रविवारची सकाळ! सकाळी आरामात उठून, नाश्ता झाल्यावर सुयश निवांत बसला होता!
“बघता बघता आज पहिली नोकरी सुरू होऊन तीन महिने झाले”! त्याच्या मनात विचार आला.
एका मध्यमवर्गीय त्रिकोणी कुटुंबात मोठं होताना, इंजिीअरिंग चं शिक्षण उत्तम प्रकारे पूर्ण करून ,’ कॅम्पस सिलेक्शन ‘ मध्ये एका नामांकित कंपनीमध्ये चांगल्या प्रकारची लागते काय आणि आज बघता बघता तीन महिने पूर्ण होतात काय! अर्थात ‘ पॉकेटमनी ‘ ते ‘ Salary credited ‘ पर्यंतचा प्रवास आनंददायी होता!
पहिल्या पगारातून आईबाबांना एका मोठ्या हॉटेल मध्ये जेवण, आईला छानशी साडी, बाबांना चांगलं घड्याळ, नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला पार्टी.. या सगळ्यात पहिले काही पगार झाले..
पण आता पुढे काय?
महिन्याकाठी मिळणाऱ्या पगारातून मी अर्थनियोजन कसं करू?
आईबाबांनी बचतीचे महत्त्व आधीच सांगितले आहे. मित्र शेअर बाजारात गुंतवणूक करतायत, office मधले सहकारी म्युच्युअल फंड बद्दल बोलतायत.. या सगळ्यात स्वतः साठी काय योग्य ते कसं ठरवणार? सुयश साठी आणि त्याच्या सारख्या सगळ्यांसाठीच आपण आर्थिक नियोजन कसे केले जाऊ शकते ते पाहू!
१.आर्थिक नोंदी ठेवा
स्वतः च्या कमाईचे पैसे हातात आल्यावर अनेकदा काय करावं समजत नाही. सुरुवात तुम्ही आर्थिक नोंदी ठेवण्यापासून करा. तुमचा पगार, दैनंदिन खर्च, कौटुंबिक आणि वैयक्तिक खर्च, इ ची नोंद करा. आजही आपल्या घरात मोठी माणसे नियमित हिशोब लिहीत असतात. काहीसे कंटाळवाणे असले तरी हे महत्त्वाचे आहे. यातून तुम्हाला तुमच्या गरजांवर होणारे खर्च आणि वायफळ खर्च समजतील. तुमची खर्च करण्याची पद्धत कळेल आणि तुम्ही किती रुपयांची बचत करू शकता ते समजेल. वाढत्या महागाईमुळे , आपल्याला जास्तीत जास्त बचत आणि गुंतवणूक गरजेची आहे. एखाद्या डायरी मध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटर मध्ये एक्सेल शीट वर तुम्ही हे नोंद ठेऊ शकता.
आणखी वाचा: मुलीच्या भविष्यासाठी अशी करा आर्थिक गुंतवणूक!
२. गुंतवणुकीची विविध साधने आणि प्रकाराची माहिती घ्या
आज बाजारात गुंतवणुकीचे विविध मार्ग आणि पर्याय उपलब्ध आहेत. अगदी पोस्ट office गुंतवणुकी, बँकातर्फे केल्या जाणाऱ्या गुंतवणुकी जसं की फिक्स्ड डिपोसिट, रिकरिंग डीपोसिट, इ, शेअरमार्केट गुंतवणुकी, म्युच्युअल फंड, बॉण्ड्स, कॉर्पोरेट फिक्स्ड Deposit इ अनेक पर्याय आहेत. प्रत्येक पर्यायाचे वैशिष्ट्य असते, फिचर्स असतात ती समजून घेणे उत्तम. जसं की गुंतवणूक करतानाची आणि गुंतवणूक काढून घेतानाची प्रक्रिया, गुंतवणूक कालावधी, tax implication, जोखीम इत्यादी गोष्टी किमान माहिती करून घ्या. यामुळे तुम्ही गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडू शकाल आणि कोणीही तुम्हाला फसवू शकणार नाही. विविध अर्थविषयक वृत्तपत्रे, ब्लॉग, पुस्तके, इत्यादी माध्यमातून हे माहिती तुम्हाला सहज मिळू शकेल. फक्त ती माहिती शुद्ध स्वरूपातील हवी.
३. आपात्कालीन निधी तयार करा
आजचं जग हे स्पर्धेचे आहे! या स्पर्धेत आपली नोकरी टिकवणे,आणि करिअर मध्ये उत्तम कामगिरी करणे महत्त्वाचे आहे. आयुष्यात अनेकदा आपल्याला आपात्कालीन परिस्थितीचा सामना करायला लागू शकतो. जसं की नोकरीतले अचानक झालेला बदल, पगार कपात, इत्यादी. अशा कोणत्याही आप्तकालीन परिस्थितीमध्ये आपले ‘ आर्थिक स्वावलंबन ‘ कायम ठेवण्यासाठी ‘ आपात्कालीन निधी ‘ हवाच! यात तुमच्या मासिक खर्चाच्या किमान १२ महिने पुरेल इतकी रक्कम हवी. जेणेकरून तुमचे कौटुंबिक खर्च जसा की किराणा माल, औषधोपचार इ, वैयक्तिक खरंच, शैक्षणिक कर्ज हफ्ते, इ आवश्यक खर्चाचा समावेश होतो. उदा. तुमची मासिक खर्चाची रक्कम रु 50,000 इतकी आली तर रू 6 लाख इतका तुमचा आपातकालीन निधी तयार करायला हवा. हा निधी तुम्ही सेविंग्ज अकाऊंट, कमी कालावधीचे बँक फिक्स्ड Deposit, लिक्वीड डेट फंड इत्यादी मध्ये गुंतवू शकता.
