पुढील सोमवारी पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंडाला अस्तित्वात आल्याला एक तप पूर्ण होईल. ५ मे २०१३ रोजी सुरुवात झालेल्या या फंडाने पहिल्या वर्षपूर्तीआधी जानेवारी २०१४ मध्ये ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडां’च्या पहिल्या यादीत ‘व्हॅल्यू फंड’ गटात स्थान मिळविले होते. मागील ११ वर्षे कर्त्यांच्या यादीत या फंडाने आपले स्थान अबाधित राखले आहे. गेली १२ वर्षे आपले स्थान कायम राखणारे केवळ ४ फंड असून या चार फंडांपैकी हा एक फंड आहे.
पहिल्यांदा या फंडाची शिफारस केली तेव्हा हा ‘पराग पारीख लाँग टर्म व्हॅल्यू फंड’ होता आणि फंडाची मालमत्ता होती केवळ १,४०० कोटी रुपये. त्या वेळी या फंड घराण्यांकडे केवळ हा एकमेव फंड होता. आज या फंड घराण्याच्या एकत्रित मालमत्तेने मार्च २०२५ अखेरीस १ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ‘सेबी’च्या फंड सुसूत्रीकरणानंतर या फंडाचे १८ फेब्रुवारी २०१८ पासून फ्लेक्सी कॅप गटात संक्रमण झाले. शेवटच्या उपलब्ध आकडेवारीनुसार , ३१ मार्च २०२५ रोजी या फंडाची मालमत्ता ९३,३८१ कोटी रुपये होती. याच फंड गटात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या एचडीएफसी फ्लेक्सी कॅपची मालमत्ता यच दिवशी ६९,६३९ कोटी रुपये होती. पुढील चार पाच महिन्यांत हा फंड १ लाख कोटी मालमत्तेचा टप्पा गाठणारा एकमेव फंड असेल. भारतातील सर्व सक्रिय व्यवस्थापित फंडांच्या मालमत्ता क्रमवारीत हा फंड सर्वाधिक मालमत्ता असणारा ‘इक्विटी फंड’ आहे.
मागील ३० वर्षांच्या संशोधन आणि गुंतवणूक व्यवस्थापनाच्या कारकीर्दीत असा एखादाच बहुप्रसवा (मल्टी बॅगर) फंड सापडतो. हा फंड सर्व प्रकारच्या बाजार आवर्तनाच्या टप्प्यात आणि ‘इक्विटी फंडा’त गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदारासाठी एक आदर्श साधन ठरला आहे. मागील ११ वर्षांत या सदरातून तीन वेळा (२०१६, २०१८ आणि २०२४) या फंडाची शिफारस केली होती. जे चार भारतीय फंड अमेरिकेत गुंतवणूक करतात त्या चार फंडांपैकी हा एक फंड आहे. या फंडाच्या गुंतवणुकीत अमेरिकेत नोंदणी झालेल्या मायक्रोसॉफ्ट, मेटा प्लॅटफॉर्म (फेसबुक), अल्फाबेट (गूगल), ॲमेझॉन या चार कंपन्या आहेत. या फंडाच्या माध्यमातून या बलाढ्य तंत्रज्ञान कंपन्यांच्या यशोगाथेत सहभागी होता येते. शिवाय अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांतील गुंतवणुकीमुळे पोर्टफोलिओमध्ये विविधता आणता येते. हा फंड ‘कॅश कॉल’ घेणारा फंड आहे. ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ रणनीतीचा अवलंब करणाऱ्या या फंडाने फ्लेक्सी कॅप गटातील सर्वच स्पर्धक फंडांना वेगवेगळ्या कालावधींतील परताव्याच्या तुलनेत सातत्यपूर्ण कामगिरीमुळे सतत मागे टाकले आहे. दहा वर्षे कालावधीत ‘एसआयपी’ परताव्याच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा (पहिल्या क्रमांकावर – क्वांटम फ्लेक्सी कॅप, परतावा दर २१.२६ टक्के, मालमत्ता १० हजार कोटी) हा फंड आहे.
गुंतवणूकदारांच्या ‘कोअर पोर्टफोलिओ’चा भाग असण्याची क्षमता असलेला हा फंड आहे. सध्या बाजार, मोठ्या घसरणीतून सावरला असला तरी समभागांचे मूल्यांकन अजूनही वाजवी पातळीवर आहे. साहजिकच ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’साठी ही एक आकर्षक संधी आहे. मागील महिन्याभरात सेन्सेक्सने घसरणीतून जवळजवळ १० हजार अंशांची कमाई केली असली तरी अनेक समभाग त्यांच्या उच्चांकापासून २० ते ४० टक्क्यांनी अजूनही खाली आहेत.
पराग पारिख फ्लेक्सी कॅप हा फंड बाजारातील अस्थिरतेचा फायदा मिळविलेला फंड गटातील सर्वोत्कृष्ट फंड आहे. या फंडाने मागील १२ वर्षात मध्यम (५ ते ७ वर्षे) आणि दीर्घ कालावधीसाठी (७ वर्षांपेक्षा अधिक) गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. फंडाने पॉइंट-टू-पॉइंट आधारावर खालील परतावा कमावलेला आहे.
