डॉ. दिलीप सातभाई

केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सार्वभौम सुवर्ण रोख्यांची विक्री दोन मालिकेत जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरहुकूम भारतीय रिझर्व्ह बँकेने या वर्षाच्या पहिल्या मालिकेत सुवर्ण रोख्यांची विक्री १९ जून ते २३ जून २०२३ पर्यंत सुरू राहाणार असल्याचे तर दुसरी मालिका ११ ते १५ सप्टेंबर २०२३ दरम्यान विक्रीसाठी खुली राहाणार असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सदर रोख्यांच्या वाटपाची तारीख अनुक्रमे २७ जून व २० सप्टेंबर २०२३ निश्चित झाल्याचेही स्पष्ट केले आहे. रोखे विक्रीच्या तारखा अगोदरच समजल्याने गुंतवणूकदारांना आर्थिक नियोजनाद्वारे सुवर्ण रोख्यात गुंतवणूक करणे सुलभरित्या शक्य होणार आहे, हा महत्वाचा फायदा ठरावा. सदर रोखे सरकारी प्रतीभूती (सिक्युरिटीज) कायदा, २००६ अंतर्गत जारी केल्याने सर्वोच्च सुरक्षित आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा… Money Mantra: विमान उद्योग बाजारपेठेत गुंतवणूक करावी की, नाही?

सार्वभौम सुवर्ण रोखे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे केंद्राच्यावतीने भौतिक सोने खरेदी करण्याचा एक पर्याय म्हणून जारी केले जातात. ही ​​योजना सरकारने नोव्हेंबर २०१५ मध्ये सुवर्ण मुद्रीकरण योजनेअंतर्गत सुरू केली होती. ही योजना नोव्हेंबर २०१५ मध्ये कार्यान्वित झाल्यापासून, ३१ मार्च २०२१ पर्यंत ३१,२९० कोटी रुपयांच्या सोन्याच्या गुंतवणुकीसह या योजनेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. सदर सुवर्ण रोखे निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब पद्धती, ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्था यांना विक्रीसाठी उपलब्ध असतात.

योजनेची वैशिष्ट्ये

१. सार्वभौम सुवर्ण रोखे कोठे मिळतील ? सार्वभौम सुवर्ण रोखे शेड्यूल्ड कमर्शियल बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नियुक्त पोस्ट ऑफिसेस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज- नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड यांच्याद्वारे विकले जातील. येथेच सुवर्ण रोखे खरेदीचे अर्ज मिळू शकतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. स्मॉल फायनान्स बँका, पेमेंट बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका यांना हे रोखे विकता येणार नाहीत हे स्पष्ट करण्यात आले आहे.

२. किमान व कमाल मर्यादा: हे रोखे सामान्य गुंतवणूकदारास विकत घेता येणे शक्य व्हावे; म्हणून किमान १ ग्राम सोने वजनाचे असतील, जे सामान्य व्यक्तीस सुलभ किंमतीत खरेदी करणे शक्य होणार आहे. सुवर्ण रोखे विकत घेण्याची कमाल मर्यादा व्यक्ती वा हिंदू अविभक्त कुटुंबासाठी प्रत्येकी ४ किलो सोन्याचे रोखे तर विद्यापीठे, सार्वजनिक न्यासासाठी, धर्मादायी संस्थांसाठी २० किलो सोन्याच्या रोख्यांची महत्तम मर्यादा ठरविण्यात आली आहे.

३. सुवर्ण रोख्यांची किंमत : जूनमध्ये विक्रीस येणाऱ्या या सुवर्ण रोख्यांची सोन्याची किंमत रु. प्रती ग्राम ठरविण्यात आली आहे. सदर किंमत सोन्याच्या सद्यबाजार भावाच्या किंमती पेक्षा रु.५९२६ आहे. या साठी गुंतवणूकदाराने ऑनलाईन किंवा डिजिटल पद्धतीने खरेदी करणे अपेक्षित आहे.

४. व्याज दर: या रोख्यांवर अर्धवार्षिक देय अडीच टक्के दराने व्याज मिळणार असून ते करपात्र आहे.

६. रोख्यांचा कालावधी: सदर सुवर्ण रोखे आठ वर्षे मुदतीचे असून पाच वर्षानंतर बाहेर पडण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. सुवर्ण रोखे डिमॅट फॉर्ममध्ये रुपांतरणासाठी पात्र असतील.