आणखी वाचा: लहान मुलांनाही करून द्या पैशांची ओळख
४. ध्येय निश्चित करा
तरुण वयात उभं आयुष्य पुढ्यात असताना तुम्ही वेळीच ध्येय निश्चित केली पाहिजेत. यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कष्टाच्या पैशांना योग्य दिशा मिळेल. यात तुम्ही कमी, मध्यम आणि लांब पल्ल्याची ध्येय निश्चित करू शकता. उदा. स्वतः ची गाडी घेणे, घेतलेले शैक्षणिक कर्ज लवकरात लवकर फेडणे इ. या ध्येयांचा कालावधी तुम्ही ठरवा. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आजच्या किमातीनुसर किती रक्कम लागेल हे ठरवा . यामुळे महागाईच्या दरानुसार भविष्यातील ध्येयाची रक्कम उभी करणे तुम्हाला कळेल.
५. जोखीम क्षमता तपासा
एकदा गुंतवणुकीच्या सर्व पर्यायांची ओळख झाली, ध्येयनिश्चिती झाली, कालावधी ठरला की तुम्हाला तुमची जोखीम क्षमता उमगेल. जोखीम क्षमता म्हणजे तुम्ही गुंतवलेल्या तुमच्या पैशांवर तुम्ही किती जोखीम घेऊ शकता हे तपासणे. आपले वय, उत्पन्न ध्येय, आर्थिक जबाबदाऱ्या इत्यादी वर आपली जोखीम क्षमता ठरते आणि ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. यामुळे गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडणे सोपे जाते.
६. नियमित गुंतवणूक सुरू करा
एकदा तुमची ध्येयनिश्चिती झाली, जोखीम क्षमता आजमावली आणि गुंतवणूक कालावधी ठरला की तुम्ही योग्य पर्याय निवडून ‘ नियमित गुंतवणूक ‘ सुरू करा.
उदा. ‘येत्या ४ वर्षात रू १० लाख किंमतीची गाडी घेणे ‘ . या ध्येयासाठी तुम्ही दर महिना नियमित पणे बँक रिकरींग deposit, डेट लिक्वीड फंड मध्ये ‘ systematic Investment plan ‘ ( SIP) द्वारे गुंतवणूक करू शकता. नियमित गुंतवणूक तुमच्या पैशांना आणि तुम्हाला शिस्त लावते, आपोआप वायफळ खर्च कमी करते आणि ध्येयप्राप्तीसाठी मदत करते.
७. जीवन विमा आणि आरोग्य विमा घ्या
जर तुमच्यावर कुटुंबातील सदस्य ‘ आर्थिक दृष्ट्या ‘ अवलंबून असतील तर तुम्ही जीवन विमा घेणे गरजेचे आहे. जीवन विम्याचा मुख्य हेतू हा ‘ तुमच्या नंतर तुमच्यावर आर्थिक दृष्ट्या अवलंबून असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे पुढील आयुष्य आर्थिक स्वावलंबनाने व्यतीत करावे ‘ हा आहे. आज बाजारात अनेक प्रकारच्या विमा पॉलिसी उपलब्ध आहेत परंतु हा विमा घेण्यामागचा मुख्य उद्देश सफल करते ‘ टर्म इन्शुरन्स पॉलिसी ‘. ढोबळमानाने तुमच्या वार्षिक आर्थिक उत्पन्नाच्या किमान १५ ते २० पट रक्कम तुम्ही टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतली पाहिजे. ‘ आरोग्य विमा ‘ सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आजकाल वाढत जाणारे वैद्यकीय खर्च, विविध प्रकारचे रोग आणि आजार , त्यांच्या उपचारांचा खर्च, इस्पितळात भरती झाल्यावर येणारे मोठ्या रकमेचे बिल इ ना आर्थिक हातभार म्हणून आरोग्य विमा महत्त्वाचा असतो.
आजकाल जवळपास प्रत्येक कंपनी मध्ये ‘ एम्प्लॉई ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ‘ असते ज्यात तुम्ही आणि आई वडील, लाभ धारक म्हणून समाविष्ट असता. ही पॉलिसी जरी असली तरी तुमची स्वतः ची ‘ वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी ‘ घेणे महत्त्वाचे.
अशा प्रकारे कमाईच्या सुरुवातीच्या काळातच थोडे सजग राहून, विचारपूर्वक आर्थिक नियोजन केले तर त्याचा आपल्याला दूरगामी फायदा होऊ शकतो.