दिवाळी आली की बहुतेक सगळ्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर भरपूर डिस्काऊंट्स चालू असतात. अशा सिझनल डिस्काउंटच्या काळात शॉपिंग करणं अनेकदा फायदेशीर असतं पण हे करत असताना आपली फसवणूक होणार नाही याची काळजीही घेतली पाहिजे. ऑनलाईन शॉपिंग हल्ली मुलंही मोठ्या प्रमाणावर करतात. आईबाबांची क्रेडिट कार्ड्स वापरुन मुलांच्या आणि टिनेजर्सच्या शॉपिंगचं प्रमाण वाढत असताना, मोठ्यांबरोबरच मुलांनीही ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय करायचं हे समजून घेतलं पाहिजे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑनलाईन शॉपिंग करताना काय काळजी घ्या!

ज्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवरुन शॉपिंग करायची आहे ती साईट खात्रीलायक आहे का? हे तपासा. कुठल्यातरी लिंकवरुन आलेल्या साईटवरून शॉपिंग करू नका. तुम्ही पूर्वी ज्या साईट्सवरून शॉपिंग केलेलं आहे अशीच साईट शक्यतो निवडा. काही वेळा साईटस्ही खोट्या असू शकतात. अशावेळी तुमच्या बँक डिटेल्सचा, क्रेडिट कार्ड डिटेल्सचा गैरवापर होऊ शकतो.

फेक वेबसाईटमध्ये मूळ खऱ्या वेबसाईटच्या नावात, लोगोच्या डिझाईनमध्ये किंचित बदल केलेला असतो. त्यामुळे वेबसाईट उघडताना, उघडल्यावर आपण ओरिजिनल वेबसाईटवरच आहोत ना हे तपासा.

वेबसाईटवरचे कीप मी लॉग्ड इन किंवा रिमेम्बर मी सारखे पर्याय कधीही निवडू नका.

डिस्काउंट कुपन्स, पे बॅक ऑफर्स, फेस्टिव्हल कुपन्स यांच्या मोहात अडकू नका. अमुक तमुक कुपन मिळवण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करा, असा मेसेज असेल तर तो ९९ टक्के फेक आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला ठगवण्यासाठी खोटी लिंक, कुपन किंवा QR कोड पाठवलेला असू शकतो.

शॉपिंग अ‍ॅप किंवा वेबसाईटवर जर एखादा फॉर्म असेल आणि ऑटो फीलअप करा असं म्हणत असेल तर कधीही ऑटो फीलअप करु नका. या फॉर्म्समध्ये काही वेळा तुमचे बँक, क्रेडिट/डेबिट कार्ड डिटेल, सीव्हीव्ही नंबर, खाते क्रमांक या गोष्टीही सेव्ह करण्याची सोय असते. त्यांचा गैरवापर होऊ शकतो.

हेही वाचा… वित्तरंजन: कर स्वर्ग (टॅक्स हेवन)

गुगलवरुन कस्टमर केअर नंबर कधीही घेऊ नका. गुगलमध्ये नंबर एडिट करण्याची सोय आहे. त्यामुळे गुन्हेगार मूळ नंबर बदलून त्यांचा नंबर टाकून तुम्हाला फसवू शकतो. त्यामुळे कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर जो कस्टमर केअर नंबर दिलेला असतो त्यावरच कॉल करा.

दिशाभूल करणाऱ्या ऑफर्स उदाहरणार्थ अमेझॉनकडून आयफोन मोफत मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा. अशा प्रकारचा मेसेज आला, तर अगदी मूलभूत प्रश्न स्वतःला विचारा, अमेझॉन कशाला कुणाला आयफोन फुकट देईल? तरीही मोह होतच असेल तर एकदा अमेझॉनच्या साईटवर जाऊन खरंच अशी कुठली ऑफर सुरु आहे का हे तपासा. मागचा पुढचा विचार न करता, काहीतरी फुकट मिळतंय म्हणून गुन्हेगारांच्या गळाला लागू नका.

OTP कधीही कुणाशीही शेअर करू नका. जर समोरची व्यक्ती क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा OTP मागत असेल तर तो तुम्हाला फसवतोय हे लक्षात घ्या आणि सुरू असलेलं संभाषण थांबवा. नंबर ब्लॉक करा. त्या नंबरवरुन आलेल्या लिंक्सवर क्लिक करू नका.

क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून ऑनलाईन शॉपिंग करायचं असेल तर ते घरच्या किंवा ऑफिसच्या संगणकावरुनच केलं पाहिजे. या गोष्टी नेट कॅफेत बसून करु नयेत. कॅफेत एकच संगणक अनेकजण वापरतात. अशावेळी तुम्ही नीट संगणक बंद केला नाही तर तुमचा पासवर्ड किंवा इतर व्यक्तिगत माहिती इतरांना मिळण्याचा धोका असू शकतो.

हेही वाचा… Money Mantra : आपली आर्थिक पत कोण ठरवतं?

ऑनलाईन शॉपिंग करत असताना समजा त्या साईटने तुम्हाला अनावश्यक माहिती विचारली, म्हणजे तुमचा खाते क्रमांक, त्याचा ऑनलाईन पासवर्ड किंवा एटीम कार्डनंबर तर अजिबात देऊ नका.

समजा, तुमची ऑनलाईन शॉपिंग करताना फसवणूक झालीच तर लगेच जवळच्या पोलीस स्टेशनवर जाऊन तक्रार नोंदवा. जितकी लवकर तक्रार नोंदवाल तितक्या पैसे परत मिळण्याच्या शक्यता वाढू शकतात.

तुम्ही ऑनलाईन तक्रारही नोंदवू शकता. https://cybercrime.gov.in/ या सरकारी साईटवर तुम्ही झालेल्या फसवणुकीची तक्रार नोंदवू शकता.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online shopping fraud one should be careful while shopping online mmdc dvr