७. विक्री किंमत: इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड (IBJA) ने शेवटच्या तीन कामकाजाच्या दिवसांसाठी प्रकाशित केलेल्या ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या बंद किंमतीच्या साध्या सरासरीच्या आधारावर रोख्यांची विक्री किंमत भारतीय रुपयांमध्ये निश्चित केली जाईल.

या योजनेचे फायदे

१. सरकारी योजना : या रोख्यांद्वारे भौतिक सोने मिळणार नसून त्या ऐवजी सोन्याच्या किंमतीचे पैसे मिळणार आहेत. मुला- बाळांच्यासाठी भावी आयुष्यासाठी लागणाऱ्या सोन्याच्या खरेदीचे उत्तम नियोजन करण्यासाठी ही उत्तम सरकारी योजना असल्याने कोठेही फसले जाण्याची शक्यता नसल्याने उत्तम गुंतवणूक पर्याय ठरावा. आरबीआयकडे असलेल्या ९९.९% शुद्ध सोन्याचे समर्थन असलेले, हे रोखे गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित मार्गांपैकी एक आहेत. गुंतवणूकदारांना या रोख्यांच्या तरलतेचा फायदा होऊ शकतो, कारण ते पाचव्या वर्षानंतर हस्तांतरीत केले जाऊ शकतात.

२. रुपयाचे अवमूल्यन: रुपयाचे होणारे अवमूल्यन हे महत्वाचे कारण ठरावे. भारत दरवर्षी साधारणतः एक हजार टन सोने आयात करतो. त्यामुळे आयातीसाठी आपणास डॉलर्स द्यावे लागतात. रुपयाचे मूल्य जरी एक पैशाने कमी झाले तरी दहा ग्रॅम सोन्यामागे अदमासे ५० रुपयांनी सोन्याची किंमत वाढते. २०१४ सालापासून हा विनिमयदर ६० रुपयांपासून ८० रुपयांपर्यंत वाढला आहे व सोन्याची किंमत वाढण्याचे प्रमुख कारण रुपयांचे अवमूल्यन व जागतिक बाजारात वाढणाऱ्या किंमती आहेत. सध्या दर दोन दिवसात हे अवमूल्यन एक पैशाचे होते आहे तर अर्थतज्ज्ञांनी भविष्यात डॉलर्सशी असणारा विनिमय दर रु १०० होईल असे भाकीत केले आहे. त्यातच जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या तडाख्यात सापडली असून गेल्या वर्षाच्या तुलनेने राष्ट्रीय उत्पादन १०% कमी होण्याची शक्यता असल्याने सोन्याचा भाव वाढण्याची अधिक शक्यता आहे. येत्या पाच वर्षात देखील जगभर हे प्रमाण असेच राहील व त्यामुळे सोन्याची किंमत वाढावी असा कयास आहे; सबब हे रोखे उत्तम परतावा देणारा पर्याय ठरावा

३. वैश्विक उत्पादन वाढीच्या अंदाजातील घट: कोरोना विषाणू महासाथीच्या आर्थिक प्रभावामुळे अनिश्चिततेचे सावट आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ऑर्गनायझेशन फॉर इकोनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, मूडीज आणि जागतिक बँकसारख्या संस्थांनी वैश्विक उत्पादन वाढीच्या अंदाजात मोठी घट दर्शविली आहे. जागतिक घडामोडींचा विचार करता अमेरिका आणि चीन या दोन देशांमधील तणाव आता विकोपाला गेला आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी हाँगकाँग आणि चीनवर निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ होत आहे. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती देत आहे व म्हणून सोन्यास भाव येत आहे.

४. गेल्या वर्षात ठेवींपेक्षा अधिक परतावा: कोणतेही आर्थिक संकट येते किंवा बाजारात जेव्हा मोठी उलथापालथ होते, तेव्हा सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये जबरदस्त तेजी येते. त्या त्या वेळेस सोन्यात गुंतवणूक करणे सर्वात चांगला पर्याय समजला जातो. कारण यामध्ये जोखीम कमी आणि भांडवली परतावा चांगला मिळतो असा अनुभव आहे. मागच्या एका वर्षात ठेवींपेक्षा अधिक परतावा मिळाला आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या एका अहवालानुसार सोन्याला जबरदस्त मागणी दिसून आली आहे व ती टिकून राहणार आहे असे त्यांचे मत आहे. याखेरीज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये मौल्यवान धातूंच्या किंमती वाढल्या आहेत (क्रमश:)

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra where to find sovereign gold bonds mmdc dvr
Show comments