फंडाचे प्रकार प्रामुख्याने डेट आणि इक्विटी असे सांगितले जात असले तरीही इक्विटी आणि डेट या दोघांचा एकत्रित समन्वय साधणाऱ्या फंडांचा विचार गुंतवणूकदार प्रथमतः करताना दिसत नाहीत. बँकेतल्या फिक्स डिपॉझिट, पोस्टातल्या गुंतवणूक योजना याच्या तुलनेत कायमच जास्त रिटर्न्स मिळावे म्हणून फंडात गुंतवणूक करण्याचा फंडा गुंतवणूकदार वापरतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलमार्केट आणि तुमची गुंतवणूक

ज्यावेळी बाजार दर आठवड्याला नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करत असतात तेव्हा नक्की कसं थांबायचं आणि कुठे थांबायचं ? याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही. तर सर्वसामान्य गुंतवणूकदार राहिले बाजूलाच. पोर्टफोलिओचा चांगला परतावा मिळायला हवा म्हणून इक्विटीचा पर्याय सर्वोत्तम. पण फिक्स इन्कम मिळायला पाहिजे म्हणून ‘डेट फंड’ सुद्धा हवेत. याच दोघांचा एकत्रित विचार केल्यास ‘बॅलन्स अ‍ॅडव्हांटेज फंड’ तुम्हाला कायमच उपयोगी पडू शकतात.

बॅलन्सअ‍ॅडव्हांटेज फंड नेमके काय करतात?

फंडांमध्ये गुंतवणूक करताना फंड मॅनेजर तुमचे पैसे इक्विटी आणि डेट अशा दोन्ही पर्यायांमध्ये गुंतवतात. इक्विटी फंडात मध्ये मिळणारे जादाचे रिटर्न्स आणि फिक्स इन्कम सिक्युरिटी मधून मिळणारी सुरक्षितता यांचा एकत्रित समन्वय येथे साधलेला दिसतो. मध्यम आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी गव्हर्मेंट सिक्युरिटीज, बॉंड, डिबेंचर्स यामध्ये गुंतवणूक केलेली फायद्याची. बॅलन्स अ‍ॅडव्हांटेज फंडात या दोघांचा एकत्रित सहभाग असतो. त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओला एक सुरक्षितताही मिळते.

इक्विटी किती आणि डेट किती?

बॅलन्स अ‍ॅडव्हांटेज फंड हायब्रिड फंड या गटात मोडतात हे एव्हाना तुम्हाला लक्षात आले असेलच. या हायब्रिड फंडामध्ये इक्विटी शेअर्समध्ये किती गुंतवणूक करायची याचा निर्णय बाजारपेठेच्या बाजारांच्या त्या वेळच्या स्थितीवरून घेतला जातो. शेअर बाजार दिवसेंदिवस वर जात आहे म्हणजेच चांगले रिटर्न्स मिळत आहेत पण शेअर्सच्या किमती जेवढ्या असायला हव्यात त्यापेक्षा कृत्रिमरीत्या वाढलेल्या तर नाहीत (ओव्हर व्हॅल्युएशन) त्यामध्ये फुगवटा तर आलेला नाही ना ? याचा विचार करून फंड मॅनेजर आपली रणनीती ठरवतात.

पुढे दिलेल्या तक्त्यामध्ये निवडक बॅलेन्स अ‍ॅडव्हांटेज फंड योजनांची मागच्या तीन आणि पाच वर्षातील कामगिरी दिली आहे.

डायनॅमिक अ‍ॅसेट लोकेशनचा फायदा

बाजाराची सध्याची स्थिती ठरवायला वेगवेगळे निकष वापरले जातात. महागाईचा आकडा, परदेशी गुंतवणूकदारांचा उत्साह, प्राइस टू अर्निंग रेशो, लाभांश पातळी, प्राइस टू बुक व्हॅल्यू यांच्या अभ्यासाने जर फंड मॅनेजरला अंदाज आला की कदाचित बाजार खाली जाऊ शकतील तर तो इक्विटी फंडातील इक्विटी कमी करून हमखास रिटर्न देणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक वाढवतात. त्यामुळे अचानकपणे ‘मार्केट क्रॅश’ वगैरे आला तर फंडावर त्याचा नकारात्मक परिणाम दिसत नाही.

ट्रेंड ओळखून केलेली गुंतवणूक

आधी उल्लेख केल्याप्रमाणे बाजार खरोखरच पडले, बाजारात खरोखरच घसरण दिसून आली आणि शेअरची किंमत कृत्रिमरित्या वाढलेली होती ती योग्य आहे असे वाटू लागले की पुन्हा फंड मॅनेजर डेट मधून इक्विटीमध्ये आपली गुंतवणूक वाढवायला सुरुवात करतात. सोप्या भाषेत जेव्हा बाजारात स्वस्तात शेअर्स उपलब्ध असतील तेव्हा ते विकत घ्यायचे आणि आपला फायदा साधून घ्यायचा.

हेजिंग आणि बॅलन्स अ‍ॅडव्हांटेज फंड

काही म्युच्युअल फंड कंपन्यांच्या योजनांमध्ये फ्युचर्समध्ये पोझिशन घेऊन भविष्यातील धोका टाळला जातो. याचा अर्थातच गुंतवणूकदारांना फायदा होतो.

टॅक्स आणि बॅलन्स अ‍ॅडव्हांटेज फंड

तरी ते हायब्रीड प्रकारात येत असले तरीही त्यांना कमीत कमी 65% रक्कम इक्विटी शेअर्समध्ये गुंतवावीच लागते. यामुळे ते टॅक्सच्या दृष्टीने ते इक्विटी फंडा म्हणून समजले जातात.

इक्विटीच्या लाटेवर स्वार व्हायची इच्छा असलेल्या पण तरीही सावधपणे गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी बॅलन्स अ‍ॅडव्हांटेज फंड हा उत्तम पर्याय आहे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nifty equity and debt balance advantage mutual fund mmdc dvr