सुधाकर कुलकर्णी
मागील दोन लेखात आपण इक्विटी व हायब्रीड म्युच्युअल फंडांबाबत सविस्तर माहिती घेतली. आज इथे आपण डेट म्युच्युअल फंडाबाबत सविस्तर माहिती घेऊ. ज्यांना बाजारातील जोखीम घ्यायची नाही मात्र बँक, पोस्ट , पीपीएफ या सारख्या पारंपारिक गुंतवणुकीपेक्षा जास्त परतावा हव आहे व त्यासाठी थोडी जोखीमही घ्यायची तयारी आहे अशांसाठी डेट म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. त्यादृष्टीने डेट फंड म्हणजे काय हे समजून घेऊ.
डेब्ट फंड्स ही अशी म्युच्युअल फंडाची अशी एक योजना आहे की ज्यामध्ये आपण गुंतविलेली रक्कम फिक्स्ड इन्कम इंस्ट्रूमेंटध्ये गुंतवली जाते जसे की सरकारी अथवा मोठ्या खाजगी कंपन्याचे कर्ज रोखे (बॉंड), डिबेंचर्स, कंपनी ठेवी, मनी मार्केट इन्स्ट्रुमेन्ट्स. अशा गुंतवणुकीमुळे नियमित उत्पन्न मिळू शकते शिवाय काही प्रमाणात भांडवल वृद्धी होऊ शकते.
आणखी वाचा-Money Mantra : UPI चा नवा विक्रम, २०२३ मध्ये १०० अब्ज व्यवहारांचा टप्पा केला पार
डेट फंडातील गुंतवणुकीचा एक्स्पेन्स रेशो अन्य योजनांच्या तुलनेने कमी असतो व यातून गुंतवणूकदारास स्थिर परतावा मिळू शकतो , गुंतवणुकीस आवश्यक ती तरलता (लिक्विडीटी) असते व गुंतवणूक तुलनेने जास्त सुरक्षित असते. सर्वसाधारणपणे ज्येष्ठ नागरिकांसाठी यातील गुंतवणूक सोयीस्कर व किफायतशीर असते.
डेट फंडांचे विविध प्रकार असून ते खालील प्रमाणे आहेत.
१) लिक्विड फंड
फारच थोड्या कालावधीसाठी गुंतवणूक करण्याची इच्छा असलेल्यांसाठी लिक्विड फंड ही योजना चांगली आहे. लिक्विड फंडांमध्ये अगदी १ दिवसासाठीही गुंतवणूक करता येते. या योजनेतील गुंतवणूक प्रामुख्याने मनी मार्केट इन्स्ट्रुमेन्ट्स उदा :ट्रेझरी बिल्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, कमर्शिअल पेपर, कॉल मनी आणि नजीकच्या काळात मुदत संपणार असणारे सरकारी रोखे यात केली जाते. या फंडातून रक्कम काढताना (रिडीम करताना ) कुठलाही एक्झिट लोड लागत नाही. अन्य फंडातून पैसे काढतान टी.+२ इतका कलावधी लागतो मात्र पैसे काढल्यास त्याच दिवशी रक्कम गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात लिक्विड फंडातून ट्रान्सफर होतात. हा एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे या गुंतवणुकीतून सुमारे ४ ते ५% इतका परतावा मिळू शकतो व सेव्हिंग्ज खात्याच्या रिटर्नच्या तुलनेने २ ते ३% इतका जास्त मिळू शकतो.
२) गिल्ट फंड
यातील गुंतवणूक प्रामुख्याने सरकारी कर्जरोख्यांमध्ये होत असते. याला जी सेक असेही म्हणतात.अन्य कुठल्याही डेट इन्स्ट्रुमेन्ट्स गुंतवणूक केली जात नाही. गिल्ट फंडमधील सरकारी कर्ज रोखे अल्प मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे असतात. सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवणूक झाली असल्याने गुंतवणूक सुरक्षित असते मात्र बाजारातील व्याज दरातील चढ उतारानुसार गिल्ट फंडाची एनएव्ही कमीअधिक होत असते. व्याजदर कमी झाल्याच्या काळात दीर्घ मुदतीचे गिल्ट फंड चांगला परतावा देऊ करतात तर या उलट व्याज दर वाढले तर परतावा कमी होत असतो.
