करदात्याला विवरणपत्र दाखल करणे सुलभ जावे, यासाठी मागील काही वर्षांपासून वार्षिक माहिती अहवाल (एआयएस) करदाता प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर बघू शकतो. या अहवालातील माहितीच्या आधारे करदात्याला त्याच्या आर्थिक व्यवहारांची माहिती मिळते. या अहवालात २६ एएसमध्ये असलेली उद्गम कर (टीडीएस) आणि गोळा केलेला कर (टीसीएस) याची माहिती तर असतेच. शिवाय व्याज, लाभांश, म्युच्युअल फंडातील युनिटची खरेदी आणि विक्री, मोठ्या व्यवहारांची माहितीसुद्धा असते. या अहवालातील माहितीमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या सुधारण्याची तरतूददेखील आहे. करदाता विवरणपत्र दाखल करताना या माहितीचा आधार घेऊ शकतो.
प्रश्न : माझा वैद्यकीय व्यवसाय आहे. माझ्या व्यवसायाचे उत्पन्न वार्षिक ३० लाख रुपये इतके आहे. मला लेखे ठेवणे आणि लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक आहे का? मला कोणते लेखे ठेवणे बंधनकारक आहे? – स्मिता वैद्य
उत्तर : ठरावीक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी (म्हणजे वैद्यकीय व्यवसाय करणारे, वकील, सनदी लेखाकार, वास्तुविशारद, अभियंता, अंतर्गत सजावटकार, सिनेकलाकार, वगैरे) मागील तीन वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षातील व्यवसायाची वार्षिक उलाढाल दीड लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना लेखे ठेवणे बंधनकारक आहे. लेखे कोणते ठेवावे हे प्राप्तिकर नियम ६ एफमध्ये नमूद केले आहे. नियमित लेख्यांच्या व्यतिरिक्त वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना फॉर्म ३ सी रजिस्टर आणि औषध साठ्याची नोंद ठेवणे बंधनकारक आहे. लेखापरीक्षणासाठी त्या वर्षाची उलाढाल किंवा जमा ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर लेखापरीक्षण बंधनकारक आहे. ज्या व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांनी नफा ५० टक्क्यांपेक्षा कमी दाखविला असेल तर त्यांना ४४ एडीए या कलमानुसार लेखापरीक्षण करून कलम ४४ एबीप्रमाणे अहवाल दाखल करणे बंधनकारक आहे. ज्या व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांनी ४४ एडीएप्रमाणे अनुमानित कराच्या तरतुदीनुसार नफा ५० टक्क्यांपेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्त दाखविला असेल, तर त्यांना लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक नाही आणि लेखे ठेवणेसुद्धा बंधनकारक नाही. ज्या व्यावसायिकाची रोखीने मिळालेली जमा एकूण जमेच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर त्यांच्यासाठी ही ५० लाख रुपयांची मर्यादा ७५ लाख रुपये इतकी असेल.
प्रश्न : मी एका कंपनीत नोकरी करतो. मला १५ लाख रुपयांचा पगार मिळतो. याव्यतिरिक्त माझा एक छोटा व्यवसायसुद्धा आहे. या व्यवसायात मला १ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. मी जुनी करप्रणाली स्वीकारल्यास हा तोटा मला पगाराच्या उत्पन्नातून वजा करता येईल का? – संदीप कारेकर
उत्तर : ‘उद्योग-व्यवसा’ या उत्पन्नाच्या स्रोतात झालेला तोटा हा पगाराच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही. करदात्याने कोणतीही करप्रणाली (नवीन किंवा जुनी) स्वीकारली तरी उद्योग-व्यवसायातील तोटा हा पगारातील उत्पन्नातून वजा करता येत नाही.
