Filing Your IT Return : Who can use ITR-1 for FY 2022-23: प्राप्तिकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै अगदी जवळ आली आहे. तुम्ही अद्यापही तुमचे रिटर्न भरले नसल्यास ते शक्य तितक्या लवकर भरून टाका. परंतु तुम्हाला माहिती आहे का? की तुम्हाला तुमचे रिटर्न कोणत्या फॉर्ममध्ये भरायचे आहे? खरं तर प्राप्तिकर विभाग विवरणपत्र भरण्यासाठी अनेक वेगवेगळे फॉर्म देतो. कोणत्या करदात्याने कोणता फॉर्म भरायचा याचा निर्णय त्याचा व्यवसाय, उत्पन्न, उत्पन्नाचा स्रोत यासह अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. फायनान्शिअल एक्स्प्रेसने यासंदर्भात माहिती दिली आहे.
सर्व पगारदार लोक ITR-१ वापरू शकत नाहीत
आयटीआर-१ (सहज) हा प्राप्तिकर रिटर्न भरण्याच्या सर्व फॉर्मपैकी सर्वात सोपा मानला जातो. हा फॉर्म सामान्यतः पगारदार वर्गासाठी असतो, म्हणजे पगार मिळवणाऱ्या नोकरदार लोकांसाठी असतो. परंतु याचा अर्थ असा नाही की, सर्व पगारदार लोक प्राप्तिकर रिटर्न भरण्यासाठी आयटीआर-१ वापरू शकतात. हा फॉर्म केवळ विशिष्ट अटी पूर्ण करणार्यांनाच वापरता येणार आहे. तुम्हीही पगारदार वर्गात येत असाल तर तुम्ही तुमचे रिटर्न भरण्यासाठी ITR-१ वापरू शकता की नाही ते जाणून घ्या.
ITR-१ कोण वापरू शकतो?
निवासी व्यक्ती (resident individual)
ज्यांचे एकूण उत्पन्न २०२२-२३ (आर्थिक वर्ष २०२३-२४) या आर्थिक वर्षात ५० लाखांपेक्षा कमी आहे.
ज्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत पगार, पेन्शन किंवा कौटुंबिक पेन्शन आहे.
ज्यांना जास्तीत जास्त एका घराच्या मालमत्तेतून उत्पन्न मिळाले आहे.
ज्यांचे कृषी उत्पन्न ५००० रुपयांपेक्षा जास्त नाही.
ज्यांनी बँक, पोस्ट ऑफिसमधून व्याज आणि लाभांशाद्वारे इतर उत्पन्न मिळवले आहे.
कोण ITR-१ मध्ये रिटर्न भरू शकत नाही?
ज्या व्यक्तींनी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये खालीलपैकी कोणत्याही स्रोतातून उत्पन्न मिळवले आहे, ते प्राप्तिकर रिटर्न भरण्यासाठी ITR-१ (सहज) फॉर्म वापरू शकत नाहीत.
भांडवली नफा किंवा सट्टा उत्पन्न
ज्यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड, सोने, इक्विटी शेअर्स, हाऊस प्रॉपर्टी किंवा अशी कोणतीही मालमत्ता विकून भांडवली नफा मिळवला आहे ते आयटीआर-१ द्वारे प्राप्तिकर रिटर्न भरू शकत नाहीत. याशिवाय एखाद्या व्यक्तीने घोडेबाजार, लॉटरी, कायदेशीर जुगार यांसारख्या सट्टेबाजीच्या पद्धतींद्वारे कमाई केली असेल तर तो आयटीआर-१ द्वारे प्राप्तिकर भरण्याचा हक्कदार नाही.
हेही वाचाः फॉक्सकॉनची वेदांताशिवायच भारतात सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्याची तयारी, प्लॅन ‘बी’ सज्ज!
क्रिप्टो किंवा इतर आभासी डिजिटल मालमत्तांमधून कमाई
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एखाद्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते, परंतु जर त्याने क्रिप्टोकरन्सी किंवा इतर कोणतीही व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता (VDA) विकून पैसे कमवले असतील, तर तो ITR-१ (सहज) च्या माध्यमातून प्राप्तिकर रिटर्न भरू शकत नाही.
एकापेक्षा जास्त घरांच्या मालमत्तेतून उत्पन्न
जर एखाद्या व्यक्तीच्या एकूण उत्पन्नात एकापेक्षा जास्त घरांच्या मालमत्तेतील उत्पन्नाचा समावेश असेल तर तो ITR-१ द्वारे रिटर्न देखील भरू शकत नाही. जर तुमच्याकडे दोन घरे असतील आणि तुम्हाला भाड्याच्या घरातून तोटा पुढे करायचा असेल, तर तुम्हाला रिटर्न भरण्यासाठी ITR-१ ऐवजी ITR-२ वापरावे लागेल.
NRI किंवा RNOR श्रेणी अंतर्गत येणारे रहिवासी
जे लोक अनिवासी भारतीय (NRI) आहेत किंवा ‘सामान्यतः भारतात राहणाऱ्या’ च्या (Resident Not Ordinarily Resident) श्रेणीत येतात, ते देखील ITR-१ फॉर्मद्वारे प्राप्तिकर रिटर्न भरू शकत नाहीत.
असूचिबद्ध समभागांमध्ये गुंतवणूक करणारे आणि कंपन्यांचे संचालक
ज्या प्राप्तिकर दात्यांनी असूचिबद्ध इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे किंवा कोणत्याही कंपनीत संचालक आहेत तेदेखील प्राप्तिकर रिटर्न भरण्यासाठी ITR-१ फॉर्म वापरू शकत नाहीत. याशिवाय तुमच्या बँकेने प्राप्तिकर कायद्याच्या कलम १९४ एनअंतर्गत खात्यातून पैसे काढण्यासाठी TDS कापला असला तरीही तुम्ही ITR-१ द्वारे रिटर्न भरू शकत नाही.
घराच्या मालमत्तेच्या विक्रीवर LTCG सूट दावा
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये विकल्या गेलेल्या घराच्या मालमत्तेवर प्राप्तिकर कायद्याच्या ५४ अन्वये दीर्घकालीन भांडवली नफ्यावर (LTCG) कर सवलतीचा दावा करायचा असला तरीही तुम्ही ITR-१ द्वारे रिटर्न दाखल करू शकत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला ITR-२ चा वापर करावा लागेल.
हिंदू अविभक्त कुटुंब (HUF)
प्राप्तिकर कायद्यांतर्गत हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) च्या श्रेणीत येणारे लोक देखील ITR-१ द्वारे प्राप्तिकर रिटर्न भरू शकत नाहीत.
परदेशी मालमत्तेचा मालक
ज्या लोकांकडे कोणत्याही प्रकारची विदेशी मालमत्ता आहे, ते आयटीआर-१ द्वारे प्राप्तिकर रिटर्न भरू शकत नाहीत. या विदेशी मालमत्तेत आर्थिक मालमत्तांचाही समावेश आहे. याशिवाय जर एखाद्या व्यक्तीने परदेशात बँक खात्यावर स्वाक्षरी केली असेल तर तो देखील ITR-१ वापरू शकत नाही.