ब्लिस जीव्हीएस फार्मा लिमिटेड
(बीएसई कोड: ५०६१९७)
संकेतस्थळ: http://www.blissgvs.com/
प्रवर्तक: गगन शर्मा
बाजारभाव: रु.१३९/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : फार्मास्युटिकल्स
भरणा झालेले भाग भांडवल: रु. १०.५० कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ३४.९०
परदेशी गुंतवणूकदार १३.२४
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ६.५८
इतर/ जनता ४५.२७
पुस्तकी मूल्य: रु. ९२.१
दर्शनी मूल्य: रु.१/-
गतवर्षीचा लाभांश: ५०%
प्रति समभाग उत्पन्न: रु. ९.६०
किंमत उत्पन्न गुणोत्तर: १३.७
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३६.४
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.१०
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: २३.२
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (आरओसीई): १४.४
बीटा : ०.९
बाजार भांडवल: रु. १,४६० कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १५०/७८
गुंतवणूक कालावधी : १८-२४ महिने
सुमारे ४० वर्षांपूर्वी स्थापन झालेली ब्लिस जीव्हीएस फार्मा लिमिटेड ही औषध उत्पादन क्षेत्रातील उभरती कंपनी आहे. कंपनी प्रामुख्याने सपोसिटरीज, पेसरी, कॅप्सूल, गोळ्या आणि सिरपच्या स्वरूपात फार्मास्युटिकल उत्पादन तसेच फॉर्म्युलेशन करते. कंपनीचे भारतात पाच उत्पादन प्रकल्प असून त्यातील तीन पालघर येथे तर उर्वरित दोन अंबरनाथ व दमण येथे आहेत. नायजेरियातदेखील कंपनीच्या दोन उत्पादन सुविधा आहेत. ब्लिस जीव्हीएस सपोसिटरीजच्या उत्पादनासाठी युरोपियन जीएमपी मानकांचे पालन करते, तसेच कंपनीच्या उत्पादन सुविधा स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मानकांना अनुरूप आहेत. ब्लिस जीव्हीएस भारतातील एकमेव प्रमाणित सपोसिटरीज आणि पेसरीज उत्पादक आहेत. कंपनी जगातील आघाडीच्या उत्पादकांसोबत सपोसिटरीज आणि पेसरीजचे कंत्राटदार उत्पादक आहेत. वाढत्या आणि दीर्घकालीन उत्पादन कंत्राटामुळे कंपनीला टॅब्लेट आणि ड्राय-पावडर इंजेक्टेबल्सची निर्मिती क्षमता इतर डोस फॉर्ममध्ये वाढवण्याची संधी मिळाली आहे.
उत्पादन पोर्टफोलिओ:
कंपनी मलेरियाविरोधी, अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-बायोटिक, अँटी-इंफ्लेमेटरी, गर्भनिरोधक आणि अँटी-मधुमेह यासह साठहून अधिक उपचारात्मक विभागांमध्ये दीडशेहून अधिक ब्रँडेड फॉर्म्युलेशनचे उत्पादन, विपणन आणि निर्यात करते. तसेच फॉर्म्युलेशन सपोसिटरीज, पेसरी, कॅप्सूल, गोळ्या आणि सिरप म्हणून विकते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये पी एलक्झिन, लोनार्ट, फनबक्ट आणि लोफनाकसारख्या १५० हून अधिक नाममुद्रांचा समावेश आहे. सपोसिटरीज आणि पेसरीज डोस फॉर्ममध्ये कंपनी जागतिक आघाडीवर आहे. ही भारताची पहिली ईयू जीएमपी प्रमाणित सपोसिटरी उत्पादक आहे. कंपनीला आफ्रिकेतील मलेरियाविरोधी बाजारात मजबूत स्थान आहे. कंपनी करारानुसार, सन फार्मा, मॅनकाइंड, सनोफी आणि अल्केमसाठी सपोसिटरीज आणि पेसरीज उत्पादने तयार करते. ब्लिस जीव्हीएस उप-सहारा आफ्रिकन क्षेत्रावर मुख्य लक्ष केंद्रित करून साठहून अधिक देशांमध्ये निर्यात करते, कंपनीचा ७५ टक्के महसूल आफ्रिकन देशांमधून येतो.
हेही वाचा…हिरा है सदा के लिये! (पूर्वार्ध)
कंपनीचे सहामाहीचे आर्थिक निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. मात्र यंदाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने अपेक्षित कामगिरी करून दाखवली आहे. जून २०२४ अखेर सरलेल्या तिमाहीत कंपनीने उलाढालीत १४ टक्के वाढ दाखवून ती १८४ कोटींवर नेली आहे. तर नक्त नफ्यात ४१ टक्क्यांची वाढ होऊन तो २०.७० कोटींवर पोहोचला आहे. भारतात तसेच परदेशातील वाढती मागणी पाहता कंपनीने पालघर व्हेवूर प्रकल्पामध्ये सेमी-सोलिड्स तयार फॉर्म्युलेशनच्या क्षमता वाढीसाठी/समावेशासाठी ३० कोटी गुंतवणुकीची विस्तार योजना आखली आहे. एकूण क्षमता जोडणी २० कोटी युनिट्स आहे. येत्या दोन वर्षांत हे विस्तारीकरण पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसेच कंपनी आपल्या सौर प्रकल्पाची क्षमता ४.५ मेगावॅटवरून ८.१ मेगावॅटपर्यंत वाढवत आहे, ही अतिरिक्त गुंतवणूक तिच्या ८० टक्के विजेच्या वापरासाठी पुरेशी असेल. कंपनीचे आपल्या उत्पादन वितरणाचा विस्तार सीआयएस देश, आशिया-पॅसिफिक, रशिया, युरोप आणि दक्षिण अमेरिका या देशांमध्ये करत आहे.
सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजारभावात मिळू शकतात, त्यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्याटप्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे. अजय वाळिंबे stocksandwealth@gmail.com
हेही वाचा…रोखीच्या व्यवहारांवरील निर्बंध
प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही. हा गुंतवणूक सल्ला नाही लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.