संधार टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि तिचे संयुक्त उपक्रम प्रामुख्याने भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी ऑटोमोटिव्ह घटकांचे उत्पादन आणि जोडणीचे काम करते. कंपनी विविध श्रेणीतील उत्पादनांच्या निर्मितीत असून यात सुरक्षा आणि सुरक्षा प्रणालींचा समावेश होतो. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलियोमध्ये ऑटोमोटिव्ह लॉकिंग आणि सुरक्षा प्रणाली, ऑटोमोटिव्ह व्हिजन सिस्टीम, स्टॅम्पिंग, ऑपरेटर केबिन आणि स्ट्रक्चरल पार्ट, झिंक डाय कास्टिंग, ॲल्युमिनियम डाय कास्टिंग, मॅग्नेशियम डाय कास्टिंग, ऑटोमोटिव्ह ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स, पॉलिमर, पेंटिंग, प्लेटिंग आणि कोटिंग, कमर्शियल टूलिंग, हेल्मेट, असेंब्ली, इंधन पंप, फिल्टर आणि वायपर ब्लेड्स यांचा समावेश आहे. संधार टेक्नॉलॉजीज सध्या विद्युत शक्तीवर धावणाऱ्या अर्थात ईव्ही वाहनांसाठी डीसी, डीसी कन्व्हर्टर, मोटर कंट्रोलर युनिट आणि ऑफ बोर्ड चार्जर विकसित करत आहे. ही उत्पादने पुढील आर्थिक वर्षांमध्ये सादर करण्याची कंपनीची योजना आहे.

उत्पादनासाठी तांत्रिक सहकार्य

१- ऑटोमोबाइलमध्ये वापरल्या जाणाऱ्या रिलेच्या निर्मिती किंवा असेंब्लीसाठी जेईएम कंपनी लिमिटेड, कोरियासोबत तांत्रिक सहकार्य आहे. एव्हीएन पॅनेल आणि स्विच तयार करण्यासाठी त्यांनी त्यांच्यासोबत संयुक्त उपक्रमातही प्रवेश केला आहे.

२- ऑटोमोबाइल आणि मोटारसायकलींसाठी दरवाजाचे आरसे, बाहेरील दरवाजाचे हँडल आणि की सेट तयार करण्यासाठी किंवा असेंब्लीसाठी होंडा लॉक, जपानसोबत तांत्रिक सहकार्य आहे.

कंपनीच्या एकूण महसुलापैकी सुमारे २५ टक्के महसूल हा लॉकिंग आणि व्हिजन सिस्टीम्समधून येतो, शीट मेटलमधून १५ टक्के तर एडीसी ओव्हरसीज आणि केबिन आणि फॅब्रिकेशनमधून प्रत्येकी १४ टक्के महसूल प्राप्त होतो. असेंम्बली आणि इतर उत्पादनांचा महसूल २१ टक्के आहे. महसुलातील सुमारे १४ टक्के वाटा निर्यातीचा आहे.

कंपनीच्या मुख्य ग्राहकांमध्ये हिरो, रॉयल एनफिल्ड, सुझुकी, टीव्हीएस, होंडा, टाटा, एसएमएल, अशोक लेलँड, महिंद्र, जेसीबी, कॅटरपिलर, कोबेल्को, बॉश या कंपन्यांचा समावेश होतो. कंपनीच्या भारतभर ४४ उत्पादन सुविधा असून त्यात विविध संयुक्त उपक्रम आणि उपकंपन्यांचा समावेश आहे. कंपनीचे स्पेन, मेक्सिको, पोलंड आणि रोमानिया येथे एकूण चार उत्पादन प्रकल्प आहेत.

कंपनीचे डिसेंबर २०२४ साठी संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले असून या काळात कंपनीने ९७४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३० कोटी रुपयांचा नक्त नफा कामावला आहे. गेल्या वर्षीच्या याच काळातल्या नफ्यापेक्षा तो २० टक्के अधिक आहे.

कंपनीने विस्तारीकरणासाठी गेल्या दोन वर्षांत सुमारे ५५५ कोटी रुपयांच्या एकूण भांडवली खर्चासह आठ नवीन उत्पादन सुविधा सुरू केल्या आहेत. भारतात, प्रकल्पांमध्ये शीट मेटल घटकांसाठी चार प्रकल्प, पृष्ठभाग माउंट तंत्रज्ञानासाठी एक आणि कास्टिंगच्या मशीनिंगसाठी दोन प्रकल्पांचा समावेश आहे. रोमानियामधील प्रकल्प अॅल्युमिनियम डाय-कास्टिंगसाठी आहे. सर्व आठ प्रकल्प सुरू झाले असून एकत्रित स्तरावर, ते ८०-९० टक्के क्षमतेच्या वापरावर कार्यरत आहेत. तसेच कंपनीने गेल्याच वर्षी हिमाचल प्रदेशातील सोलन येथे प्रकल्पासाठी जमीन खरेदी केली आहे. कंपनीच्या २ विद्यमान प्रकल्पांचे एकत्रीकरण आणि भविष्यातील विस्तारासाठी याचा वापर केला जाईल.

शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्याटप्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

संधार टेक्नॉलजीज लिमिटेड

(बीएसई कोड ५४११६३)
वेबसाइट: http://www.sandhargroup.com

प्रवर्तक: जयंत दावर
बाजारभाव: रु. ३८४/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय :ऑटो अॅन्सिलरी

भरणा झालेले भाग भांडवल: रु. ६०.१९ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ७०.३८

परदेशी गुंतवणूकदार ०.७३
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार

१५.६९

इतर/ जनता १३.२०
पुस्तकी मूल्य: रु. १७७

दर्शनी मूल्य: रु.१०/- लाभांश: ५५%

प्रति समभाग उत्पन्न: रु. २२.४१
किंमत उत्पन्न गुणोत्तर: १७.२ समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २५.५
डेट इक्विटि गुणोत्तर: ०.६८

इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: ४.११

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई): १२.१%
बीटा: ०.९

बाजार भांडवल: रु.२,३२१ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ६९८/२०५
गुंतवणूक कालावधी : २४ महिने

Stocksandwealth@gmail.com

हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे तर अभ्यासपूर्ण विवेचन आहे.

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनी कडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तु घेतलेली नाही.

लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअर मधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

Story img Loader