NPS Withdrawal Rules: पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच PFRDA ने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत खात्यातून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. PFRDA ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हे नवीन नियम १ फेब्रुवारी २०२४ पासून लागू होतील. NPS च्या नवीन नियमांनुसार, आता कोणत्याही NPS खातेदाराला एकूण जमा केलेल्या रकमेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. यामध्ये खातेदार आणि नियोक्ता दोघांच्याही योगदानाची रक्कम समाविष्ट आहे.
हेही वाचाः Money Mantra : आधार क्रमांक यापुढे जन्मतारखेचा पुरावा मानला जाणार नाही, EPFO ने घेतला मोठा निर्णय
तुम्ही NPS खात्यातून आंशिक पैसे काढू शकता
PFRDA नुसार, NPS खातेधारकांना NPS खात्यातून काही विशिष्ट परिस्थितीत पैसे काढण्याची सुविधा मिळते. याबद्दल जाणून घ्या-
- मुलांचे शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी NPS खात्यातून पैसे काढता येतात.
- घर खरेदी करण्यासाठी NPS खात्यातून पैसे काढता येतात.
- वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत NPS सदस्यांना खात्यातून पैसे काढण्याची परवानगी मिळते.
- अपंगत्वामुळे अचानक होणारा खर्च भागवण्यासाठी NPS खातेधारक खात्यातून पैसे काढू शकतात.
- कौशल्य विकासाचा खर्च भागवण्यासाठी NPS खात्यातून पैसे काढण्याची परवानगी दिली जाते.
- स्टार्टअप किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी एनपीएस पैसे काढण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
NPS मधून पैसे काढण्यासाठी ‘या’ अटी पूर्ण करणे आवश्यक
- NPS खात्यातून २५ टक्के रक्कम काढण्यासाठी तुमचे खाते तीन वर्षे जुने असणे आवश्यक आहे.
- यासह काढलेली रक्कम तुमच्या एकूण रकमेच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त नसावी.
- NPS खातेधारकांना त्यांच्या NPS खात्यातून जास्तीत जास्त तीन वेळा आंशिक पैसे काढण्याची परवानगी आहे.
हेही वाचाः विश्लेषणः भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल जागतिक गुंतवणूकदारांना ‘या’ ३ मुख्य चिंता; कसा मार्ग काढणार?
पैसे कसे काढायचे?
NPS खात्यातून पैसे काढण्यासाठी खातेधारकाने प्रथम पैसे काढण्याची विनंती सबमिट करणे आवश्यक आहे. याबरोबरच तुम्हाला पैसे काढण्याचे कारणही द्यावे लागेल. यानंतर CRA (Central Recordkeeping Agency) तुमची NPS मधून पैसे काढण्याची प्रक्रिया करेल आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांत पैसे तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील.