राजा हा जगाचा उपभोगशून्य स्वामी आहे असे राम गणेश गडकरी सांगून गेले. वास्तवात सध्याच्या जगात समाजाचा मोठा वर्ग हा राजासारखा उपभोग घेताना दिसतो आहे. रिझर्व्ह बँकेने प्रसृत केलेल्या आकडेवारीनुसार, सामान्य माणसाच्या जगण्याचे आर्थिक निकष बदलताना दिसत आहेत. रिझर्व्ह बँकेची ही आकडेवारी भारतीयांच्या उपभोगाच्या कक्षा रुंदावत असल्याचे अधोरेखित करते. गेल्या काही वर्षांत भारतीयांच्या बचतीचा दर आटला असून दरडोई कर्जाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारतातील तरुण पिढीने ‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’ या विचारधारेला तिलांजली देत, उपभोगाला प्राधान्य दिल्याचे दिसते आहे. नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढते तसा त्यांच्या उपभोगावरील खर्चात वाढ होते. भारतीय नागरिक बचतीपेक्षा प्रसंगी कर्ज काढून विविध गोष्टींच्या उपभोगावर अधिक खर्च करत असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या या आकडेवारीने दाखवून दिले आहे.

सुमारे साठ वर्षांपूर्वी भारतीयांची सरासरी बचत दहा टक्क्यांपेक्षाही कमी होती. वाढत्या दरडोई उत्पन्नामुळे उत्तरोत्तर ती वाढत गेली आणि २०१०च्या दशकात बचतीच्या दराने ३६ टक्क्यांचे शिखर गाठले. आता बचतीच्या दरात पुन्हा घट होत असून सध्या बचतीचा दर ९ टक्क्यांदरम्यान आहे. कर्जातील वाढ हा वाढत्या उपभोगाचा परिणाम आहे. भारतीय नागरिक त्यांची मिळकत विविध गोष्टींसाठी (उपभोगासाठी) खर्च करीत असल्याने बचतीत घट झाली आहे. घटत्या बचतदराबाबत अर्थतज्ज्ञ चिंतित असले तरी, वाढता उपभोग लक्षात घेता ज्या वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतला जातो त्या कंपन्यांत गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करता येते हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
grse recruitment 2024 opportunities in indian education sector
शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

हेह वाचा – Money Mantra: IFSC कोड काय असतो आणि तो इतका महत्त्वाचा का?

उपभोग ही थीम दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी पोर्टफोलिओमध्ये कधीही समावेश करावा अशी गोष्ट आहे. याअंतर्गत मनोरंजन, पर्यटन, जीवनावश्यक वस्तू आणि सेवा, आदरातिथ्य आणि अगदी आरोग्यनिगेवरील खर्च आदींचा समावेश होतो. या क्षेत्रातील कंपन्या निवडण्यास म्हणूनच विस्तृत वाव असून उद्योगांच्या विविध क्षेत्रांत ग्राहकांनी केलेल्या खर्चाचा समावेश ‘उपभोगा’अंतर्गत होतो. दहा वर्षांपूर्वी उपभोगाअंतर्गत केवळ ‘एफएमसीजी’सारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश होत होता. बदललेल्या परिस्थितीत एफएमसीजी, हवाई प्रवास, प्रवासी वाहने, पेये, दळणवळण, मनोरंजन इत्यादी उद्योगांत असणाऱ्या कंपन्यांत गुंतवणूक करणे शक्य होत आहे. ज्या फंडाच्या गुंतवणुकीत या उद्योगांतील कंपन्यांचा समावेश असलेल्या निप्पॉन इंडिया कन्झम्प्शन फंडाचा गुंतवणूकदारांनी विचार करायला हवा.

अमर काळकुंद्रीकर हे निप्पॉन इंडिया कंझम्शन फंडाचे २० ऑक्टोबर २०२० पासून निधी व्यवस्थापक आहेत. काळकुंद्रीकर यांनी कोलंबिया बिझनेस स्कूलमधून ‘एमबीए’ केले असून त्यांनी वाणिज्य शाखेमध्ये पदवी संपादन केली आहे. शिवाय ते सनदी लेखापाल (सीए), आर्थिक विश्लेषक (सीएफए) आहेत. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडात दाखल होण्यापूर्वी ते एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडमध्ये कार्यरत होते. विविध उद्योग क्षेत्राशी संबंधित समभाग संशोधन त्यांनी केले आहे. हा फंड २० एप्रिल २०१८ पूर्वी निप्पॉन इंडिया मिडिया ॲण्ड एन्टरटेनमेंट फंड म्हणून ओळखला जात होता. सेबीच्या फंड सुसूत्रीकरणानंतर हा फंड निप्पॉन इंडिया कन्झम्प्शन फंड म्हणून ओळखला जाऊ लागला.