आणखी वाचा-Money Mantra : प्रश्न तुमचे उत्तरं तज्ज्ञांची
३)अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड
यातील गुंतवणूक ३ ते ६ महिन्यांपर्यंत मुदत संपणार असणाऱ्या डेट इन्स्ट्रुमेन्ट्समध्ये केली जाते. लिक्विड फंडांच्या तुलनेत अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडांमध्ये अधिक जोखीम असते. मात्र, इतर दीर्घ मुदतीच्या फंडांमपेक्षा या फंडात जोखीम कमी असते. बँकांच्या अल्प मुदतीच्या ठेवीपेक्षा यातून थोडा जास्त रिटर्न मिळू शकतो.
४) शॉर्ट टर्म फंड्स
शॉर्ट टर्म फंडात ३ महिने ते १ वर्षाच्या कालावधीपर्यंत गुंतवणूक केली जाते. यातील गुंतवणूक सरकारी रोखे आणि कंपन्यांच्या कमर्शियल पेपरमध्ये (सीपी) बँकांचे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट (सीओडी) गुंतवणूक केली जाते. व्याजदरातील बदलामुळे या फंडांमध्ये लिक्विड आणि अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडाच्या तुलनेत अधिक जोखीम असते.
५) लाँग टर्म फंड
लाँग टर्म फंडात १ ते ३ वर्ष मुदतीसाठी गुंतवणूक केली जाते. सरकारी व खाजगी कंपन्याचे कर्जरोखे , कंपन्यांच्या एफडी, सरकारी मुदत ठेवी , डिबेंचर्स यांमध्ये या फंडाची गुंतवणूक असते.गुंतवणुकीत बॉंड व डिबेंचर्स यांचे प्रमाण जास्त असल्यास इंटरेस्ट रेट रिस्क असते. रक्कम लवकर काढल्यास नुकसान होऊ शकते. व्याजदरातील बदलानुसार फंडाची एनएव्ही कमीअधिक होत असते.
आणखी वाचा-Money Mantra : राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अनिवासी भारतीय नागरिकांनाही कशी ठरते फायदेशीर?
६) फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन (एफएमपी)
या फंडाचा कालावधी फिक्स असतो त्यामुळे यातील गुंतवणूक अशा डेट इन्स्ट्रुमेन्ट्स मध्ये केली जाते की ज्यांचा कालावधी फंडाच्या कालावधीच्या जवळपास संपत असतो. हे फंड बँक मुदत ठेवीच्या तुलनेत थोडा जास्त रिटर्न देऊ शकतात. फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन फंडांमध्ये ९ ते १० टक्के परतावा अपेक्षित असतो मिळेलच असे नाही. या फंडातील गुंतवणुकीचा कालावधी ३ वर्षा पेक्षा जास्त असेल तर इंडेक्सेशनचा फायदा घेऊन काढता येतो. या फंडातील पैसे रोख्यांमध्ये गुंतवले जातात.
७) मंथली इन्कम प्लॅन
दर महिन्याला स्थिर उत्पन्न देण्याच्या उद्देशाने यातील गुंतवणूक फिक्सड इन्कम इन्स्ट्रुमेन्ट्स, प्रेफरन्स शेअर्स तसेच चांगला डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्याचे शेअर्स केली जाते. शेअर्समधील गुंतवणुकीचे प्रमाण अगदी नाममात्र असते. सेवानिवृत्त तसेच ज्येष्ठ वरिष्ठ नागरिकांसाठी हा एक एक चांगला पर्याय आहे. यामध्ये मूळ रक्कम बुडण्याचा धोका अगदी कमी असतो. मात्र,नेमके किती उत्पन्न मिळेल याची खात्री देता येत नाही.
थोडक्यात असे म्हणता येईल की जर आपली थोडी जोखीम घ्यायची तयारी असेल तर आपल्या सोयीनुसार डेट फंड निवडून बँक, पोस्ट यासारख्या पारंपारिक गुंतवणुकीपेक्षा थोडा जास्त परतावा मिळविता येतो तसेच गुंतवणुकीस बऱ्यापैकी लिक्विडीटी सुद्धा असते.