गेल्या लेखातील वाक्य होते – ‘निफ्टी निर्देशांकावरील अल्पावधीतील १,९०० अंशांची ‘भूमिती श्रेणीतील’ तीव्र वाढ ही ‘अतिघाई संकटात नेई’ स्वरूपाचीही ठरू शकेल. ती तशी ठरल्यास, निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य २२,९०० असेल.’ या वाक्याची प्रचीती सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी आली.
येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकाने २२,७०० चा स्तर राखत २३,१५० चा स्तर पार करणे नितांत गरजेचे आहे. असे घडल्यास आताच्या मंदीच्या वातावरणातील ‘तेजीची झुळूक’ अपेक्षित असून, त्या क्षणिक सुधारणेचे वरचे लक्ष्य २३,५०० ते २३,६५० असेल.
एप्रिल मध्यापर्यंत निफ्टी निर्देशांकाने २३,००० ते २३,६५० स्तरावर पायाभरणी केल्यास निफ्टी निर्देशांक मंदीच्या गर्तेंतून बाहेर येऊ शकेल. त्यानंतर निफ्टी निर्देशांकाची वरची लक्ष्ये ही २४,०००, २४,३००, २४,६०० अशी असतील. ही नाण्याची एक बाजू झाली.
निफ्टी निर्देशांक सातत्याने २३,१५० स्तराखाली राहत, २२,७०० चा स्तरदेखील राखण्यास अपयशी ठरल्यास, निफ्टी निर्देशांकाचे खालची लक्ष्ये ही २२,५००, २२,३००, २२,१५० अशी असतील.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर ‘निर्देशांक नीचांकापासून दुप्पट होतो’ हे गृहीतक काळाच्या कसोटीवर तपासून पाहूया.
या आधी २४ मार्चच्या लेखात आपण २००८ पर्यंतच्या कालावधीचा आढावा घेतला. त्यात २००३ साली मुंबई शेअर बाजार निर्देशांक अवघा ३,००० होता तो २००८ साली २१,००० झाला. २००४ साली काँग्रेसप्रणीत मनमोहन सिंग यांच्या ‘यूपीए-१’ सरकारला डाव्या पक्षांचा बाहेरून पाठिंबा होता. भारत-अमेरिका अणुकरारामुळे डाव्यांनी यूपीए-१ सरकारचा पाठिंबा काढून घेतला. तेव्हा मुलायमसिंग यादव यांच्या २५ खासदारांच्या पाठिंब्यामुळे सरकार तगले. २००९ साली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या. आता आपले वरील गृहीतक पुन्हा एकदा काळाच्या कसोटीवर खरे उतरले. २००९ साली डाव्या पक्षांच्या पाठिंब्याशिवाय काँग्रेसप्रणीत ‘यूपीए-२’ सरकारला पूर्ण बहुमत मिळाल्याने निर्देशांकाला इतिहासात प्रथमच खरेदीची/ तेजीची दोन ‘वरची सर्किट’ लागली. त्या तेजीने बाजारासाठी इतिहासच निर्माण केला. २०१३ सालच्या उत्तरार्धात भाजपतर्फे नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील हे जाहीर झाले, तेव्हा ३० ऑगस्ट २०१३ ला निफ्टी निर्देशांक ५,११८ वर होता. प्रत्यक्षात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्याने २७ ऑक्टोबर २०१७ ला १०,३६६ चा उच्चांक नोंदवला.
बातमीतील समभाग
सरलेल्या सप्ताहात जगातील सर्व भांडवली बाजार ‘जंप-डंप-ट्रम्प’ या तीन शब्दांभोवती फेर धरताना दिसले. भांडवली बाजारात घातक चढ-उतार होत होते. ट्रम्प यांच्या आयात कराच्या मसुद्यात, हातात भिंग घेऊन ‘दोन ओळींमधील’ मजकूर वाचायचा प्रयत्न केल्यास, भारतीय औषधी कंपन्यांची जी उत्पादने अमेरिकेला निर्यात होतात त्यांना अमेरिकेने आयात करातून तूर्त वगळले आहे. या बातमीच्या पार्श्वभूमीवर भारतीय औषध कंपन्याचे समभाग हे आपले आजचे ‘बातमीतले समभाग’ असणार आहेत.
ऑरोबिंदो फार्मा लिमिटेड
४ एप्रिलचा बंद भाव- १,१०५.३५ रु.
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १,१५० रु.
वरील बातमीच्या सकारात्मक परिणामामुळे समभागाकडून १,१५० रुपयांचा स्तर पार करत, प्रथम वरचे लक्ष्य १,२०० ते १,३०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,५०० रुपये गाठले जाईल. अन्यथा मंदीच्या रेट्यात, सकारात्मक बातमीच निष्फळ ठरत समभाग १,१५० रुपयांच्या महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तराखालीच राहत १,०३० रुपयांपर्यंत घसरेल.
डॉ. रेड्डी लॅबॉरेटरीज लिमिटेड
४ एप्रिलचा बंद भाव- १,१०९.९५ रु.
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १,२५० रु.
वरील बातमीच्या सकारात्मक परिणामातून, समभागाकडून १,२५० रुपयांचा स्तर पार करत, प्रथम वरचे लक्ष्य १,३५० रुपये, द्वितीय लक्ष्य १,४५० रुपये गाठले जाईल. अन्यथा मंदीच्या रेट्यात,,सकारात्मक बातमीच निष्फळ ठरत, समभाग १,२५० रुपयांच्या महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तराखालीच राहत १,०४० रुपयांपर्यंत घसरेल.
– आशीष ठाकूर
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती:-शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टाॅप लाॅस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.