वर्ष १९९९ मध्ये स्थापन झालेली पीएनसी इन्फ्राटेक लिमिटेड ही देशातील पायाभूत सुविधा विकास, बांधकाम आणि व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक आघाडीची आहे. कंपनी महामार्ग, पूल, उड्डाणपूल, पॉवर ट्रान्समिशन लाइन्स व टॉवर्स, विमानतळ धावपट्टी, औद्योगिक क्षेत्र विकास तसेच इतर पायाभूत सुविधांचे उपक्रम आणि प्रकल्प हाती घेते. पायाभूत सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी आणि उपाययोजनांच्या सेवांमध्ये अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) सेवा समाविष्ट आहेत. पीएनसीच्या प्रकल्पांमध्ये ‘डिझाइन-बिल्ड-फायनान्स-ऑपरेट-हस्तांतरण’ (डीबीएफओटी), वापर-देखभाल-हस्तांतरण (ओएमटी), हायब्रिड ॲन्युइटी मोड (एचएएम) आणि इतर यासह खासगी-सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) धाटणीच्या प्रकल्पांचा समावेश आहे. बीओटी आणि एचएएमच्या बाबतीत, कंपनी प्रायोजक म्हणून स्वतः किंवा इतर उपक्रमांसह संयुक्त उपक्रमात बोली लावते आणि एकदा प्रकल्प मंजूर झाल्यानंतर तो एसपीव्हीमध्ये समाविष्ट करून कार्यान्वित केला जातो.कंपनीच्या विविध व्यवसायांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.
१. महामार्ग बांधकाम
२. बीओटी-(टोल)/ बीओटी (वार्षिकी)/ओएमटी/एचएएम३. महामार्ग प्रकल्प
४. फ्रेट कॉरिडॉर/रेल्वे
५. पॉवर ट्रान्समिशन
६. विमानतळ धावपट्टी प्रकल्प
७. औद्योगिक क्षेत्र विकास
वर्तमान प्रकल्प- पोर्टफोलिओ
कंपनीने १३ राज्यांमध्ये ८८ मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प कार्यान्वित केले आहेत, त्यापैकी ६४ रस्ते तसेच २४ ईपीसी प्रकल्प आहेत. तसेच कंपनीने भारतभरात २१ विमानतळ धावपट्टी प्रकल्प कार्यान्वित केले असून लष्करी अभियांत्रिकी सेवांकडून ‘सुपर स्पेशल’ श्रेणी प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. कंपनी सध्या पाणीपुरवठा क्षेत्रातील ईपीसी प्रकल्प आणि सिंचन प्रकल्पांवर काम करत आहे.
महसूल खंडित:
कंपनीचे प्रकल्प मुख्यतः उत्तर भारतात कार्यरत आहेत, उत्तर प्रदेश राज्यात तिची सर्वाधिक कामे सुरू आहेत. या प्रदेशाचे तिच्या एकूण कार्यादेशांमध्ये ६५ टक्क्यांपेक्षा जास्त योगदान आहे. कंपनीच्या एकूण महसुलापैकी रस्ते प्रकल्प – ६७ टक्के, पाणी प्रकल्प – २२ टक्के, तर टोल संकलनाचा वाटा – ११ टक्के आहे.
जून २०२४ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने २,१६८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५७५ कोटींचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत तो तब्बल २१८ टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीची वार्षिक उलाढाल ८,७२६ कोटींची होती. कंपनीकडे सुमारे १९,००० कोटी रुपयांची कामे प्रलंबित आहेत. तसेच कंपनी आपले काही प्रकल्पांचे मुद्रीकरण (मॉनेटाइज) करून कर्ज कमी करेल. कंपनीच्या ग्राहकांच्या मांदियाळीत एनएचएआय, एचएसआरडीसी, एअरपोर्ट अथॉरिटी, एमएसआरडीसी, राइट्स लिमिटेड तसेच यूपीपीसीएलचा इ. मोठ्या कंपन्यांचा समावेश होतो. सद्य:काळातील पायाभूत सुविधांचे महत्त्व आणि प्राधान्य पाहता पीएनसी इन्फ्राटेकसारख्या कंपन्यांचे भवितव्य उज्ज्वल वाटते.
शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
पीएनसी इन्फ्राटेक लिमिटेड (बीएसई कोड: ५३९१५०)
वेबसाइट: http://www.pncinfratech.com/प्रवर्तक: श्री. नवीनकुमार जैनबाजारभाव: रु. ४२५.४५प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : ईपीसी / पायाभूत सुविधा, बांधकामभरणा झालेले भाग भांडवल: रु. ५१.३१ कोटीशेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५६.०७
परदेशी गुंतवणूकदार १०.८३
बँकस्/ म्युच्युअल फंडस्/ सरकार २६.३६
इतर/ जनता ६.७४
पुस्तकी मूल्य: रु. २०२
दर्शनी मूल्य: रु. २/-
गतवर्षीचा लाभांश: २५%
प्रति समभाग उत्पन्न: रु. ५०.८
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ८.४
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २४
डेट इक्विटी गुणोत्तर: १.५५
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ३.४९
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : १५.८
बीटा : १.३
बाजार भांडवल: रु. १११४० कोटी (मिड कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ५७५/३१०
गुंतवणूक कालावधी : १८-२४ महिने
stocksandwealth@gmail.com
प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १ टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
हा गुंतवणूक सल्ला नाही. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या माहितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.