निफ्टी निर्देशांक सरलेल्या सप्ताहातील मंगळवारी क्षणिक २२,००० चा स्तर तोडल्यावर, कविवर्य सुधीर मोघेंच्या ‘मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा’ या काव्यपंक्तीतून गुंतवणूकदारांच्या मानसिक, आर्थिक हतबलतेची भावना व्यक्त होताना दिसत होती.
या स्तंभातील ‘तेजी-मंदीच्या चक्राचा ल.सा.वि’ (अर्थ वृत्तान्त, ९ सप्टेंबर २०२४) या लेखात ‘इलियट वेव्ह’ संकल्पनेचा आधार घेत निफ्टी निर्देशांकावर २६,३०० च्या उच्चांकाचे भाकीत केलेले होते. २७ सप्टेंबर २०२४ ला २६,२७७ चा उच्चांक मारत निफ्टी निर्देशांकाने ते साध्यपण केले. निसर्ग नियमाप्रमाणे सूर्योदयानंतर सूर्यास्त, भरतीनंतर ओहोटी त्याप्रमाणे तेजीनंतर मंदी. आता आपण मंदीचे दाहक चक्र अनुभवत असल्याने, येणाऱ्या वर्षातील निफ्टी निर्देशांकाचा उच्चांक काय असेल आणि तो सद्या:स्थितीत कधी साध्य होईल त्याचा आढावा आपण या व पुढील लेखाच्या माध्यमांतून घेऊ.
यासाठी आपण गेली ३३ वर्षे जुने आणि आजही अचूक कार्यरत असलेले निर्देशांकाचे ‘८ वर्षांचे उच्चांक-नीचांकाचे चक्र’ आणि ‘लोकसभेच्या निवडणुकीनंतर निर्देशांक नीचांकापासून दुप्पट होतो’ या दोन गृहीतकांचा आधार घेऊया.
निर्देशांक दर ८ वर्षांनी उच्चांक अथवा नीचांक नोंदवतो. जसे की १९९२ साली हर्षद मेहताप्रणीत तेजीचा उच्चांक. १९९२ अधिक ८ वर्षे २००० साली डॉट कॉम बूम. २००८ साली जागतिक महामंदी येण्याअगोदरचा उच्चांक. २०१६ साली निफ्टी निर्देशांकावरचा ६,८२५ नीचांक. तर २०२४ ला २७ सप्टेंबरला, निफ्टी निर्देशांकावर २६,२७७ चा उच्चांक नोंदविला जाऊन ‘८ वर्षांचे उच्चांक-नीचांकाचे चक्र’ काळाच्या कसोटीवर आजवर खरे उतरले आहे.
पुढील लेखात येणाऱ्या वर्षातील उच्चांक व तो साध्य होण्याचा कालावधी जाणून घेऊया
(क्रमश:)
आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकाने सातत्याने २२,५०० चा स्तर राखल्यास, निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २२,८८८ ते २३,००० असे असेल. वरील लक्ष्य साध्य झाल्यावर निफ्टी निर्देशांकावर २२,५०० ते २२,२०० पर्यंत घसरण अपेक्षित असून त्यानंतरच्या सुधारणेत निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे २४,२०० ते २४,५०० असे असेल.
महाराष्ट्र सीमलेस लिमिटेड
● ७ मार्चचा बंद भाव- ६५३.५० रु. महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर:-६५५ रु.
● वरील बातमीच्या सकारात्मक परिणामाने समभागाकडून ६५५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७०० रुपये, द्वितीय लक्ष्य ७५० रुपये असे असेल. अन्यथा मंदीच्या रेट्यात सकारात्मक बातमीच निष्फळ ठरेल आणि समभाग ६५५ रुपयांखालीच राहत ५८० रुपयांपर्यंत घसरेल.
क्वेस कॉर्प लिमिटेड
● ७ मार्चचा बंद भाव- २५६.१० रु. / महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर:-६२५रु.
● वरील बातमीच्या सकारात्मक परिणामाने समभागाकडून ६२५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६७५ रुपये, द्वितीय लक्ष्य ७३० रुपये असे असेल. अन्यथा मंदीच्या रेट्यात सकारात्मक बातमीच निष्फळ ठरेल आणि समभाग ६२५ रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५७५ रुपयांपर्यंत घसरेल.
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966 @gmail.com