वर्ष २००८ मध्ये स्थापन झालेली ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड ही एक एकात्मिक ट्रान्समिशन आणि वितरण कंपनी असून ती खांब उत्पादक कंपनीदेखील आहे. टॉवर, कंडक्टर आणि खांब उत्पादन करण्यासाठी कंपनीचे देवळी (महाराष्ट्र), बडोदा आणि सिल्वासा (गुजरात) येथे एकंदर चार प्रकल्प आहेत. त्यांच्याकडे देवली, बडोदा आणि सिल्व्हासा येथे टॉवर, कंडक्टर आणि खांब तयार करण्यासाठी उत्पादन सुविधा आहेत. कंपनीने गेल्याच महिन्यात ४३२ रुपये प्रतिसमभाग दराने प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून ८३९ कोटी रुपयांची निधी उभारणी केली आणि त्याला गुंतवणूकदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
प्रमुख व्यवसाय:
पॉवर ट्रान्समिशन आणि वितरण:
यात पॉवर ट्रान्समिशन आणि वितरणासाठी गॅल्वनाइज्ड स्टील स्ट्रक्चर्सची डिझाइनिंग, मॅन्युफॅक्चरिंग, टेस्टिंग, इन्स्टॉलेशन आणि पुरवठा यासारख्या विस्तृत सेवांचा समावेश आहे. शिवाय, कंपनीचे सबस्टेशन प्रकल्पदेखील उभारले आहेत.
रेल्वे विद्याुतीकरण:
कंपनी रेल्वे उद्याोगाच्या नागरी आणि विद्याुत गरजा पूर्ण करते. त्यांच्यासाठी ओव्हरहेड उपकरण प्रकल्प सादर केला आहे आणि विविध विद्याुतीकरण, सिग्नलिंग, मातीकाम आणि दूरसंचार कामे राबविली आहेत.
नागरी बांधकाम:
कंपनी पूल, बोगदे, उन्नत रस्ते आणि इतर नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या बांधकामावर लक्ष केंद्रित करते, ज्यात भारतमाला प्रकल्पाचा समावेश आहे. हा प्रकल्प एनएचएआयने बिहारमधील कोसी नदीवरील भारतातील सर्वात लांब नदी पुलाच्या बांधकामासाठी दिला आहे.
खांब (पोल) आणि प्रकाशयोजना:
कंपनी हाय मास्ट, स्ट्रीट पोल, ल्युमिनरीज, पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्यूशन मोनोपोल, स्टेडियम लाइटिंग, डेरिक स्ट्रक्चर्स, रोड गॅन्ट्री आणि साइनेज, फ्लॅगमास्ट, सोलर स्ट्रीटलाइट्स, डेकोरेटिव्ह पोल इत्यादींचे उत्पादन करते. ती एक उत्पादक म्हणून काम करते आणि पोल आणि प्रकाशयोजना विभागात सेवा प्रदात्यांचा पुरवठा करते. कंपनी बांगलादेश, इंडोनेशिया, भूतान, जॉर्डन, केनिया, कॅनडा, इजिप्त, मेक्सिको, कुवेत, नेपाळ, पोलंड, घाना, अमेरिकेसह ५८ देशांमध्ये उत्पादने निर्यात करते.
१५ जानेवारीला कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे (३० सप्टेंबर २०२४) निकाल जाहीर केले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत कंपनीच्या उलाढालीत ११.५ टक्के वाढ होऊन ती १,०६८ कोटींवर गेली आहे. तर नक्त नफ्यात २२ टक्क्यांची वाढ होऊन तो ४८ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीकडे १०,३५८ कोटी रुपयांचे कार्यादेश प्रलंबित असून कंपनी लवकरच विस्तारीकरण प्रकल्प हाती घेत आहे. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने ३२६.६ कोटी रुपयांचा भांडवली खर्च मंजूर केला आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रातील ही कंपनी आगामी कालावधीत उत्तम कामगिरी करून दाखवेल, अशी अपेक्षा आहे.
शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
Stocksandwealth@gmail. com