एकल पालकत्व निभावणाऱ्या पालकांच्या कठोर परिश्रम, आणि त्याग यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २१ मार्च हा दिवस राष्ट्रीय एकल पालक दिन म्हणून साजरा केला जातो. एकल पालक कोणी आनंदाने निभावत नाही. या आव्हानाला सामोरे जातांना तुमच्या मुलांसाठी भावनिक आणि आर्थिक जबाबदाऱ्या निभावाव्या लागतात. एकल पालक म्हणून, पैशांचे व्यवस्थापन करणे गुंतागुंतीचे असू शकते. मात्र तुमच्या विशिष्ट आर्थिक परिस्थितीत बदललेल्या पालकत्वासाठी आर्थिक नियोजनाच्या काही सोप्या नियमांचा वापर करून तुमचे आणि मुलांचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करू शकता. विविध बचत आणि गुंतवणूक पर्यांयांचा वापर करून हे शक्य आहे. एकल पालक या नात्याने, तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि ती पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या संसाधनांबद्दल स्पष्टता असणे आवश्यक आहे.
एकल पालकत्व निभावतांना एकल पालकांसाठी पहिले आर्थिक उद्दिष्ट म्हणजे, त्यांच्या मासिक आणि वार्षिक खर्च आणि उत्पन्न यांचे तपशीलवार अंदाजपत्रक तयार करणे. तुमच्या आवक आणि जावक यांच्यात मोठा फरक असल्यास उत्पन्न वाढविणे (एखादी अर्धवेळ नोकरी स्वीकारणे) आणि अवास्तव खर्च कसे कमी करणे आवश्यक आहे. कौटुंबिक खर्च करताना अंदाजपत्रकापासून होते की नाही हे तपासावे लागेल. घरच्या खर्चात मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाची वैद्यकीय खर्च आणि मुख्य म्हणजे किती बचत करायची हे ठरविणे आवश्यक आहे. तुमच्या मुलांच्या भविष्यातील खर्चाचा अंदाज लावला पाहिजे आणि ते खर्चाची पुरेशी तरतूद करतांना किती बचत करायला हवी हे माहित असणे आवश्यक आहे. वैद्यकीय आणि शैक्षणिक खर्च यांचा महागाई दर सामान्य महागाई दरापेक्षा अधिक असतो. मुलांच्या शिक्षणाइतकेच तुमच्या निवृत्तीनंतरचा उदरनिर्वाह देखील तितकाच महत्त्वाचा आहे.
जगात सर्व गोष्टींसाठी कर्ज मिळते परंतु सेवानिवृत्तीच्या खर्चासाठी कोणीही कर्ज देत नाही. तुमच्या मुलांच्या स्वप्नांसाठी पैसे वाचवितांना मुलांना वस्तुस्थितीची जाणीव करून देणे आवश्यक आहे. आर्थिक नियोजन आणि शिस्तीच्या काही मूलभूत नियमांचे पालन करून, तुम्ही तुमची सर्व आर्थिक उद्दिष्टे साध्य करू शकता. तुम्ही ‘सिंगल मदर’ किंवा ‘सिंगल फादर’ असाल तर तुमच्या गरजा वेगवेगळ्या असतात. यासाठी तयारी करणे आवश्यक आहे.आर्थिक नियोजनाची सुरुवात मुदत विमा अर्थात ‘टर्म इन्श्युरन्स’ने करणे हे एकल पालकांसाठी अपरिहार्य आहे. परवडणाऱ्या विमा हप्त्यात मोठे विमा छत्र देणारे हे उत्पादन आहे. या योजनेला ‘इन्कम रिप्लेसमेंट’ योजना म्हणून ओळखले जातात. ‘टर्म इन्श्युरन्स’अंतर्गत मिळणारा ‘डेथ बेनिफिट’ तुमच्या मुलासाठी खूप मदत करू शकतात. जेव्हा तुम्ही त्यांच्या खर्चाची काळजी घेण्यास नसता तेव्हा हा ‘टर्म इन्श्युरन्स’ कामाला येतो. पुढील पायरी ही आरोग्य विम्याची आहे. एखाद्या गंभीर आजारात बऱ्याचदा आपण केलेली मोठी बचत खर्च होते. हे टाळण्यासाठी पुरेसा आरोग्य विमा असणे आवश्यक आहे.