फंडाच्या गुंतवणुकीत असलेल्या हिंदुस्तान युनिलिव्हर, मारुती सुझुकी यांसारख्या कंपन्यांनी एप्रिल जून तिमाहीच्या निकालांवर भाष्य करून असे सूचित केले की, वर्ष २०२२ मध्ये महागाईमुळे त्यांच्या उत्पादनांच्या मागणीत घट झाली होती. तसेच पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली. परिणामी नफ्याचे प्रमाण घटले. मात्र एप्रिल जून २०२३ या कालावधीत मागणीत वाढ दिसून आली असून महागाई कमी झाल्याने नफ्याचे प्रमाण सामान्य होत आहे. विक्री वाढविण्यासाठी कंपन्या जाहिरातींच्या खर्चाला चालना देण्यास सज्ज झाल्या आहेत. एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२२ हा सर्वात वाईट मंदीचा कालावधी संपुष्टात आला असून उत्सवी हंगामात कंपन्या नवीन उत्पादने बाजारात आणण्यास सज्ज झाल्या आहेत. मॅरिकोसारख्या कंपन्या नफ्याचे अधिक प्रमाण असलेली आरोग्यदायी खाद्यपदार्थ, निरोगीपणा, पुरषांची सौदर्यप्रसाधने इत्यादीसारख्या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेत आपले स्थान बळकट करण्याची रणनीती आखत आहेत. दुसऱ्या बाजूला रिझर्व्ह बँकेचा ग्राहक आत्मविश्वास निर्देशांक (कन्झ्युमर कॉन्फिडन्स इंडेक्स) सकारात्मक संकेत देत आहे. अत्यावश्यक आणि अनावश्यक गोष्टींवर खर्च करण्यात जानेवारी २०२३ पासून लक्षणीय वाढ झाली आहे. वर्तमान परिस्थिती निर्देशांकात चांगल्या पुनर्प्राप्तीचे संकेत देत असून नजीकच्या काळात मागणीत वाढ होण्याची आशा आहे. वाढत्या महागाईने २०२२ मध्ये सर्वच ग्राहकाभिमुख उत्पादनांच्या मागणीत घट झाली होती. वर्ष २०२२ मधील चारही तिमाहीत कंपन्यांच्या ग्रामीण भारतातील मागणीत सातत्याने घट होत होती. एप्रिल-जून २०२३ पासून आधीच्या तिमाहीच्या तुलनेत ३ टक्के वाढ झाली असून बिगर-खाद्य श्रेणींमध्ये मूल्यवृद्धी झाल्याचे आढळले.

पुनर्प्राप्ती पूर्ण होणे अद्याप बाकी असताना, बाजाराला सणोत्सवाच्या काळात ग्राहकांकडून वरील बाबींवर मोठा खर्च होण्याच्या अपेक्षेने ‘निफ्टी कन्झम्प्शन’ निर्देशांकातील वाढ निफ्टीच्या वाढीपेक्षा अधिक आहे. परंतु निर्देशांकात वाढ होऊनही ‘निफ्टी कन्झम्प्शन’ निर्देशांकाच्या मूल्यांकनात (पीई) घट झाली आहे. त्यामुळे, सध्याचे मूल्यांकन सरासरीच्या आत राहिले आहे.

या फंडाच्या परिघात असलेल्या उद्योगांचे सकल राष्ट्रीय उत्पादनातील (जीडीपी) वाटा ६१ टक्के आहे. म्हणूनच निप्पॉन इंडिया कन्झम्प्शन फंड हे संपत्ती निर्मितीचे दीर्घकाळ साधन ठरू शकते. क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट आता आपला साखळी विस्तार लहान शहरात करत आहेत. सर्व क्षेत्रांमध्ये जसे की, खाद्यपदार्थ, वैयक्तिक निगा, गृहनिगा, प्रवासी वाहन, तयार कपडे, पर्यटनासाठी होणारा प्रवास इत्यादी उत्पादन आणि सेवांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आहे. वैयक्तिक उपभोगात मोठे बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे ही वाढ वाढत्या दरडोई उत्पन्नामुळे शाश्वत ठरेल, असे संकेत मिळत आहेत. घरगुती उत्पादने (देशाअंतर्गत बाजारपेठेत मागणी असलेली उत्पादने आणि सेवा) कंपन्यांसाठी हा सकारत्मक संकेत असून कंपन्यांची नफा क्षमता वाढेल असा विश्लेषकांचा अंदाज आहे. विविध आर्थिक अहवाल देशाच्या दरडोई उत्पन्नातील वाढीचे वेगवेगळे अंदाज व्यक्त करतात. सध्याच्या २,४५० अमेरिकी डॉलरवरून आर्थिक वर्ष २०३० मध्ये दरडोई उत्पन्न ४,००० अमेरिकी डॉलरवर पोहोचलेले असेल असा अंदाज या आर्थिक अहवालांनी व्यक्त केला आहे. वाढत्या घरगुती उत्पन्नातील वाढ आणि उच्च उत्पन्न असलेल्या कुटुंबांची वाढती संख्या यामुळे विवेकाधीन खर्चात वाढ होण्याची अपेक्षा आहे. या अंदाजानुसार, विवेकाधीन खर्च आर्थिक वर्ष २०२२ मधील ७४ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०३० पर्यंत ७९ टक्क्यांपर्यंत विस्तारेल असा अंदाज आहे.

