म्युचुअल फंडातील गुंतवणूक दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून त्याकडे गुंतवणूक करणाऱ्यांचा ओढा वाढतो आहे. म्हणून म्युचुअल फंडातील गुंतवणुकीवर कर आकारणी कशी केली जाते, हे जाणून घेतले पाहिजे. त्यानुसार योग्य करनियोजन करून यावरील कर वाचवता येऊ शकतो.
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर दोन प्रकारचे उत्पन्न मिळते. एक म्हणजे लाभांश आणि दुसरे फंडातील युनिटच्या विक्रीवर होणारा नफा. हे दोन्ही उत्पन्न करपात्र उत्पन्नात गणले जाते.
लाभांश :
फंडावरील लाभांश हे इतर उत्पन्न या सदरात करपात्र आहे आणि गुंतवणूकदाराला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे त्यावर कर भरावा लागतो. या लाभांशावर १० टक्के उद्गम कर कापण्याची तरतूद देखील आहे. १ एप्रिल, २०२५ पासून १०,००० रुपयांपेक्षा जास्त (३१ मार्च, २०२५ पूर्वी ५,००० रुपयांपेक्षा जास्त) लाभांश असेल तर हा उद्गम कर कापला जातो.
भांडवली नफा :
म्युचुअल फंडातील युनिटच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा करपात्र आहे. यावरील करआकारणी फंडाच्या प्रकारावर आणि गुंतवणुकीच्या धारणकाळावर अवलंबून असते. कर आकारणीसाठी फंड हे दोन प्रकारात विभागले जातात. एक म्हणजे समभाग संलग्न फंड (इक्विटी फंड) आणि दुसरा रोखे फंड (डेट फंड). जे फंड आपल्या गुंतवणुकीपैकी ६५ टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक इक्विटी फंडामध्ये करतात, ते फंड इक्विटी फंड म्हणून ओळखले जातात. जे फंड इक्विटी फंड नसतात, ते रोखे संलग्न फंड म्हणून ओळखले जातात. याशिवाय काही फंड हायब्रिड किंवा संतुलित फंड (बॅलन्स फंड) असतात. हेसुद्धा फंडाच्या गुंतवणुकीच्या स्वरूपानुसार इक्विटी किंवा डेट फंडामध्ये विभागले जातात.
इक्विटी फंडातील गुंतवणुकीचा धारणकाळ गुंतवणुकीच्या धारणकाळानुसार त्यावर झालेल्या भांडवली नफ्यावर कर आकारणी केली जाते. हा धारणकाळ इक्विटी फंड आणि डेट फंडासाठी वेगवेगळा आहे. इक्विटी फंडातील युनिटची विक्री-खरेदी केल्या तारखेपासून १२ महिन्यांनंतर केल्यास ती गुंतवणूक दीर्घमुदतीची होते अन्यथा ती अल्पमुदतीची असते.
इक्विटी फंडातील युनिटच्या विक्रीवरील भांडवली नफा :
इक्विटी फंडातील युनिट खरेदी केल्या तारखेपासून १२ महिन्यांनंतर विकल्यास त्यावर होणारा दीर्घमुदतीचा भांडवली नफा १,२५,००० रुपयांपेक्षा कमी असल्यास त्यावर कर भरावा लागत नाही. हा नफा १,२५,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यानंतरच्या रकमेवर १२.५० टक्के (२३ जुलै, २०२४ पूर्वी विकल्यास १० टक्के) कर आकारला जातो. दीर्घमुदतीचा भांडवली नफा गणताना महागाई निर्देशांकाचा लाभ घेता येत नाही. करदात्याने इक्विटी फंडातील गुंतवणूक १ फेब्रुवारी २०१८ पूर्वी केली असेल तर त्याच्यासाठी दीर्घमुदतीचा भांडवली नफा गणण्यासाठी वेगळी तरतूद आहे. अशा फंडातील युनिटच्या विक्रीवरील भांडवली नफा गणताना त्याचे खरेदी मूल्य पुढील (१) आणि (२) मधील जे जास्त आहे ते (१) युनिटचे खरेदी मूल्य, आणि (२) (अ) ३१ जानेवारी, २०१८ रोजीचे वाजवी बाजार मूल्य आणि (ब) विक्री मूल्य, या (अ) आणि (ब) मधील जे कमी आहे ते. यानुसार खरेदी मूल्य गणून दीर्घमुदतीचा भांडवली नफा गणावा लागतो.
२०२४-२५ या आर्थिक वर्षाचा भांडवली नफा गणताना करदात्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कारण या आर्थिक वर्षासाठी भांडवली नफा हा दोन काळात विभागावा लागेल. एक २३ जुलै २०२४ पूर्वी आणि दुसरा २४ जुलै २०२४ नंतर, कारण या दोन्ही काळासाठी भांडवली नफा गणण्याची पद्धती आणि कराचा दर वेगवेगळा आहे.