एकल पालकांसाठी आर्थिक नियोजनातील टप्पे
पालकांसाठी आर्थिक नियोजन करताना आर्थिक उद्दिष्टे आणि सध्यस्थिती यांच्यातील तफावत कमी होईल याची खात्री करायला हवी.भविष्यासाठी योजना करामुलाला वाढवितांना, त्यांच्या भविष्याची स्वप्ने पाहताना मोठी जबाबदारी एकल पालकांवर येते. आपण एकटे आहोत, या जाबादारीचे ओझे अनेक पटींनी वाढते. जेव्हा तुम्ही त्यांना आयुष्यात प्रगती करताना, त्यांची स्वप्ने पूर्ण करताना पाहता तेव्हा त्यांच्या आकांक्षांसाठी आर्थिक तरतूद करतांना पुरेसे आर्थिक बळ असणे आवश्यक आहे. पालक या नात्याने, मुख्य ध्येयांमध्ये मुलासाठी चांगले शिक्षण, त्यांच्या व्यावसायिक प्रवासासाठी काही योजना आणि आवश्यक असल्यास त्यामधून नियमित उत्पन्न मिळवणे गरजेचे आहे.
आर्थिक गरजांबद्दल स्पष्टता आवश्यक
आर्थिक नियोजन हे नेहमीच त्यावेळी उपलब्ध स्त्रोतांवर अवलंबून असते. अल्प मुदतीच्या, मध्यम मुदतीच्या आणि दीर्घकालीन आर्थिक गरजांबद्दल स्पष्ट असले पाहिजे. गृहकर्जासारखी कोणतीही आधी घेतलेली कर्जे कोणत्या वेळेत पूर्ण केली जातील, हे देखील तुम्ही ओळखले पाहिजे. तुमच्या कामकाजाच्या जीवनाचा अपेक्षित कालावधी लक्षात घेता, निवृत्तीनंतर पुरेसा निधी असणे आवश्यक आहे.
विविध गुंतवणुकीचे पर्याय पहा
एकल पालकांसाठी आर्थिक नियोजनाची पुढील पायरी म्हणजे विविध आर्थिक उत्पादनांचा शोध घेत आपल्या जोखीम क्षमतेनुसार पर्यांयांची निवड करणे आणि तुमच्या विशिष्ट आर्थिक उद्दिष्टांसाठी त्यांची उपयोगिता समजून घेणे. उदाहरणार्थ, जर मूल शाळेत असेल प्राथमिक शाळेत असेल तर तुम्ही त्याच्या उच्च शिक्षणाच्या खर्चासाठी मुदत ठेवी नव्हे तर म्युच्युअल फंडांच्या समभागसंलग्न योजनांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
तुमच्या गुंतवणुकीत विविधता आणा
जमा खर्च आणि आर्थिक शिस्त हे आत्मनिर्भरतेच्या दिशेने प्रवासासाठी टाकलेले पहिले पाऊल आहे. तुम्ही सर्व स्त्रोतांकडून तुमच्या उत्पन्नाचा अंदाज लावला पाहिजे आणि एकूण मासिक खर्चाची यादी करा. आवेगपूर्ण खर्च टाळून शक्य तितकी अधिक बचत करा. आथिर्क नियोजनात निवडलेल्या बचत आणि गुंतवणुकीच्या मार्गांमध्ये तुम्ही पुरेसे विभाजन केले पाहिजे आणि त्याचा सातत्याने मागोवा घेतला पाहिजे.एकल पालकांना आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एका मार्गदर्शकाची गरज असते. तथापि, आपल्या आर्थिक सवयी आणि शिस्त असणे महत्त्वाचे आहे. आवश्यक असल्यास, तुम्ही व्यावसायिक सल्लागारांचा सल्ला घेऊ शकता आणि अधिक कार्यक्षमतेने तुमचे आर्थिक व्यवस्थापन करू शकता. व्यावहारिक आर्थिक नियोजन आणि खर्चांवरील नियंत्रण एकल पालकत्व सुसह्य करू शकते.