NPS Withdrawal Rules Changing: नॅशनल पेन्शन सिस्टमच्या सदस्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. PFRDA म्हणजेच पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, NPS खातेधारकांसाठी खात्यातून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. आता खातेदारांना पुढील महिन्यापासून जमा केलेल्या रकमेपैकी केवळ २५ टक्के रक्कम काढता येणार आहे.
फक्त २५ टक्के रक्कम खात्यातून काढता येतात
पेन्शन नियामक PFRDA ने १२ जानेवारी २०२४ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, NPS खातेधारक मुलांचे शिक्षण, लग्नाचा खर्च, घर खरेदी, वैद्यकीय खर्च इत्यादींसाठी त्यांच्या खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी केवळ २५ टक्के रक्कम काढू शकतील. याशिवाय तुमचा स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी NPS खात्यातून पैसे काढता येतात. खातेदार आणि नियोक्ता दोघांच्याही योगदानाची रक्कम यामध्ये समाविष्ट आहे. नवीन नियम १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत.
हेही वाचाः अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून मध्यमवर्गाला काय अपेक्षा? जाणून घ्या
काही दिवसांत खातेदारांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जाणार
जर नॅशनल पेन्शन सिस्टम खातेधारकाला त्याच्या खात्यातून आंशिक पैसे काढायचे असतील, तर त्यासाठी तुम्हाला प्रथम सुरक्षित घोषणेसह पैसे काढण्याची विनंती सबमिट करावी लागेल. जर खातेधारक कोणत्याही आजाराने त्रस्त असेल, तर मास्टर परिपत्रकाच्या पॅरा ६(डी) अंतर्गत त्याच्या कुटुंबातील सदस्याला आंशिक पैसे काढण्यासाठी पैसे काढण्याची विनंती सबमिट करण्याचा अधिकार आहे. पैसे काढण्याची विनंती करताना खातेदाराला पैसे काढण्याच्या कारणाची माहिती द्यावी लागेल. यानंतर सीआरए (Central Recordkeeping Agency) या पैसे काढण्याच्या विनंतीची चौकशी करेल आणि त्यानंतर त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. ही सर्व माहिती बरोबर आढळल्यास काही दिवसांत खातेधारकाच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जाणार आहेत.
खात्यातून आंशिक पैसे काढण्यासाठी ‘या’ अटी पूर्ण करणे आवश्यक
- NPS खात्यातून पैसे काढण्यासाठी तुमचे खाते किमान ३ वर्षे किंवा त्याहून जुने असले पाहिजे.
- काढलेली रक्कम खात्यात जमा केलेल्या निधीच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त नसावी.
- एक ग्राहक फक्त तीन वेळा खात्यातून आंशिक पैसे काढू शकतो.