वर्तमानात अशा संधी लहान दिसत असल्या तरी भविष्यात तिचे रुपांतर मोठ्या संधीत होण्याची शक्यता निधी व्यवस्थापकांना वाटते आहे. भविष्यात गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध होणारी अनेक उत्पादने ‘प्रॉडक्ट लाइफ सायकल’च्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहेत. सेक्टरल फंडाच्या गुंतवणुकीत ८० टक्के गुंतवणूक त्या सेक्टरमध्ये करणे सक्तीचे असते. उर्वरित २० टक्के गुंतवणूक सेक्टरबाहेर करताना सशक्त ताळेबंद असलेल्या, परिचित आणि नावाजलेल्या नाममुद्रा असलेल्या कंपन्यांची निवड केली जाते. यामुळे ग्राहकांच्या अनावश्यक वस्तू ज्याची ग्राहकांना दररोज आवश्यकता नसते. अशा वस्तूंमध्ये चैनीच्या वस्तू, वाहने, पर्यटन, फास्ट-फूड, तयार फर्निचर आणि उपकरणे यांचा समावेश होतो. दुसरीकडे कपडे, अन्न, पेये, घरगुती वापराच्या वस्तू ज्या सध्या कुटुंबांसाठी चैनीच्या वस्तू आहेत त्या आवश्यक बाबी ठरतील.

हेही वाचा – Money Mantra: प्रश्न तुमचे, उत्तरं तज्ज्ञांची

कन्झम्प्शन फंडांमधून निप्पॉन इंडिया कन्झम्प्शन फंडाची निवड अनेक गोष्टींवर केली आहे. अमर कालकुंद्रीकर हे निप्पॉन कन्झम्प्शन फंड पोर्टफोलिओमधील कंपन्यांत नफावसुली करण्यात आणि आवश्यक तेव्हा गुंतवणुकीतून बाहेर पडण्यात पारंगत आहेत. ताज्या उपलब्ध पोर्टफोलिओनुसार, ५० टक्के लार्जकॅप, १९ टक्के मिडकॅप आणि २४ टक्के स्मॉलकॅप कंपन्यांचा समावेश आहे. सर्व कन्झम्प्शन फंडांचा विचार करता सर्वाधिक स्मॉलकॅप कंपन्या निप्पॉन इंडिया कन्झम्प्शन फंडाच्या गुंतवणुकीत आहेत.

निप्पॉन इंडिया कन्झम्प्शन फंडाची निवड ही फंडाची कामगिरी आणि पोर्टफोलिओ या दोन्हींमुळे करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फंड ‘निफ्टी कन्झम्प्शन’ निर्देशांकाच्या तुलनेत सतत आठ तिमाही सरस परतावा दिलेला फंड आहे. मागील ३ वर्षे आणि १ वर्षाच्या कालावधीत फंडाने निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी केली आहे. कामगिरीच्या सातत्यामुळे या फंडाने एसबीआय कन्झम्प्शन, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एफएमसीजी आणि मिरे असेट ग्रेट कन्झ्युमर फंडांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. निप्पॉन कन्झम्प्शनचा सध्याचा पोर्टफोलिओ इतर कन्झम्प्शन फंडांपेक्षा अधिक वैविध्यपूर्ण आहे. तुमच्या दीर्घकालीन पोर्टफोलिओमध्ये याचा समावेश करता येऊ शकतो. तसेच या फंडात गुंतवणूक करून तुम्ही १२ ते १५ उद्योग क्षेत्रात गुंतवणूक राखू शकता. एक रणनीती म्हणून या फंडातील गुंतवणूक नक्कीच सुगीचे दिवस दाखवू शकेल.