डॉ. आशीष थत्ते
आपल्यातील बरेच लोक अंधश्रद्धाळू असतात आणि अगदीच काही नाही तर देवभोळे तर नक्कीच असतो. पण या कथेतील बबली नुसती देवभोळी नव्हती तर चक्क व्यावसायिक निर्णयदेखील एका हिमालयातील योगींच्या सांगण्यावरून घेत होती. चित्रा रामकृष्ण असे त्यांचे नाव होते. राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी एका योगींच्या सांगण्यावरून नक्की काय निर्णय घेतले ते माहीत नाही पण एनएसईचे माजी समूह संचालन अधिकारी आनंद सुब्रमणियन म्हणजे बंटीला मात्र त्याचा चांगलाच फायदा करून दिला. तपासकर्त्यांनी जेव्हा चित्रा यांना विचारले की, हिमालयात राहणारे सिद्धपुरुष ‘ई-मेल’ कसे काय करायचे? तेव्हा चित्रा यांनी सांगितले की, अशा योगींना भौतिक उपस्थितीची गरज नसते. त्यांच्या सांगण्यानुसार हे योगी त्यांना वीस वर्षांपूर्वी गंगेच्या किनारी भेटले आणि वेळोवेळी त्यांचा सल्ला घेऊन काम करत होत्या. हे सिद्धपुरुष स्वतःच हजर व्हायचे, त्यामुळे कधी संवादाची गरज पडली नाही. मात्र जेव्हा विचारले तेव्हा त्यांनी आपला ‘ई-मेल आयडी’ चित्रा यांना दिला आणि तो मेल आयडी होता ‘rigyajursama@outlook.com’ म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद यांची आद्याक्षरे मिळून तयार करण्यात आला होता.
बाजारमंचाची सगळी महत्त्वाची माहिती ‘ई-मेल’च्या माध्यमातून या योगींना दिली जायची आणि योगीजी मग पुढील सल्ला चित्रा यांना देत होते. एकदा बाजारमंचाच्या माहिती आणि तंत्रज्ञान बघणाऱ्या अधिकाऱ्याने, हा प्रश्न चित्रा यांना विचारला होता की, बाहेरून एवढे ‘ई-मेल’ कशाला येतात? तेव्हा चित्रा यांनी आपला अधिकार वापरून त्या अधिकाऱ्याला आपले तोंड बंद करायला सांगितले. या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बहुतेक ‘ई-मेल’ आनंद सुब्रमणियन यांनादेखील पाठवले होते.
हेही वाचा >>>बंटी और बबली (को-लोकेशन)
या ‘ई-मेल’मध्ये चित्रा या चक्क संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करणाऱ्या विषयांची माहिती द्यायच्या तेही अगदी कागदपत्रांसकट. यातील एका संभाषणाची प्रत तपासकर्त्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यात आनंद सुब्रमणियन यांना कुठले पद द्यायचे, त्यांचा पगार किती असावा आणि आठवड्यातून किती दिवस त्यांनी काम करावे याविषयी सविस्तर माहिती होती. फक्त यांच्याबद्दलच नाही तर इतर कर्मचाऱ्यांबद्दलदेखील असेच सांगण्यात आले होते, फक्त त्यांचा उल्लेख ओझरता असायचा. तपासकर्त्यांनी असेदेखील शोधून काढले की, आनंद सुब्रमणियन यांच्या संगणकात ‘स्काईप’ नावाच्या सॉफ्टवेअर ज्या ‘ई-मेल’ला जोडण्यात आला होता तो या योगींचा होता आणि फोन नंबर आनंद यांचा होता. काही संगणकीय कागदपत्रे जी योगी यांच्याकडून चित्रा यांना पाठवण्यात आली होती. ती आनंद यांनीच बनवली होती, असा शोध पुढे जाऊन लागला. म्हणजे हिमालयीन योगी आणि आनंद हे दोन्ही एकच होते असे वाटत होते. पण चित्रा यांनी ते एकच असल्याचे तपासकर्त्यांसमोर नाकारले. चित्रा यांनी असाही तर्क लावला की, जर दोन्ही व्यक्ती एकच होत्या असे तपासकर्त्यांना वाटते तर बाहेरच्याला काही माहिती दिली हा आरोपच खोटा ठरतो आणि मी निर्दोष आहे असेही सिद्ध होते. या प्रकरणात बाजारमंचाने आणि तपासकर्त्यांनी मानसशास्त्र जाणणाऱ्या तज्ज्ञांचा अहवालदेखील घेतला.
चित्रा यांच्या राजीनाम्याच्या आधी या सगळ्या गोष्टी संचालक मंडळाच्यादेखील नजरेस आणून देण्यात आल्या होत्या. कंपनीची अंतर्गत आणि गोपनीय माहिती कुठल्या तरी ‘ई-मेल’वर दिली जायची ही महत्त्वाची बाब बाजारमंचाने भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ला तातडीने कळवणे गरजेचे होते. मात्र त्यांनी ही गोष्ट दडवून ठेवली. तसेच चित्रा यांचा राजीनामा तात्काळ प्रभावाने मंजूर करण्यात आला. खरे तर त्यांची चौकशी करण्याची गरज होती. राजीनाम्यानंतर विनाचौकशी निवृत्तीनंतरचे सगळे फायदे त्यांना विनासायास देण्यात आले. असो हे तर ‘बबली’चे कारनामे झाले अजून एका भागात ‘बंटी’ला मिळालेले फायदे बघूया.