सलील उरुणकर
आपला व्यवसाय किंवा कंपनी यशस्वी झाली हे कोणत्या निकषांवर आपण ठरवू शकतो? उत्पादन किंवा सेवेच्या विक्रीतून झालेली उलाढाल, नफा, समाधानी ग्राहकांची संख्या की, कंपनीच्या मूल्यांकनावर (व्हॅल्युएशन)? स्टार्टअपच्या विश्वात या प्रश्नाचे उत्तर म्हणजे युनिकॉर्न स्टेटस मिळणे. म्हणजे आपल्या कंपनीचे व्हॅल्युएशन १ बिलियन डॉलर म्हणजे सुमारे ८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक होणे. व्हॅल्युएशनवर यशाचे मोजमाप करायचे की, नफ्यावर हा वेगळा चर्चेचा मुद्दा असला तरी सध्या नवउद्योजकांना आकर्षण आहे ते युनिकॉर्न होण्याचे आणि गुंतवणुकदारांना खूश करण्याचे.
युनिकॉर्न होण्याच्या व झाल्यानंतरच्या प्रक्रियेतही अनेक छोटे-मोठे टप्पे नवउद्योजकांना पार पाडावे लागतात. युनिकॉर्न होण्यापूर्वी स्टार्टअप्सला आपल्या व्हॅल्युएशनचा १ मिलियन डॉलर म्हणजे सुमारे आठ कोटी रुपयांचा टप्पा पार पाडावा लागतो. या टप्प्याला मिनिकॉर्न असे म्हणतात. ज्या स्टार्टअप्स कंपन्या हा टप्पा पार करतात त्यांच्याकडे गुंतवणुकदारांचे बारीक लक्ष असते, कारण या कंपन्यांमध्ये युनिकॉर्न होण्याची क्षमता सिद्ध झालेली असते. मिनिकॉर्नचा टप्पा पार केल्यानंतर पुढचा टप्पा असतो तो सुनिकॉर्न होण्याचा. सुनिकॉर्न म्हणजे अशा स्टार्टअप्स ज्या नजिकच्या कालावधीत युनिकॉर्न होऊ घातलेल्या आहेत. सून-टू-बी-ए-युनिकॉर्न या शब्दांतून ‘सुनिकॉर्न’ हा शब्द तयार करण्यात आला आहे.
आणखी वाचा: मार्ग सुबत्तेचा : गोष्ट संपत्ती संवर्धनाची….
स्टार्टअप युनिकॉर्न होण्याचे स्वप्न प्रत्येक नवउद्योजकाचे असते, मात्र फार कमी लोकांचे हे स्वप्न पूर्ण होते. म्हणूनच जगभरामध्ये लाखो करोडो नवउद्योजक असले किंवा तेवढ्याच संख्येने स्टार्टअप असल्या, तरी युनिकॉर्न असलेल्या कंपन्यांची संख्या दीड हजाराच्या आत आहे तर भारतात १११ (ऑक्टोबर २०२३ पर्यंतची आकडेवारी). देशांतर्गत बंगळूरु, दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई या शहरांमध्ये सर्वाधिक स्टार्टअप्सची नोंदणी आहे. युनिकॉर्नच्या बाबतीत बंगळुरू पहिल्या स्थानावर आहे, तर पुण्यात दहा युनिकॉर्न आहेत. अर्थात व्यवसाय विस्तार जागतिक स्तरावर असल्यामुळे यातील अनेक युनिकॉर्नची मुख्यालये अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झाली असून प्रोडक्ट डेव्हलपमेंट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि कुशल मनुष्यबळ मिळविण्यासाठी पुण्यातील कार्यालये आहेत.
युनिकॉर्नचा पुढचा टप्पा म्हणजे डेकाकॉर्न स्टार्टअप. युनिकॉर्नच्या दहापटीने अधिक म्हणजे १० बिलियन डॉलर व्हॅल्युएशन असलेल्या स्टार्टअप कंपन्यांना डेकाकॉर्न स्टार्टअप म्हटले जाते. जगातील पहिली डेकाकॉर्न कंपनी म्हणून मेटा (तेव्हाची फेसबुक) कंपनीने २०१७ म्हणून नाव नोंदविले. तेव्हा मायक्रोसॉफ्टने केलेल्या गुंतवणुकीनंतर मेटाचे व्हॅल्युएशन दहा बिलियन डॉलरच्या पुढे गेले होते.
डेकाकॉर्नच्या पुढचा टप्पा म्हणजे हेक्टाकॉर्न स्टार्टअप्स. संपूर्ण जगात फक्त दोन कंपन्या – एलॉन मस्कची स्पेस-एक्स आणि चीनमधील बाईट-डान्स या हेक्टाकॉर्न समजल्या जातात. या हेक्टाकॉर्न स्टार्टअपचे व्हॅल्युएशन हे १०० बिलियन डॉलरपेक्षा अधिक असते.
युनिकॉर्न, डेकाकॉर्न किंवा हेक्टाकॉर्न स्टार्टअप्स या बऱ्याचदा स्वतःचा आयपीओ आणतात. पण स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झालेल्या कंपन्यांना व्हॅल्युएशनच्या आधारावर युनिकॉर्न, डेकाकॉर्न, हेक्टाकॉर्न असे संबोधता येत नाही. त्यामुळे या संज्ञा फक्त खासगी कंपन्यांनाच लागू होतात.
स्टार्टअप विश्वामध्ये आता अनेक स्टार्टअप्सची युनिकॉर्नवरून डेकाकॉर्नकडे वाटचाल सुरू झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील चढ-उतार आणि आव्हानांच्या पार्श्वभूमीवर तसेच क्षेत्रनिहाय अडचणींवर मात करीत अनेक स्टार्टअप्स या फंडिंग मिळविण्याच्या प्रयत्नात सध्या आहेत. २०२३ हे वर्ष खरंतर स्टार्टअप्सकरिता अपेक्षेएवढे फलदायी ठरलेले नाही. यावर्षी झेप्टो ही एकमेव कंपनी युनिकॉर्न बनली आहे. पुढच्या वर्षी फंडिंगबाबत स्थिती सुधारेल व त्यामुळे अनेक स्टार्टअप्स या युनिकॉर्न, डेकाकॉर्नच्या यादीत समाविष्ट होतील अशी अपेक्षा आहे.