरताय तर ‘हे’ लक्षात ठेवाच!
“परागच्या मारुतीला किती वर्षे झाली?”
“झाली असतील ५ – ६ वर्षे.” विनयरावांनी बापूंना माहिती पुरवली.
“मग ठीक! आता ह्या काळात परागने विमा कंपनीकडून क्लेम घेतला नसेल तर तो ‘नो क्लेम बोनस’ (NCB) चे प्रमाणपत्र (Certificate) मिळण्यासाठी पात्र ठरतो.”.
“मित्रा, मला सांग ह्या नवीन गाडीची किंमत किती?” मिशीवरून आपल्या हाताचा पंजा फिरवत बापूंनी प्रश्न केला.
“साधारण १८ ते २० लाखाच्या घरात.” विनयराव उत्तरले.
“म्हणजे त्याच्या विम्याचा प्रीमियम लाखभर रुपयाच्या आसपास असणार.” बापूंनी अंदाज वर्तवला.
“तर विन्या! ह्या ‘नो क्लेम बोनस सर्टिफिकेट’ मुळे तो एकदम ५०% कमी होईल, आहेस कुठे?”
“तेच मला थोडेबहुत आठवत होते, पण एकदम ४० ते ५० हजार रुपयांनी प्रीमियम कमी होईल याची कल्पना नव्हती.”
“आता समज परागने ५ वर्षे ही गाडी वापरली असा विचार केला तर विन्या सरळसोट दोन ते अडीच लाख रुपये वाचले की लेका!” बापूंनी ग्लासमधील चहा एका घोटात संपवत ग्लास टेबलावर आपटला. “त्यामुळे आता जरी अधिकमास सरला असला तरी, आम्हाला मेहुण म्हणून बोलव आणि घसघशीत दक्षिणा दे!”
“काय?”
असे म्हणून बापूंनी टाळीसाठी हात पुढे केला आणि विनयरावांनी उत्स्फूर्तपणे टाळी दिली.
हेही वाचा : Money Mantra: म्युच्युअल फंड निवडताना काय पाहावे?
मंडळी आपण काय कराल ?
आपल्याला जर गाडीवरचा ‘नो क्लेम बोनस’ घ्यायचा असेल तर खालील गोष्टी जाणून घ्या व त्यांची पूर्तता करून घ्या.
१. ज्या व्यक्तीला गाडी विकणार आहात त्याचे ‘पॅनकार्ड’ व ‘नो क्लेम बोनस’ चे प्रमाणपत्र मिळण्याबाबतचा तुमचा अर्ज तुमच्या विमा कंपनीला द्या.
२. त्या अर्जाच्या अनुषंगाने विमा कंपनी आपल्या गाडीचे सर्वेक्षण (Inspection) करून घेईल.
३. त्या अहवालाच्या (Report) च्या आधारे कंपनी आपल्याला ‘नो क्लेम बोनस’ चे प्रमाणपत्र देईल.
४. हे प्रमाणपत्र आपण नवीन गाडीचा व्यवहार पूर्ण करण्याच्या अगोदर विक्रेत्याला (Dealer) ला देणे.
“काय मग गणपतीत गाडी आणताय ना?”