अलेम्बिक लिमिटेड
(बीएसई कोड ५०६२३५)
प्रवर्तक: चिरायू अमीन
वेबसाइट: http://www.alembiclimited.com
बाजारभाव: रु. १०१/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: रियल इस्टेट / ऊर्जा
भरणा झालेले भागभांडवल: रु. ५१.३६ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ७०.८८
परदेशी गुंतवणूकदार १.७८
बँक/ म्यु. फंड/ सरकार ०.०६
इतर/ जनता २७.२८
पुस्तकी मूल्य: रु. ८७.५
दर्शनी मूल्य: रु. २/-
लाभांश: ३५%
प्रति समभाग उत्पन्न: रु. १२.२
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ८.२६
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३१.५
डेट इक्विटी गुणोत्तर: ००
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ६६.६
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड (ROCE): ४.८१
बीटा : १.३
बाजार भांडवल: रु. २,५९६ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १६९/७८
गुंतवणूक कालावधी: २४ महिने
अलेम्बिक लिमिटेड ही फार्मास्युटिकल्स, स्थावर आणि ऊर्जा मालमत्तांच्या व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनीची सुरुवात १९०७ मध्ये अलेम्बिक समूहाची प्रमुख कंपनी म्हणून झाली. २०१० मध्ये, कंपनीने तिचा मुख्य औषध व्यवसाय (फॉर्म्युलेशन) अलेम्बिक फार्मा लिमिटेडमध्ये विलग केला आणि विलगीकरणानंतर, तीच अलेम्बिक समूहाची प्रमुख कंपनी बनली.
अलेम्बिक लिमिटेडचा अलेम्बिक फार्मा लिमिटेडमध्ये २८.४१ टक्के आणि पौषक लिमिटेडच्या या दुसऱ्या उपकंपनीत १९.०१ टक्के हिस्सा आहे.
व्यवसाय विभाग
(अ) रियल इस्टेट : विलगीकरणानंतर अलेम्बिक बांधकाम आणि स्थावर मालमत्ता (रियल इस्टेट) क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीचे बडोदे आणि बंगळूरु येथे निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प असून ती व्यावसायिक मालमत्ता भाडेपट्ट्यानेदेखील देते. पूर्ण झालेल्या निवासी प्रकल्पांमध्ये संसारा, वेद, बडोद्यातील शांग्रीला आणि बेंगळूरुमधील अर्बन फॉरेस्ट प्रकल्प यांचा समावेश आहे. कंपनीच्या बडोद्यातील अलेम्बिक सिटी टाउनहाऊस २४ आणि व्हिलासारख्या अपस्केल प्रीमियम निवासी प्रकल्पांनीदेखील आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ताबा देणे सुरू केले आहे. चालू असलेल्या प्रकल्पांमध्ये येथील वेदा-II आणि कियारा यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त कंपनीकडून आयटी, आयटीईएस, केपीओ, बीपीओ, अभियांत्रिकी, रसायने, किरकोळ विक्री, बीएफएसआय आणि एफ अँड बीसारख्या क्षेत्रातील कॉर्पोरेट, व्यावसायिक घरे, एचएनआय इत्यादींना व्यावसायिक मालमत्ता भाड्याने देते.
कंपनीने बडोदा येथे अलेम्बिक आर्ट डिस्ट्रिक्टची स्थापना केली आहे, त्यात आर्ट स्टुडिओ, एक प्रदर्शन जागा, एक संग्रहालय, रेस्टॉरंट्स आणि एक स्केट पार्क समाविष्ट आहे.
भविष्यातील योजना
कंपनीचा द पार्क क्रेसेंट नावाचा ३ बीएचके आणि ४ बीएचके कॉन्फिगरेशनसह आणखी एक गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्याची योजना आहे. ते हाय-स्ट्रीट रिटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स आणि मनोरंजन क्षेत्रे समाविष्ट करणारे मिश्र-वापर प्रकल्पदेखील सक्रियपणे विकसित करत आहे.
(ब) एपीआय (ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडिएंट्स): जॉब-वर्क आधारावर फार्मास्युटिकल इंटरमीडिएट्स आणि जेनेरिक एपीआय (मोठ्या प्रमाणात औषधे) सारखे एस्टोलेट, बायफेनिल व्हॅलाइन ऑक्सलेट, फ्लुओक्सेटीन इत्यादींचे उत्पादन करते. कंपनी या विभागात जॉब-वर्कदेखील करते.
ऊर्जा मालमत्ता
कंपनीकडे एकूण ५ मेगावाॅट क्षमतेच्या चार पवनचक्क्या असून, औषध व्यवसायाच्या कॅप्टिव्ह वापरासाठी त्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. कंपनीचे एकूण ६ मेगावाॅट क्षमतेचे दोन सह-निर्मिती वीज प्रकल्प आहेत.
कंपनीचे मार्च २०२५ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. कंपनीने गेल्या तिमाहीत, डिसेंबर २०२४ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. उलाढालीत ४८ टक्के वाढ साध्य करून ती ५८ कोटींवर गेली तर नक्त नफ्यात फारशी वाढ न होता तो होऊन ६५ कोटींवर गेला आहे. कंपनीचा अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेडमध्ये २८.५ टक्के तर पौषक लिमिटेडमध्ये १९ टक्के हिस्सा आहे. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीला लाभांश उत्पन्नापोटी ४५ कोटी रुपये मिळाले होते.
कुठलेही कर्ज नसलेली आणि उत्तम गुंतवणूक पोर्टफोलिओ असणारी अलेम्बिक लिमिटेड एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून योग्य वाटते.
शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्या टप्प्यात शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
stocksandwealth@gmail.com
हा लेख एक अभ्यासपूर्ण विवेचन असून गुंतवणूक सल्ला नव्हे.
प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १ टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.