उदा. २३ जुलै २०२४ पूर्वी विकलेल्या इक्विटी फंडावरील गुंतवणुकीवर दीड लाख रुपयांचा दीर्घमुदतीचा भांडवली नफा झाला आणि २४ जुलै २०२४ नंतर विकलेल्या गुंतवणुकीवर १ लाख रुपयांचा दीर्घमुदतीचा भांडवली नफा झाला. इक्विटी फंडाच्या विक्रीवर (ज्यावर एसटीटी भरला गेला आहे) होणाऱ्या भांडवली नफ्याच्या करासाठी कलम ११२ ए लागू होते आणि त्यानुसार प्रथम १,२५,००० रुपयांपर्यंत कर भरावा लागत नाही आणि त्यापेक्षा जास्त रकमेवर १० टक्के कर (२३ जुलै २०२४ पूर्वी विकल्यास) आणि १२.५० टक्के कर (२४ जुलै २०२४ नंतर विकल्यास) भरावा लागतो. त्यामुळे आपल्याला २४ जुलैनंतर झालेल्या १ लाख रुपयांच्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागणार नाही (प्रथम १,२५,००० रुपयांपर्यंतच्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावर कर नाही). २३ जुलै २०२४ पूर्वी झालेल्या दीड लाख रुपयांच्या नफ्यापैकी २५,००० रुपयांवर कर भरावा लागणार नाही (प्रथम १,२५,००० रुपयांपर्यंतच्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावर कर नाही त्यातील १ लाख रुपये २४ जुलै २०२४ नंतर झालेल्या भांडवली नफ्यासाठी उपयोगात आणले) त्यामुळे बाकी १,२५,००० रुपयांवर १० टक्के इतका म्हणजे १२,५०० रुपये कर भरावा लागेल. (अधिक ४ टक्के आरोग्य आणि शैक्षणिक कर)
इक्विटी फंडातील युनिट खरेदी केल्या तारखेपासून १२ महिन्यांच्या आत विकल्यास त्यावर होणाऱ्या अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यावर, युनिट २३ जुलै २०२४ पूर्वी विकल्यास १५ टक्के कर आणि युनिट २४ जुलै २०२४ नंतर विकल्यास २० टक्के आकारला जातो. यासाठी सुद्धा अट अशी आहे की, याच्या विक्री किंवा रिडम्शनवर भांडवली बाजार रोखे कर (एसटीटी) भरला गेला असला पाहिजे.
डेट फंडातील युनिटच्या विक्रीवरील भांडवली नफा :
डेट फंडातील युनिट खरेदी केल्या तारखेपासून २४ महिन्यांनंतर (२३ जुलै २०२४ पूर्वी ३६ महिने) विकल्यास त्यावर दीर्घमुदतीचा भांडवली नफा होतो. हे युनिट २३ जुलै २०२४ पूर्वी विकल्यास त्यावरील नफा गणताना महागाई निर्देशांकाचा लाभ घेता येईल आणि त्यावर २० टक्के (अधिक ४ टक्के शैक्षणिक आणि आरोग्य कर) कर भरावा लागेल. हे युनिट २४ जुलै २०२४ नंतर विकल्यास त्यावरील नफा गणतांना महागाई निर्देशांकाचा लाभ घेता येणार नाही आणि त्यावर १२.५० टक्के (अधिक ४ टक्के शैक्षणिक आणि आरोग्य कर) कर भरावा लागेल. ही तरतूद डेट फंडातील युनिट १ एप्रिल २०२३ पूर्वी खरेदी केले असतील तरच लागू होते.
उदा. जून २०२२ मध्ये खरेदी केलेले ३ लाख रुपयांचे डेट फंडातील युनिट ऑक्टोबर, २०२४ मध्ये ३,५०,००० रुपयांना विकले. हे युनिट ऑक्टोबर, २०२४ मध्ये (म्हणजेच २४ जुलै, २०२४ नंतर) विकले आहेत, म्हणजेच खरेदी केल्या तारखेपासून २४ महिन्यांनंतर विकल्यामुळे ही संपत्ती दीर्घ मुदतीची होते आणि त्यावर नफा हा दीर्घमुदतीचा असेल. हे युनिट २४ जुलै २०२४ नंतर विकल्यामुळे इंडेक्सेशनचा लाभ मिळणार नाही. यावर झालेल्या ५०,००० रुपयांच्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावर १२.५० टक्के इतका म्हणजे ६,२५० रुपये (अधिक ४ टक्के आरोग्य आणि शैक्षणिक कर) कर भरावा लागेल.
डेट फंडातील युनिट १ एप्रिल २०२३ नंतर खरेदी केलेले असल्यास आणि या युनिटचा धारण काळ २४ किंवा ३६ महिन्यांपेक्षा जास्त असला तरी, त्यावर होणारा भांडवली नफा हा अल्पमुदतीचाच असेल. या नफ्यावर करदात्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागेल.
© The Indian Express (P) Ltd