म्युच्युअल फंडांमध्ये एक ”मल्टिकॅप” नावाचा फंड गट आहे. भांडवली बाजार नियामक सेबीच्या व्याख्येप्रमाणे यात लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप या प्रत्येकात किमान २५ टक्के गुंतवणूक आवश्यक आहे. उरलेले २५ टक्के निधी व्यवस्थापक (फंड मॅनेजर) त्याच्या मर्जीनुसार कोणत्याही कॅपमध्ये गुंतवू शकतो. जसे, फ्लेक्झीकॅप फंड गटात फंड व्यवस्थापकाला गुंतवणुकीचे पूर्ण स्वातंत्र्य असते, तसे मल्टिकॅप गटात वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कॅपमध्ये किमान गुंतवणुकीचे बंधन असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Money Mantra: नारायण मूर्तींनी नातवाला दिलेल्या २४० कोटींच्या भेटीवर किती टॅक्स बसणार?

म्युच्युअल फंडाची शिखर संस्था असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया अर्थात ॲम्फी दर सहा महिन्यांनी मार्केटकॅप अर्थात बाजारभांडवलाप्रमाणे कंपन्यांची एक यादी जाहीर करते. यात लार्ज, मिड आणि स्मॉलकॅपप्रमाणे कंपन्यांचे वर्गीकरण असते. आपण त्यातील वेगवेगळ्या बाजारभांडवलाप्रमाणे बघितले तर फेब्रुवारी २०२४ अखेरीस मागील एका वर्षाचा निफ्टी १००, निफ्टी १५० मिडकॅप आणि निफ्टी स्मॉलकॅप २५० (सर्व परतावा टोटल रिटर्न इंडेक्सप्रमाणे) यांचा परतावा, अनुक्रमे ३३.२६ टक्के, ५७.२८ टक्के आणि ६८.८० टक्के असा राहिला आहे. गेल्या १० वर्षांतील इतिहासाने हे दाखवून दिले आहे की, लार्ज, मिड आणि स्मॉलकॅप समभागांशी संबंधित परतावा कालानुरूप बदलत राहतो. मागील ५ वर्षांचा कालावधी पाहिल्यास वरील लार्जकॅप इंडेक्सपेक्षा मिड आणि स्मॉल कॅप इंडेक्समधील परतावा सरस राहिला आहे. त्यामुळे तुलनात्मकरीत्या लार्जकॅपपेक्षा मिड आणि स्मॉलकॅप समभागांमधील गुंतवणुकीमध्ये अधिक जोखीम (किमतीतील चढ-उतार) असली तरी दीर्घकालीन ध्येयपूर्तीसाठी (८-१०-१५ वर्षे) मल्टि कॅप फंडात गुंतवणूक करणे हे योग्य नियोजन ठरेल. यात प्रत्येक कॅपमध्ये किमान २५ टक्के गुंतवणुकीचे बंधन असल्यामुळे जरी फंड व्यवस्थापकाच्या गुंतवणूक धोरणांमधील लवचीकतेवर मर्यादा आल्या तरी लार्जकॅपबरोबरच मिडकॅप आणि स्मालकॅपच्या समावेशामुळे दीर्घकालीन उद्दिष्टपूर्तींसाठी परताव्याचे प्रमाण सुदृढ राहू शकते.

किमान २५ टक्के लार्ज, मिड आणि स्मॉलकॅपमध्ये गुंतवल्यावर उरलेले २५ टक्के फंड व्यवस्थापक त्याच्या अभ्यासानुसार कोणत्याही कॅपमध्ये गुंतवू शकतो. फंड व्यवस्थापक गुंतवणुकीचे निर्णय विविध माहितीच्या आधारावर घेत असतो. जसे की, ”मिन रिव्हर्शन” वेगवेगळ्या कॅपमध्ये जास्तीची गुंतवणूक (ओव्हरवेट) करण्याची वेळ ठरवतो, तसेच ”मोमेम्टम” हा सूचक (इंडिकेटर) समभागात किती काळ गुंतवणूक ठेवायची याची दिशा दाखवतो.

जागतिक दृष्टीकोनातून आपल्या देशाचा विचार करायचा झाल्यास भारतात महागाई बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवली गेली आहे. वस्तू आणि सेवा कर अर्थात ”जीएसटी”च्या माध्यमातून दर महिन्याला सरासरी १.६० लाख कोटी रुपयांचा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा होतो आहे. घरबांधणी क्षेत्रातही मागणी वाढते आहे. विद्युत वस्तू निर्यातीमध्ये भारताचे योगदान वाढते आहे. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये (इमर्जिंग मार्केट) भारताची प्रगती आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना भारतातील गुंतवणुकीतून मिळणारा दीर्घकालीन परतावा हा उच्च राहिला आहे. जगातील एक षष्टमांश माणसे भारतात राहतात. एका बाजूला साधन सुविधांवर पडणारा ताण स्पष्ट दिसतो आहे. मात्र दुसऱ्या बाजूने सकारात्मक विचार केल्यास आज १४० कोटी माणसांची क्रयशक्ती सर्व जगाला आपल्याकडे खेचून घेत आहे. प्रत्येकाला भारतात माल विकायचा आहे.

हेही वाचा : मार्ग सुबत्तेचा : राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनपीएस): फायदे आणि तोटे

भारतातील लार्ज कॅप कंपन्या अजूनही जागतिक मानांकनानुसार मिडकॅप आहेत आणि त्यांना वाढीस अमाप वाव आहे. मिड आणि स्मॉलकॅपमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्या येतात. जोखीम जास्त असली तरी अशी मल्टिकॅप गुंतवणूक निव्वळ लार्ज कॅप फंडांपेक्षा जास्त परतावा देऊ शकेल. काही मल्टिकॅप फंडांचा परतावा कोष्टकात देत आहे. व्यवसायातील कितीतरी चांगली नावे मिड आणि स्मॉलकॅपमधून येतात. गेल्या १० वर्षांत मिडकॅप आणि स्मॉलकॅपचे एकूण बाजारातील योगदान वाढते आहे. वर्ष २००८ मध्ये वीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजारभांडवल असणाऱ्या २७ कंपन्या होत्या, २०२३ मध्ये हा आकडा २९२ वर पोहोचला आहे, यावरून चित्र स्पष्ट आहे.

दीर्घकालीन वित्तीय ध्येय जसे की, मुलांचे शिक्षण, त्यांची लग्ने, स्वतःची सेवानिवृत्ती यासाठी मल्टिकॅप फंडात जरूर गुंतवणूक करावी, गुंतवणुकीचा हा त्रिवेणी संगम तुम्हाला शुभदायी ठरेल.

लेखक मुंबईस्थित वित्तीय समुपदेशक आहेत.
sameernesarikar@gmail.com
समाप्त

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mutual fund investment in multi cap fund print eco news css
Show comments