अल्केम लॅबॉरेटरीज लिमिटेड (बीएसई कोड ५३९५२३) अल्केम लॅबॉरेटरीज लिमिटेड ही भारतातील एक अग्रगण्य औषध निर्माण कंपनी आहे. वर्ष १९७३ मध्ये स्थापन झालेल्या कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून कंपनी विविध प्रकारच्या औषधांच्या संशोधन, उत्पादन आणि जागतिक वितरणांत कार्यरत आहे. अल्केम लॅबॉरेटरीज उत्पादन घेत असलेल्या औषधांमध्ये अँटिबायोटिक्स, अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-डायबेटिक, कार्डिओव्हॅस्क्युलर, न्युरोलॉजिकल आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल औषधे समाविष्ट आहेत. भारतातील आघाडीच्या दहा औषधी कंपन्यांमध्ये सातत्याने स्थान टिकवणाऱ्या, अल्केमच्या पोर्टफोलिओमध्ये ८०० हून अधिक नाममुद्रा असून त्यांत क्लॅव्हम, पॅन, पॅन-डी, ओण्डेम, सनराइज डी-३, झोन, सुमो, झोसेफ, पिप्झो, स्विच, झोन एक्सपी आणि टॅक्सिम-ओसारख्या प्रसिद्ध नाममुद्रा समाविष्ट आहेत. जी भारतातील आघाडीच्या ५० औषधी नाममुद्रांमध्ये समाविष्ट आहेत. अल्केमच्या भारतात दमण, बद्दी, इंदूर आणि सिक्किम येथे एकूण १९ उत्पादन सुविधा आहेत तर अमेरिकेत दोन प्रकल्प आहेत. कंपनीत सुमारे २१,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. अल्केम लॅबॉरेटरीजची उत्पादने ५० हून अधिक देशांमध्ये निर्यात होतात. ज्यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशांचा समावेश आहे. कंपनीच्या एकूण विक्रीपैकी आंतरराष्ट्रीय विक्रीचा वाटा महत्त्वपूर्ण आहे.
उत्पादन पोर्टफोलिओ ब्रँडेड जेनेरिक्स, जेनेरिक औषधे, एपीआय, न्यूट्रास्युटिकल्स, बायोसिमिलर्सचा कंपनीचा पोर्टफोलिओ आहे. पहिल्या दहा कंपन्यांमध्ये स्थान राखून असलेल्या अल्केमने संसर्गविरोधी, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल, वेदना व्यवस्थापन, जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक घटक विभागांमध्ये मजबूत बाजारपेठेसह तीव्र थेरपीमध्ये नेतृत्वस्थान स्थापित केले आहे.
संशोधन आणि विकास कंपनीची भारत आणि अमेरिकेत पाच संशोधन आणि विकास केंद्रे आहेत, ज्यामध्ये ५०० हून अधिक वैज्ञानिक कार्यरत आहेत. ही केंद्रे नवीन औषधांच्या संशोधन आणि विकासासाठी कार्य करतात, ज्यामुळे कंपनीची स्पर्धात्मकता वाढते. अल्केम आपल्या उत्पन्नाच्या ५-६ टक्के रक्कम जेनेरिक्स, बायोसिमिलर, सक्रिय औषध घटक (एपीआय) आणि न्यूट्रास्युटिकल उत्पादनांच्या विकासासाठी संशोधन आणि विकासावर खर्च करते. कंपनीचे डिसेंबर २०२४ अखेर समाप्त तिमाहीचे निकाल जाहीर झाले असून या कालावधीत तिने ३,३७४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ६२५.८ कोटींचा नक्त नफा कमावला आहे. अनुभवी प्रवर्तक, आघाडीचा ब्रँड पोर्टफोलियो, सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखविणारी, अल्प बिटा असणारी आणि कुठलेही कर्ज नसलेली, अल्केम लॅबॉरेटरीज अस्थिर बाजारात तुमच्या पोर्टफोलियोला आधार देऊ शकेल.
शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो. म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
प्रवर्तक: बासुदेव सिंग संकेतस्थळ : http://www.alkemlabs.com
बाजारभाव: रु.५,००१/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: फार्मास्युटिकल्स
भरणा झालेले भाग भांडवल: रु. २३.९१ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५५.६६
परदेशी गुंतवणूकदार १०.१४
बँक/ म्युच्युअल फंड / सरका १८.०१
इतर/ जनता १६.१९
पुस्तकी मूल्य: रु. ९६१
दर्शनी मूल्य: रु.२/-
लाभांश: २०००%
प्रति समभाग उत्पन्न: रु. १८० किंमत उत्पन्न गुणोत्तर: २७.७
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३१.३
डेट इक्विटी गुणोत्तर: ००
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: २१.९
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई): १९.७%
बीटा : ०.५
बाजार भांडवल: रु. ५९,८३७ कोटी (लार्ज कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ६,४४०/४,४०७
गुंतवणूक कालावधी: २४ महिने
अजय वाळिंबे
stocksandwealth@gmail.com
हा लेख एक अभ्यासपूर्ण विवेचन असून गुंतवणूक सल्ला नव्हे
प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १ टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.