कालावधी | वार्षिक % | अनुक्रमांक |
१ वर्षे | १३.३९ | ६ |
३ वर्षे | १७.५५ | ७ |
५ वर्षे | २७.४६ | ४ |
७ वर्षे | १९.१४ | १ |
१० वर्षे | १६.०८ | २ |
११ वर्षे | १८.३३ | २ |
पाच वर्षांच्या म्हणजेच ५ मे २०१३ ते २२ एप्रिल २०२५ या कालावधीतील रोलिंग रिटर्न्सचा विचार केला असता, पराग पारिख फ्लेक्सी कॅपने कमाल ३२.७७ टक्के (निफ्टी ५०० टीआरआय २८.८९ टक्के) असा किमान ३.४५ टक्के अधिक परतावा दिला असून, या कालावधीत सरासरी १७.८५ टक्के (निफ्टी ५०० टीआरआय १४.५० टक्के) परतावा दिला आहे. सर्व कालावधीत मानदंड सापेक्ष किमान २.५२ टक्के आणि कमाल ६.५९ टक्के अधिक परतावा त्याने मिळविला आहे. वर नमूद केलेल्या कालावधीत, पाच वर्षांच्या रोलिंग आधारावर, फंड परताव्याने ‘निफ्टी ५०० टीआरआय’ला सर्व वेळा (१०० टक्के) मागे टाकले आहे. ५ मे २०१३ ते २२ एप्रिल २०२५ या कालावधीत फंडाने ३४.७७ टक्के वेळा २० टक्क्यांहून परतावा मिळविला आहे. आणि ७८ टक्के वेळा १५ ते २० टक्के दरम्यान परतावा मिळविला आहे. फंडाने गेल्या १० वर्षांत वार्षिक १८.९२ टक्के तर सुरुवातीपासून १९.२१ टक्के परतावा (एक्सआयआरआर) मिळविला आहे. (सर्व आकडे पराग पारिख फ्लेक्झीकॅप ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’शी संबंधित.)
पराग पारिख फ्लेक्सी कॅपच्या देशांतर्गत समभाग गुंतवणुकीची धुरा राजीव ठक्कर आणि रुकुंद तारकचंदानी हे सांभाळत आहेत, तर परदेशातील गुंतवणुकीची धुरा रौनक ओंकार आणि रोखे गुंतवणुकीची धुरा मानसी क्रिया आणि राज मेहता सांभाळत आहेत. फंडाचा पोर्टफोलिओ जवळजवळ ७० टक्के लार्ज कॅपकडे झुकलेला आहे. लार्ज कॅप कंपन्यांच्या वाजवी मूल्यांकन असलेल्या कंपन्यांचा गुंतवणुकीत समावेश असतो. वर उल्लेख केल्यानुसार, फंडाने अमेरिकेत नोंद झालेल्या मायक्रोसॉफ्ट, मेटा प्लॅटफॉर्म, अल्फाबेट, आणि ॲमेझॉन यामध्ये मिळून १०.७० टक्के गुंतवणूक राखली आहे. भारतीय म्युच्युअल फंडांना परदेशातील गुंतवणुकीवर फेब्रुवारी २०२२ मध्ये सेबी आणि रिझर्व्ह बँकेने बंदी आणण्यापूर्वी एकूण मालमत्तेत परदेशी गुंतवणुकीचा ३३ टक्के वाटा होता. फेब्रुवारी २०२२ पासून महिन्यागणिक या टक्केवारीत घट होत आली आहे. पोर्टफोलिओचा भारतीय समभाग गुंतवणुकीचा हिस्सा ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’केंद्रित आहे आणि बहुतेक गुंतवणुका ‘बाय ॲण्ड होल्ड’ प्रकारात मोडतात.
फंडाच्या गुंतवणुकीत नेहमी १० टक्के किंवा त्याहून अधिक मालमत्ता ही रोख रक्कम आणि रोखे गुंतवणुकीच्या रूपात असते. हा आकडा गेल्या सहा-सात महिन्यांत २० टक्क्यांपर्यंत वाढला होता. भारतातील सर्वात मोठा इक्विटी फंड असूनही, पराग पारिख फ्लेक्सी कॅपने आपला पोर्टफोलिओ सुटसुटीत ठेवला आहे. पोर्टफोलिओमध्ये केवळ ३० कंपन्यांचा समावेश असतो. एकंदरीत पाहता, हा फंड देशांतर्गत आणि परदेशातील समभागांचे उत्कृष्ट संतुलन राखणारा आणि कायम जोखीम नफा गुणोत्तराबाबत जागरूक असणारा फंड आहे. पुढील पाच वर्षे विनाखंड ‘एसआयपी’ केल्यास निश्चितच चांगल्या कामगिरीचे परिणाम दिसण्याची शक्यता आहे. सखोल संशोधनातून २०१४ मध्ये गवसलेले हे माणिक ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’च्या वाचकांच्या भेटीला आणले. मागील १२ वर्षांचा या फंडाचा प्रवास पाहून या फंडाचे वर्णन समर्थांच्या शब्दात करायचे तर ‘उत्कट भव्य तेंचि घ्यावे | मिळमिळत अवघेंचि टाकावें |’ असे समर्पकपणे म्हणावेसे वाटते.