मुलाखत – सचिन रोहेकर
तंत्रज्ञानाधारित नवकंपन्या वित्तीय क्षेत्राचा अवकाश वेगाने व्यापू लागल्या आहेत. तंत्रज्ञानाधारित कौशल्यांचा खुबीने वापर आणि त्यायोगे उत्कृष्ट हमीदारीतून, देशातील लघु उद्योजक, किरकोळ विक्रेते, व्यापारी, व्यावसायिक आणि लहान उत्पादकांना (एमएसएमई) तात्काळ खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी तारणमुक्त कर्ज प्रदान करण्यासह, त्यांची आर्थिक तरलता व्यवस्थापित करण्यात ‘यू ग्रो कॅपिटल’सारख्या बँकेतर वित्तीय कंपनीची भूमिका मोलाची राहिली आहे. एमएसएमई क्षेत्रावर केंद्रित यू ग्रो कॅपिटलचे कार्यकारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शचिंद्र नाथ यांनी त्यांच्या या लक्ष्यित क्षेत्रासंबंधीच्या योजना आणि नियामक तसेच सरकारकडून असलेल्या अपेक्षांविषयी ‘लोकसत्ता’शी साधलेला हा संवाद.
प्रश्न : एमएसएमईसारख्या नवीन विभागाला वाढीसाठी खूप मोठा वाव आहे आणि या संदर्भात तुमची बांधिलकी लक्षात घेता, यू ग्रो कॅपिटलला दिसून येणारी संधी आणि आव्हाने कोणती?
शचिंद्र नाथ: कर्ज बाजाराचा एक भाग म्हणून एमएसएमई हा घटक नवीन नाही. भारतातील या घटकाची होत असलेली कर्ज उपासमार अजूनही मोठी आहे. तथापि हे एकसमान नसलेले आणि मोठी विषमता असलेले क्षेत्र आहे. परिणामी कर्जदात्यांची स्थितीही स्वाभाविकच अवघड बनली आहे. सहन करण्यायोग्य नुकसान गुणोत्तरासह या घटकाला दिल्या जाणाऱ्या कर्जाची हमीदारी निश्चित करणे त्यांच्यासाठी कठीण आहे. आम्ही या विभागातील कर्जदारांसाठी विविध डिजिटल आणि भविष्यसूचकता साधनांचा अवलंब आणि ती सतत विकसित करत आहोत. हेच कारण असावे की, आम्ही ग्राहक म्हणून लक्ष्य केलेल्या सध्याच्या मार्गात आम्हाला तूर्त तरी कोणते आव्हान दिसून येत नाही.
हेही वाचा – कधी ऊन वा असो सावली…
प्रश्न : जबरदस्त तडाखा दिलेल्या करोना महासाथीच्या संकटपश्चात लहान व्यवसायांच्या पुनरुज्जीवनाबद्दल तुमचे काय मत आहे? एमएसएमईंना पुन्हा वाढीच्या प्रवाहात आणण्यासाठी सध्या तुम्हाला किती अंतर दिसून येते?
शचिंद्र नाथ : कोविड प्रतिकूलतेतही, लहान व्यवसाय त्यांचे स्थान टिकवून ठेवण्याचा आणि स्वतःला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. सरकारी मदत योजनेतून काही एमएसएमईंना अतिरिक्त कर्ज आणि प्रचलित कर्जफेडीला मुदत वाढवून मिळाल्याने त्यांना या कठीण काळात व्यवसाय चालू ठेवण्यास मदत झाली. परंतु, जर फेरउभारीची गती मंद असेल तर, त्यापैकी बरेचजण परतफेड करू शकणार नाहीत आणि अतिरिक्त कर्जासाठी त्यांनी तारण ठेवलेल्या सर्व मालमत्ताही ते गमावून बसतील. म्हणूनच त्यांच्या व्यवसायांना मागणी निर्माण करण्यासाठी योग्य ती पावले आणि त्या दिशेने खूप चांगल्या प्रकारे विचार झाला पाहिजे. मागणी वाढवण्यासाठी ‘व्होकल फॉर लोकल’ उपक्रमाला बळकटी देण्यासाठी अजूनही बरेच काही करता येईल.
प्रश्न : एमएसएमई क्षेत्राला आवश्यक संजीवनी आणि पुनरुज्जीवित करण्याबाबत तुम्ही सरकारला कोणत्या सूचना देऊ इच्छिता?