प्रश्न : मी एका सूचिबद्ध कंपनीचे ५०० समभाग २०१२ मध्ये खरेदी केले होते. या समभागावर मला २०१५ मध्ये ५०० समभाग आणि २०१९ मध्ये १,००० बक्षीस समभाग (बोनस) मिळाले. हे सर्व २,००० समभाग मी मे २०२४ मध्ये शेअरबाजारामार्फत विकले. मला यावर कर भरावा लागेल का? -प्रकाश भोसले
उत्तर : बक्षीस समभागासाठी गुंतवणूकदाराला पैसे द्यावे लागत नाहीत. त्यासाठी त्याचे खरेदी मूल्य शून्य समजून अल्प किंवा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा गणावा लागतो. बक्षीस समभाग मिळाल्यानंतर ते १२ महिन्यांनंतर विकल्यास त्यावर होणारा भांडवली नफा दीर्घ मुदतीचा असेल आणि १२ महिन्यांच्या आत विकल्यास होणारा भांडवली नफा अल्प मुदतीचा असेल. सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागाच्या विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्यावरील कराच्या तरतुदीत १ फेब्रुवारी, २०१८ नंतर बदल झाला. आपण जे २,००० समभाग विकले ते आपल्याला दोन भागांत विभागावे लागतील, एक म्हणजे ३१ जानेवारी, २०१८ पूर्वी खरेदी केलेले किंवा बक्षीस जाहीर झालेले समभाग आणि दुसरे म्हणजे १ फेब्रुवारी, २०१८ नंतर जाहीर झालेले बक्षीस समभाग. जे समभाग ३१ जानेवारी २०१८ पूर्वी खरेदी केले आहेत (ज्यावर सिक्युरिटीज उलाढाल कर, एसटीटी भरला गेला असेल तर) आणि जे बक्षीस समभाग ३१ जानेवारी, २०१८ पूर्वी जाहीर झाले असतील त्यांच्या विक्रीवरील भांडवली नफा गणताना त्याचे खरेदी मूल्य पुढील (१) आणि (२) मधील जे जास्त आहे. ते (१) शेअरचे खरेदी मूल्य (बोनस समभागासाठी शून्य), आणि (२) (अ) ३१ जानेवारी, २०१८ रोजीचे वाजवी बाजार मूल्य (खरेदी केलेले व बोनस समभाग धरून), आणि (ब) विक्री मूल्य, या (अ) आणि (ब) मधील जे कमी आहे ते. यानुसार खरेदी मूल्य गणून दीर्घ मुदतीचा भांडवली नफा गणावा लागेल. जे बोनस समभाग १ फेब्रुवारी, २०१८ नंतर मिळाले आहेत, त्यांच्यासाठी त्याच्या विक्रीवर भांडवली नफा गणताना खरेदी मूल्य शून्य समजावे लागते. अशा समभागाच्या विक्रीवर झालेल्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कलम ११२ अ नुसार कर भरावा लागेल. १ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर १० टक्के इतक्या सवलतीच्या दराने (अधिक ४ टक्के शैक्षणिक अधिभार) कर भरावा लागेल.
प्रश्न : माझ्याकडे गावी एक व्यावसायिक जमीन आहे. ही जमीन मी २००४ साली खरेदी केली होती. ही जमीन मी विकण्याचा विचार करत आहे. या विक्रीवर मला ६० लाख रुपयांचा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा होणे अपेक्षित आहे. या नफ्यावरील कर मला वाचविता येईल का? – एक वाचक
उत्तर : व्यावसायिक जमीन विकल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा करपात्र असतो. अशा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी प्रामुख्याने दोन पर्याय आहेत. एक म्हणजे कलम ५४ ईसीनुसार रोख्यांमध्ये पैसे गुंतविणे आणि १ दुसरा पर्याय कलम ५४ एफनुसार नवीन घरात पैसे गुंतविणे. कलम ५४ ईसीनुसारचे रोखे ५ वर्षांचे असतात. ही गुंतवणूक आपल्याला जमीन विक्रीच्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आत करावी लागते. या रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा ५० लाख रुपये इतकीच आहे. बाकी रकमेवर कर भरावा लागेल. दुसरा पर्याय म्हणजे काही अटींची पूर्तता केल्यास कलम ५४ एफनुसार नवीन घरात गुंतवणूक करून कर सवलत घेता येते. या कलमानुसार या संपूर्ण संपत्तीची विक्री रक्कम (विक्री खर्च वजा जाता) नवीन घरात गुंतविल्यास अशा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागत नाही. परंतु संपूर्ण विक्री रकमेपेक्षा (विक्री खर्च वजा जाता) कमी रक्कम नवीन घरात गुंतविल्यास प्रमाणात वजावट मिळते. या कलमानुसार एक अट आहे की, करदात्याकडे एका घरापेक्षा जास्त घरे (नवीन घर सोडून) नसली पाहिजेत. नवीन घरात गुंतवणूक, जमीन विक्रीच्या एक वर्ष आधी किंवा पुढील दोन वर्षांत (घर खरेदी केल्यास) किंवा पुढील तीन वर्षांत (घर बांधल्यास) करणे बंधकारक आहे. ज्या वर्षात जमीन विकली आहे, त्या वर्षाचे विवरणपत्र भरण्याच्या मुदतीपूर्वी नवीन घर न घेतल्यास भांडवली नफ्याएवढी रक्कम ‘कॅपिटल गेन स्कीम, १९८८’ नुसार बँकेत खाते उघडून जमा करणे बंधनकारक आहे.
प्रवीण देशपांडे
pravindeshpande1966@gmail.com