National Saving Certificate: बऱ्याचदा तुम्हाला गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय हवे असतात, त्यामुळेच आपण पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतो. तसेच सुरक्षित गुंतवणुकीसाठी मुदत ठेवींचा पहिला विचार केला जातो. विविध बँका आणि पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या एफडी योजनेत ६.७५ टक्के ते ७.५० टक्के व्याज मिळते. परंतु अशीच आणखी एक जोखीममुक्त योजना आहे, जी व्याजाच्या दृष्टीने चांगली आहे. या योजनेचे नाव पोस्ट ऑफिसचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) आहे, जो गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय असू शकतो. या अल्प बचतीत परताव्याची हमी असते. यामध्ये १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सीअंतर्गत कर सवलतीचा लाभही मिळतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

NSC वर वार्षिक ७.७ टक्के व्याज

एप्रिल २०२३ ते जून २०२३ पर्यंत राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर वार्षिक ७.७ टक्के आहे. हे व्याज पोस्ट ऑफिस एफडीवर उपलब्ध असलेल्या ७.५ टक्के व्याजदरापेक्षा जास्त आहे. तसेच व्याज बहुतेक मोठ्या बँकांपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचा परिपक्वता कालावधी ५ वर्षे आहे. NSC आणि इतर लहान बचतींवरील व्याजदरांचे सरकार दर तिमाहीत पुनरावलोकन करते.

NSC: परिपक्वतेवर किती फायदा?

NSC वर व्याज दरवर्षी चक्रवाढ दराने वाढते, परंतु ५ वर्षांच्या परिपक्वतेनंतरच ते आपल्याला मिळते. जर तुम्ही या योजनेत २५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला ७.७ टक्के व्याजाने मॅच्युरिटीवर ३६,२२,५८५ रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला ११,२२,५८५ रुपयांच्या व्याजाचा लाभ मिळेल. तुम्ही या योजनेत १० लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला ७.७ टक्के व्याजाने मॅच्युरिटीवर १४,४९,०३४ रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला ४,४९,०३४ रुपयांच्या व्याजाचा लाभ मिळेल. तुम्ही या योजनेत ५ लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला ७.७ टक्के व्याजाने मॅच्युरिटीवर ७,२४,५१७ रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला २,२४,५१७ रुपयांच्या व्याजाचा लाभ मिळेल.

किती किमतीचे प्रमाणपत्र खरेदी करता येईल?

तुम्ही पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेतून राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र खरेदी करू शकता. तुम्ही हे प्रमाणपत्र १००,५००,१०००,५००० आणि १०,००० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. गुंतवणुकीसाठी किमान रक्कम १००० असावी. कमाल रकमेवर मर्यादा नाही.

हेही वाचाः अ‍ॅपल पेमेंट क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत; ‘या’ बँकेबरोबर मिळून क्रेडिट कार्ड आणण्याची योजना

NSC चे फायदे काय?

NSC मध्ये गुंतवणूक केल्यावर प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सीअंतर्गत १.५० रुपयांपर्यंत कर सवलतीचा लाभ मिळतो. त्यावर मुदत ठेवींपेक्षा जास्त व्याज मिळत आहे. हे प्रमाणपत्र संपार्श्विक म्हणून वापरले जाऊ शकते. सरकारी योजना असल्याने त्यावरील परतावा हमखास असतो. प्राप्तिकराची गणना करताना कलम ८० सीअंतर्गत करदात्याला वजावटीचा लाभ मिळतो, जो तो त्याच्या उत्पन्नातून खर्च म्हणून वजा करू शकतो, ज्यामुळे त्याला कमी रकमेवर कर भरावा लागतो. व्याज दरवर्षी जमा केले जाते, परंतु केवळ परिपक्वतेवरच दिले जाते, ज्यासाठी टीडीएस कापला जात नाही. त्यात नॉमिनीचीही सुविधा आहे.

हेही वाचाः एका बँकेकडून ग्राहकांना दिलासा अन् दुसऱ्या बँकेने EMIचा भार वाढवला; ‘या’ दोन बँकांनी बदलला MCLR दर

कोण गुंतवणूक करू शकते?

सर्व भारतीय रहिवासी NSCमध्ये गुंतवणूक करू शकतात. गैर भारतीय नागरिक (NRI) NSC खरेदी करू शकत नाहीत. जर रहिवासी भारतीयाने NSC विकत घेतले असेल आणि परिपक्वतेपूर्वी NRI झाला असेल, तरीही त्याला लाभ मिळतो. ट्रस्ट आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) NSC मध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत. HUF चे कर्ता व्यक्ती NSC मध्ये फक्त त्यांच्या स्वतःच्या नावाने गुंतवणूक करू शकतात.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National saving certificate government scheme deposits of 25 lakhs will earn more than 11 lakhs in interest vrd
Show comments