सुधाकर कुलकर्णी
मागील लेखात आपण इक्विटी म्युचुअल फंडा विषयी माहिती घेतली. आज पण इथे हायब्रिड म्युच्युअल फंडाविषयी माहिती घेऊ. हायब्रिड म्युच्युअल फंडातील गुंतवणूक डेट तसेच इक्विटी इन्स्ट्रुमेन्ट्स मध्ये एका ठराविक प्रमाणात केली जाते , प्रसंगी सोने /चांदी यासारख्या कमोडिटीमध्ये सुद्धा केली जाते. ज्यांना बाजाराचा फायदा घ्यायचा आहे परंतु तेवढी जोखीम घेऊ इच्छित नाही, अशा गुंतवणूकदारांसाठी हा फंड आहे. आपण निवडलेल्या फंडानुसार म्युच्युअल फंड मॅनेजर इक्विटी आणि डेटमध्ये गुंतवणूक करत असतात.
हायब्रिड फंडाचे प्रामुख्याने खालील प्रकार आहेत.
१) मल्टी अॅसेट ऍलोकेशन फंड: या योजनांमध्ये किमान तीन मालमत्ता(अॅसेट)मध्ये प्रत्येक असेट मध्ये किमान १० टक्के इतकी गुंतवणूक करावी लागते, यामुळे गुंतवणूकदारास एकापेक्षा अधिक अॅसेटमध्ये गुंतवणूक करून जोखीम कमी करता येऊ शकते. कोणत्या अॅसेटमध्ये किती गुंतवणूक करावयाची याचा निर्णय फंड मॅनेजर बाजारातील परिस्थितीनुसार घेत असतो.
२) बॅलन्स्ड हायब्रिड फंड: या योजना इक्विटी आणि डेट अॅसेट प्रकारात किमान ४० आणि कमाल ६० टक्के गुंतवणूक करतात. इक्विटी अॅसेट क्लासमधील गुंतवणुकीद्वारे दीर्घकालीन भांडवल निर्मिती आणि डेटमधील गुंतवणुकीतून जोखीम संतुलित करणे हा या फंडाचा प्रमुख उद्देश असतो.
३)डायनॅमिक अॅसेट अॅलोकेशन किंवा बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड: या योजनेत डेट किंवा इक्विटीचे प्रमाण सुनिश्चित नसते तर डेट किंवा इक्विटी मध्ये फंड मॅनेजर ते १०० % इतकी गुंतवणूक करू शकतो. बाजारातील परिस्थितीनुसार यात वरचेवर बदल केला जातो.
४) आक्रमक(अॅग्रेसीव्ह) हायब्रीड फंड: या योजनांना इक्विटीमध्ये किमान ६५ टक्के आणि कमाल ८० टक्के आणि डेटमध्ये २० ते ३५ टक्के गुंतवणूक करणे बंधनकारक आहे. यातून चांगला रिटर्न मिळू शकतो व होणारी कर आकारणी इक्विटीमधील गुंतवणुकीवर लागू होणाऱ्या कर आकारणीप्रमाणे होते.
५) कॉन्झर्व्हेटीव्ह हायब्रिड फंड: या योजनांना त्यांच्या एकूण मालमत्तेपैकी १० ते २५ टक्के रक्कम इक्विटी आणि इक्विटी- इन्स्ट्रुमेन्ट्स गुंतवणे आवश्यक आहे. उर्वरित ७५ ते ९० टक्के रक्कम डेट इन्स्ट्रुमेन्ट्स गुंतवायची आहे. या फंडांचे उद्दिष्ट पोर्टफोलिओच्या डेटमधून कमी जोखीम घेऊन उत्पन्न मिळवणे.
६) आर्बिट्राज फंड: आर्बीट्राज फंड म्हणजे रोख बाजारात खरेदी करणे आणि फ्युचर्स मार्केटमध्ये एकाचवेळी विक्री करणे हे दोन्ही बाजारांमधील किंमतीतील तफावतीचा फायदा घेऊन रिटर्न मिळविणे. एकाचवेळी खरेदी आणि विक्री होत असल्याने इक्विटीवर व्होलॅटॅलीटीचा फारसा परिणाम होत नाही. या योजना इक्विटीमध्ये ६५ ते १०० टक्के आणि डेटमध्ये ० ते ३५ टक्के गुंतवणूक करतात. ज्यांना कमी-जोखीम घ्यायची आहे अशा गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
हायब्रीड फंडातील गुंतवणुकीतील जोखीम त्यात असलेल्या इक्विटीच्या प्रमाणावर अवलंबून असते जितके इक्विटीचे प्रमाण जास्त तितकी गुंतवणुकीतील जोखीम जास्त असते व त्यानुसार रिटर्न ही जास्त असू शकतो. हायब्रिड फंडामुळे आपल्याला आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार गुंतवणूक करता येते व त्यानुसार रिटर्न अपेक्षित करता येतो. ज्यांना इक्विटी फंडास असलेले रिस्क घ्यायचे नाही मात्र काफी प्रमाणात रिस्क घ्यायची तयारी आहे अशा गुंतवणूकदरांसाठी हायब्रिड फंड हा एक उत्तम पर्याय आहे. ३ ते ५ वर्षांसाठी ज्यांना गुंतवणूक करावयाची आहे व मार्केट रिस्क घायचे नाही अशांनी आपल्या सोयीच्या हायब्रिड फंडाचा जरूर विचार करावा.