शचिंद्र नाथ : भारतातील एमएसएमईच्या पुनरुज्जीवन आणि वाढीमध्ये बँकेतर वित्त क्षेत्राची (एनबीएफसी) भूमिका मोठी आहे, असा आमचा विश्वास आहे. सरकार आणि रिझर्व्ह बँकेने एक दिशादर्शक आराखडा प्रदान करणे आवश्यक आहे ज्यामध्ये एमएसएमईकेंद्रित एनबीएफसीमधील तरलतेला चालना मिळेल. आणखी एक मार्ग म्हणजे प्राधान्य क्षेत्रातील कर्जांमध्ये एमएसएमई कर्जाचे भारमान (वेटेज) वाढवणे आणि एनबीएफसीची एक विभक्त श्रेणी तयार करणे आणि ‘एनबीएफसी एमएसएमई’ म्हणून तिची वेगळी नोंद घेतली जावी. अशा एनबीएफसीला बँकांकडून दिलेले कोणतेही कर्ज प्राधान्य क्षेत्र कर्ज म्हणून पात्र धरले गेले पाहिजे. यामुळे केवळ एमएसएमईंना सेवा देणाऱ्या एनबीएफसीची संपूर्ण नवीन श्रेणी तयार होईल. अत्यंत आनंदाने सांगावेसे वाटते की, आम्ही १० हून अधिक सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बँका आणि मोठ्या एनबीएफसीसह ‘को-लेंडिंग’ संबंध प्रभावीपणे कार्यान्वित केले आहेत आणि ‘ग्रो एक्स्ट्रीम’ व्यासपीठाद्वारे त्यांच्या व्यवसायात १५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात योगदान आम्ही दिले आहे.
प्रश्न : तुमच्या मुख्य कर्ज व्यवसायाबद्दल बोलताना, तुम्ही कोणती ठोस लक्ष्ये निश्चित केली आहेत काय?
शचिंद्र नाथ : एक सूचिबद्ध कंपनी म्हणून, आम्ही भविष्यातील कोणत्याही अंदाजांसंबंधी भाष्य अथवा दिशादर्शन करण्याचे जाणीवपूर्वक टाळतो. तथापि, आमचे सूचित उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे. आम्ही पुढील पाच वर्षांमध्ये सर्वात मोठ्या लघु आणि सूक्ष्म-व्यवसाय वित्तपुरवठा व्यासपीठांपैकी एक बनू इच्छितो. या क्षेत्राला वार्षिक १२ ते १५ टक्के दराने वित्तपुरवठा वाढण्याची अपेक्षा आहे आणि २०२५ आर्थिक वर्षापर्यंत ते सुमारे २२ हजार कोटी रुपयांवर जाईल, असे आमचे नियोजन आहे. म्हणजेच त्यासमयी एमएसएमई पतपुरवठ्याच्या क्षेत्रात १ टक्का बाजार हिस्सा आमच्याकडून मिळविला जाईल.
प्रश्नः यू ग्रो कॅपिटलने अलीकडेच त्यांच्या लक्ष्यित ग्राहकांसाठी नवीन सेवा प्रस्तुत केली आहे, त्याबद्दल विस्ताराने सांगू शकाल?
शचिंद्र नाथ : आज भारतातील जवळपास साडेसहा कोटी एमएसएमई हे ११ कोटींहून अधिक लोकांना रोजगार देतात आणि देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये (जीडीपी) त्यांचा वाटा सुमारे ३० टक्के आहे. मात्र, वेळेवर पतपुरवठा होत नसल्याने या क्षेत्राला त्याच्या क्षमतेचा पुरेपूर प्रत्यय देता येत नाही. यू ग्रो कॅपिटलने नुकत्याच प्रस्तुत केलेल्या ‘ग्रो एक्स ॲप’चे उद्दिष्ट हे डेटा विश्लेषण आणि तंत्रज्ञानाचा वापर करून लहान व्यवसायांची कर्जाची आवश्यकता विनाविलंब पूर्ण करणे आहे. लघु व्यावसायिक ग्राहक या ॲपचा वापर करून, त्वरित छोट्या-मोठ्या गरजा भागवण्यासाठी लवचीक आणि परवडणारे कर्ज मिळवू शकेल. हे ‘यूपीआय’संलग्न व्यासपीठ असलेल्या आणि कर्ज हे पतसीमा अर्थात क्रेडिट लाइन रूपात दिले जात असल्याने, त्यातील जितकी रक्कम, जितक्या दिवसासाठी वापरली तेवढ्यापुरतेच व्याज त्यावर आकारले जाईल.
(ईमेलः sachin.rohekar@expressindia.com)