दिलीप सातभाई
प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे काय ?
प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) हा असा एक फॉर्म आहे, ज्यामध्ये प्रत्येक पात्र निवासी/अनिवासी व्यक्तीने आर्थिक वर्षात मिळविलेली त्याच्या उत्पन्नाची कमाई आणि त्यावर देय असणाऱ्या व प्रत्यक्षात भरलेल्या प्राप्तीकरासंबंधीची परिपूर्ण माहिती प्राप्तिकर विभागाकडे दाखल करण्यासाठी वापरला जातो. एका आर्थिक वर्षात कोणतेही उत्पन्न मिळवणाऱ्या पात्र करदात्यांनी हा फॉर्म दरवर्षी सादर करणे बंधनकारक आहे. या विवरण पत्रात पगार, व्यवसाय वा धंद्यातील नफा, स्थावर मालमत्तेमधून मिळणारे जागा/घर भाडे उत्पन्न, लाभांश, भांडवली नफा, गुंतवणूक वा बँका खात्यावरील तसेच मुदत ठेवींवरील व्याज किंवा दिर्घ वा अल्पकालीन भांडवली नफा तसेच इतर स्रोतांमधून मिळालेले उत्पन्न येऊ शकते. दरवर्षी सदर व्यक्तीने विशिष्ट तारखेपर्यंत त्यांचे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणे आवश्यक आहे. याखेरीज सर्व कंपन्या, भागीदारी संस्था, मर्यादित जबाबदारी असलेली भागीदारी म्हणजे एलएलपी, स्थानिक प्राधिकरणांनी उत्पन्न असो वा नसो, हे विवरणपत्र दाखल करणे आवश्यक आहे.
आणखी वाचा : Money Mantra: मालामाल करू शकणारे ‘हे’ नवीन क्षेत्र तुम्हाला माहीत आहे का ?
प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख
यंदाच्या वर्षी ही तारीख सामान्य करदात्यांसाठी ३१ जुलै २०२३ आहे, तर ज्या कंपनी वा इतर करदात्यांना प्राप्तिकर कायदा किंवा इतर अन्य कायद्याअंतर्गत लेखा परीक्षण करून घेणे अनिवार्य आहे किंवा अशा भागीदारीच्या भागीदाराला ज्या भागीदारीचे लेखा परीक्षण करून घेणे अनिवार्य आहे अथवा कलम ५ए अंतर्गत आहे त्यांच्यासाठी मुदत ३१ ऑक्टोबर २०२३ आहे. तर प्राप्तीकर कायद्याच्या कलम ९२इ अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यवहारांचे लेखापरीक्षण करावयाचे असल्यास ३० नोव्हेंबर २०२३ ही अंतिम तारीख आहे. करदात्याने अंतिम मुदत चुकवल्यास विलंब शुल्क व दंड भरणे आवश्यक असते.
आणखी वाचा : Money Mantra: ‘शून्य किमतीचा परिणाम’ म्हणजे काय?
प्राप्तिकर विवरणपत्र कोणी दाखल करावे ?
प्राप्तिकर कायद्यानुसार, एखाद्या निवासी/अनिवासी व्यक्तीचे आर्थिक वर्षात मिळालेले एकूण ‘ढोबळ जमा उत्पन्न’ किमान करपात्र नसलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास प्राप्तिकर विवरणपत्र अनिवार्यपणे दाखल करणे आवश्यक आहे. या वाक्य रचनेत ‘ढोबळ उत्पन्न रक्कम जमा’ असा शब्द वापरला आहे. याचा अर्थ असा की, जरी व्यक्तीचे प्राप्तिकर कायद्या अंतर्गत असणारे करपात्र उत्पन्न वरील किमान मर्यादेच्या आत असले पण ढोबळ उत्पन्न वरील किमान मर्यादेपेक्षा अधिक असेल तर प्राप्तिकर विवरणपत्र भरणे सक्तीचे आहे. यासाठी प्राप्तीकर कायद्यात असणाऱ्या कोणत्याही कर सवलती, वजावटी विचारात घेतल्या जात नाहीत, हे पूर्ण लक्षात ठेवले पाहिजे. एखाद्या व्यक्तीने त्याच्या/तिच्या पॅनवर जमा केलेल्या जास्त करांची माहिती कर विभागाला प्राप्तिकर विवरणपत्रात दाखल करणे आवश्यक असते. प्राप्तिकर विभाग त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीशी प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये दाखल केलेल्या माहितीशी जुळवून घेतो. तपशील बरोबर असल्यास प्राप्तिकर परतावा जारी केला जातो.
आणखी वाचा : आरबीआय रिटेल डायरेक्ट: सरकारी रोख्यांमध्ये थेट गुंतवणुकीची संधी!
उदाहरणार्थ: एखाद्या ४५ वर्षीय करदात्याचे ढोबळ उत्पन्न रुपये तीन लाख असेल व त्याने रुपये साठ हजाराची गुंतवणूक भविष्य निर्वाह निधी व आयुर्विम्यामध्ये केली असेल तर त्याचे प्राप्तिकर कायद्या अंतर्गत असणारे करपात्र उत्पन्न रूपये दोन लाख चाळीस हजार इतके होईल जे किमान करपात्र असणाऱ्या अडीच लाख रुपयांच्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी आहे. अशावेळी सदर व्यक्तीस त्याचे ढोबळ उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याने प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणे अनिवार्य ठरणार आहे याची माहिती अनेकांना आजही नाही. सबब करपात्र उत्पन्न नव्हे तर व्यक्तीचे ढोबळ उत्पन्न प्राप्तीकर विवरणपत्र भरण्याचा मुख्य निकष आहे हे लक्षात घेतले पाहिजे. (क्रमश:)