डॉ. आशीष थत्ते

इतक्या चांगल्या उत्कर्षानंतर नीरव मोदीची बुद्धी नक्की कुठे फिरली हे सांगणे कठीण आहे, पण जेव्हा फिरली तेव्हा आयुष्य अक्षरशः रसातळाला घेऊन गेली. ‘लेटर ऑफ अंडरस्टॅण्डिंग’ म्हणजे परदेशातील विक्रेत्याला तेथीलच बँकेने दिलेली हमी. प्रत्यक्षात परदेशी बँक हे पैसे द्यायची पण भारतातील बँक हमीदार म्हणून राहायची. मार्च २०११ ला त्याने पहिले ‘लेटर ऑफ अंडरस्टॅण्डिंग’ बनवले, जे खरेखुरे होते आणि अखेरचे नोव्हेंबर २०१७ ला बनवले होते. मधल्या ६ वर्षांत तब्बल १,२१२ अशा प्रकारची पत्रे बनवली गेली, ज्यातील फक्त ५३ अस्सल होते. जेव्हा नीरव मोदीचा व्यवसाय जोरात असताना १० कोटी रुपये घेऊन आपल्या नाममुद्रेची ‘फ्रँचाइसी’ म्हणजे विशेष हक्क द्यायचा आणि सोबत २५ कोटी रुपयांचे सामानसुद्धा द्यायचा. हरिप्रसाद नावाच्या एका व्यावसायिकाने असेच १० कोटी रुपये नीरव मोदीला दिले पण बदल्यात त्याने हरिप्रसादला काहीच दिले नाही. मग त्याने बऱ्याच तक्रारी केल्या, पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला. त्याने मग या घोटाळ्याची माहिती यंत्रणांना दिली पण त्याची कुणीच दाखल घेतली नाही.

आपल्या चांगल्या दिवसांमध्ये तो लोकांना फसवतच होता. खरे त्याचे दिवस फिरले ते ३१ मार्च २०१७ नंतर जेव्हा पंजाब नॅशनल बँकेचा त्याचा साथीदार गोकुळनाथ शेट्टी निवृत्त झाला आणि नवीन बँक व्यवस्थापकाने म्हणजे दिनेश भारद्वाजने त्याची जागा घेतली. त्यानंतर ६ ते ७ महिन्यांनी ३२३ कोटींच्या ‘लेटर ऑफ अंडरस्टॅण्डिंग’साठी त्याच्या कंपनीचे अधिकारी बँकेकडे गेले. बँकेच्या नवीन व्यवस्थापकाने त्यांना तारण म्हणून काही तरी ठेवा असे सांगितले तेव्हा नीरव मोदींच्या कंपनीतील लोकांनी व्यवस्थापकालाच वेड्यात काढले आणि सांगितले की, एवढी वर्षे आमच्याकडे कधी काही तारण म्हणून मागितले नाही तर आज का मागताय? हे ऐकून दिनेश भारद्वाज यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी मग जुन्या ‘लेटर ऑफ अंडरस्टॅण्डिंग’चा इतिहास तपासला तेव्हा असे लक्षात आले की, कधीच कुठलीच मालमत्ता तारण म्हणून ठेवण्यात आली नव्हती आणि पंजाब नॅशनल बँक आता सुमारे ११,००० कोटींची परदेशातील बँकांसाठी हमीदार बनली होती. जानेवारी २०१८ च्या पहिल्या आठवड्यात बँकेने अखेरीस नीरव मोदी आणि त्यांच्या सर्व कंपन्यांना पैसे परत करण्यास आणि सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले. अर्थात तोपर्यंत नीरव मोदी परदेशात पळून गेला होता आणि बँकेचे पैसे बुडाल्याचे स्पष्ट झाले होते. कित्येक महिने त्याचा सुगावासुद्धा लागत नव्हता. ब्रिटनच्या सरकारलासुद्धा तो आपल्याच देशात नक्की कुठे आहे ते माहीत नव्हते (किंवा सांगायचे नव्हते). मग एक दिवशी अचानक एका पत्रकाराला लंडनच्या ऑक्सफर्ड रस्त्यावर नीरव मोदी दिसतो आणि त्याची ‘नो कमेंट्स’ असे सांगणारी मुलाखत वायरल होते. यथावकाश त्याला ब्रिटनमध्ये अटक होते आणि सध्या तो लंडनमधील कारागृहात बंदिस्त आहे. त्याच्या मालमत्तांचा लिलाव चालू आहे आणि मागील आठवड्यात त्याचे मुंबईतील काळा घोडा येथील रीदम हाऊस नावाचे प्रसिद्ध दुकान अभिनेत्री सोनम कपूरने ४७ कोटी रुपयांना विकत घेतले. ब्रिटनवरून कोहिनूर किंवा नीरव कुठला तरी हिरा परत येईल याची वाट आजसुद्धा देशातील नागरिक बघत आहेत, कारण अखेर ‘हिरा है सदा के लिये’.