ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड (बीएसई कोड ५३२९२८)

प्रवर्तक: जितेंद्र ममतोरा

वेबसाइट: www.transformerindia.com

बाजारभाव: रु. ५४४/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: ट्रान्सफॉर्मर्स

भरणा झालेले भाग भांडवल: रु. ३०.०२ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ६४.३६

परदेशी गुंतवणूकदार ११.३३

बँक / म्युच्युअल फंड/ सरकार ७.२२

इतर/ जनता १७.०९

पुस्तकी मूल्य: रु. ४१.७

दर्शनी मूल्य: रु. १/-

लाभांश: २०%

प्रति समभाग उत्पन्न: रु.७.१४

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ७७.२

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४६.४

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.२३

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ६.५७

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड (आरओसीई): २८%

बीटा : १

बाजार भांडवल: रु. १६,३४८ कोटी (मिडकॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ६५०/२५०

गुंतवणूक कालावधी: २४ महिने.

अहमदाबादस्थित ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड (ट्रील) ही ऊर्जा, फर्नेस आणि रेक्टिफायर ट्रान्सफॉर्मर्सची एक आघाडीची उत्पादक आहे. कंपनीच्या उत्पादनांना वीजनिर्मिती, पारेषण, वितरण तसेच सिमेंट, पेपर आणि इतर अनेक औद्योगिक क्षेत्रांत मागणी आहे. ट्रीलच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये ५०० मेगावॅट आणि १२०० केव्ही क्षमतेपर्यंतचे सिंगल-फेज पॉवर ट्रान्सफॉर्मर्स, फर्नेस ट्रान्सफॉर्मर्स, रेक्टिफायर आणि डिस्ट्रिब्यूशन ट्रान्सफॉर्मर्स, स्पेशॅलिटी ट्रान्सफॉर्मर्स, सीरिज आणि रिॲक्टर्स, मोबाइल सब-स्टेशन्स, अर्थिंग ट्रान्सफॉर्मर्स इत्यादींचा समावेश आहे.

कंपनीची विक्री बी२बी प्रारूपावर चालते. जागतिक स्तरावर २५ हून अधिक देशांत आपला ठसा उमटवणाऱ्या ट्रीलचे देशांतर्गत अनेक मोठे ग्राहक आहेत. कंपनीच्या प्रमुख ग्राहकांत पॉवरग्रीड, एनटीपीसी, टाटा पॉवर, टोरेंट पॉवर, सीमेन्स एनर्जी, केईसी, ब्लू स्टार, हिंदुस्तान झिंक, जेएसडब्ल्यू, गेटको, अदानी समूह इत्यादी कंपन्यांचा समावेश होतो.

क्षमतेनुसार ट्रील आज भारतातील दुसरी सर्वात मोठी ट्रान्सफॉर्मर उत्पादक आहे. ट्रीलचे गुजरातमधील अहमदाबादजवळ मोरया येथे तीन उत्पादन प्रकल्प असून त्याची एकत्रित क्षमता ४०,००० एमव्हीए आहे. अक्षय्य ऊर्जा क्षेत्रासाठी कार्यादेशानुसार ट्रान्सफॉर्मर तयार करण्यासाठी कंपनी उत्पादन क्षमता १५,००० एमव्हीएने वाढवत आहे. यामुळे आगामी आर्थिक वर्षांत क्षमता ५५,००० एमव्हीएवर जाईल. गेल्याच वर्षांत कंपनीने त्यासाठी प्रति शेअर ६६५ रुपये या दराने ५०० कोटी रुपये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (क्यूआयपी) माध्यमातून निधी उभारणी केली आहे.

बॅकवर्ड इंटिग्रेशन

डिसेंबर २०२४ मध्ये, कंपनीने पॉस्को पोगेनॅम्प इलेक्ट्रिकल स्टील प्रायव्हेट लिमिटेडमध्ये हिस्सेदारी विकत घेतली आहे. पॉस्को पोगेनॅम्प २४,००० एमटीपीए क्षमतेचा सीआरजीओ लॅमिनेशन उत्पादक असून आहे. कंपनीने यंदाच्या आर्थिक वर्षांत कार्यरत होण्याची अपेक्षा असलेल्या ३ महत्त्वाच्या घटकांसाठी तंत्रज्ञान करार केला आहे. तसेच मदर कॉइलसाठी पुरवठा करार देखील केला आहे.

कंपनीने मार्च २०२५ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षाचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. आर्थिक वर्षात तिने उत्तम कामगिरी केली आहे. उलाढालीत ५६ टक्के वाढ साध्य करत ती २,०१९ कोटींवर नेली आहे. तर नक्त नफ्यात तब्बल ३५६ टक्के वाढ होऊन तो २१६.५८ कोटींवर गेला आहे. तर मार्च २०२५ साठी अखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत उलाढालीत ३२ टक्के वाढ नोंदवून ती आता ६७६ कोटींवर नेली आहे. तर १२५ टक्क्यांच्या भरीव वाढीसह ९४.१७ कोटी नफा मिळविला आहे. कंपनीकडे ५,१३२ कोटी रुपयांचे कार्यादेश आहेत, तर २२,००० कोटी रुपयांच्या कार्यादेशाबाबत बोलणी सुरू आहे. गेल्याच महिन्यांत भागधारकांना १:१ प्रमाणात बक्षीस समभागांचे वाटप करणाऱ्या ट्रीलचे भरणा झालेले भागभांडवल केवळ ३०.०२ कोटी रुपये आहे. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून आणि तुमच्या पोर्टफोलिओला बळकटी देण्यासाठी प्रत्येक पडझडीत हा शेअर जरूर खरेदी करा.

शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्याटप्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

stocksandwealth@gmail.com

हा लेख एक अभ्यासपूर्ण विवेचन असून गुंतवणूक सल्ला नव्हे

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही.

लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.