अवंती फीड्स लिमिटेड
सुमारे ३० वर्षांपूर्वी म्हणजे १९९३ मध्ये स्थापन झालेली अवंती फीड्स लिमिटेड आज भारतातील कोळंबी खाद्य उत्पादन करणारी सर्वात मोठी उत्पादक आहे. कंपनी प्रक्रिया केलेल्या कोळंबीची निर्यातही करते. अवंतीने कच्च्या मालाची उपलब्धता निश्चित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जलसंवर्धन प्रकल्पांसाठी निष्क्रिय जमीन विकसित केली आहे. जागतिक ‘सीफूड लीडर’ असलेल्या थाई युनियन ग्रुपशी कंपनीने शेत-स्तरीय सहभागाने, ‘बॅकवर्ड इंटिग्रेशन’ आणि खाद्य उत्पादनातील नवकल्पना राबवल्या आहेत. कंपनीचे थाई युनियन ग्रुप (थायलंड) सोबत दीर्घकालीन तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य आहे. थाई यूनियन समूह हा जागतिक समुद्री खाद्य उद्योगातील एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. थाई युनियनचा अवंती फूड्स लिमिटेडमध्ये २४.२ टक्के हिस्सेदारी आहे. तसेच उपकंपनी अवंती फ्रोझन फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचा उर्वरित ४० टक्के हिस्सादेखील त्यांच्याकडे आहे.
थाई युनियनसह दीर्घकाळ चाललेल्या सहकार्यामुळे कंपनीच्या गुणवत्ता प्रणालींमध्ये उत्तम सुधारणा झाली आहे. कंपनीला तांत्रिक क्षमता वाढवण्यात आणि जगातील ‘सीफूड’च्या वाढत्या मागणीला तत्परतेने सेवा देण्यासाठी भारताच्या विशाल किनारपट्टीचा चांगला उपयोग करण्यात मदत केली आहे. अवंतीने आता संशोधन आणि विकासाकडे लक्ष केंद्रित केले आहे.
हेही वाचा – बाजारातली माणसं: रसायनशास्त्र ते निधी व्यवस्थापनाचे संयुग!- प्रमोद पुराणिक
कंपनीची उत्पादने प्रामुख्याने भारत, बांगलादेश आणि श्रीलंका येथे विकली जातात. कंपनीच्या एकूण महसुलापैकी सुमारे ८१ टक्के महसूल कोळंबी खाद्य व्यवसायाचा असून १९ टक्के व्यवसाय हा कोळंबी प्रक्रिया व्यवसाय आहे. देशांतर्गत खाद्य व्यवसायात ४५ टक्के बाजारपेठेसह कंपनी अग्रिम स्थानावर आहे. कंपनी आंध्र प्रदेशातील दोन सुविधांमधून कोळंबीवर प्रक्रिया करते आणि युरोप, अमेरिका, जपान, कोरिया, चीन, ऑस्ट्रेलिया आणि मध्यपूर्व यांसारख्या विविध देशांत निर्यात करते. हा व्यवसाय कंपनीच्या उपकंपनी अवंती फ्रोझन फूड्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे नियंत्रित केला जातो, ज्यामध्ये कंपनीचा ६० टक्के हिस्सा आहे. सध्या अवंतीचा भारताचा महसूल ७९ टक्के असून उर्वरित २१ टक्के निर्यातीचा आहे. कंपनीचे एकूण सात उत्पादन प्रकल्प असून, त्यापैकी ६ आंध्र प्रदेशात आणि १ गुजरातमध्ये आहे. कंपनीचे कृष्णपुरम, काकीनाडा जिल्ह्यातील नवीन प्रक्रिया प्रकल्प यशस्वीरीत्या सुरू झाले असून शीतगृहाची अर्थात ‘कोल्ड स्टोरेज’ची वार्षिक क्षमता ७,००० मेट्रिक टन आहे.
कंपनीचे यंदाच्या वर्षातील पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले आहेत. जून अखेर सरलेल्या पहिल्या तिमाहीत कंपनीने १,५०६ कोटी रुपयांची उलाढाल साध्य केली आहे. तर याच कालावधीत नक्त नफ्यात २१ टक्के वाढ होऊन तो १२८ कोटींवर गेला आहे. उपकंपनी अवंती फ्रोझन फूड्स प्रायव्हेट लिमिटेडची भारत सरकारच्या उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजना (पीएलआय) तसेच ऑपरेशन्स ग्रीन या दोन प्रोत्साहन योजनांमध्ये निवड करण्यात आली आहे. कृष्णपुरम येथील नवीन कोळंबी प्रक्रिया प्रकल्पात भारत सरकारकडून अनुदान अपेक्षित आहे. कंपनी अमेरिका आणि कॅनडाच्या बाजारपेठेतील निर्यात वाढवतानाच जपान आणि कोरियासारख्या इतर बाजारपेठांचादेखील शोध घेत आहे. आगामी कालावधीत सुमारे सहा लाख मेट्रिक टन फीड विक्री साध्य करण्याचे कंपनीचे लक्ष्य असून कोळंबी विभागासाठी १५,००० मेट्रिक टन प्रक्रिया आणि निर्यातीमुळेही उलाढाल वाढेल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा – शेअर बाजार, माझा पोर्टफोलियो: बाजार संरचनेतील अत्यावश्यक ‘कोठार’- सीडीएसएल!
शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
(बीएसई कोड ५१२५७३)
प्रवर्तक: अलुरी वेंकटेश्वरा राव
वेबसाइट: http://www.avantifeeds.com
बाजारभाव: रु. ६७२/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: कोळंबी उत्पादन
भरणा झालेले भाग भांडवल: रु. १३.६२ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ४३.२३
परदेशी गुंतवणूकदार १४.२८
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ९.१३
इतर/ जनता ३३.३६
पुस्तकी मूल्य: रु. १७३.६
दर्शनी मूल्य: रु. १/-
लाभांश: ६२५%
प्रति समभाग उत्पन्न: रु. २७.८
किंमत उत्पन्न गुणोत्तर: २४.२
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३९
डेट इक्विटी गुणोत्तर: ०
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ३५५
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई): २०%
बीटा : १.२
बाजार भांडवल: ९१३५ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ७९३/३८४
गुंतवणूक कालावधी: १८ महिने
अजय वाळिंबे