गुंतवणूकदारांसाठी भांडवली बाजारात पैसे कमावण्याचे जे प्रमुख मार्ग आहेत, त्यात अल्पकाळासाठी शेअर खरेदी करून ते पुन्हा विकणे अर्थात ‘ट्रेडिंग’ या माध्यमातून कमाई करणे किंवा दीर्घकालीन गुंतवणूक करून मोठा नफा कमवणे आणि आपला पोर्टफोलिओ समृद्ध होताना बघणे हे दोन मार्ग सर्वमान्य आहेत. मागील महिन्यातील लेखात कंपनीचे व्यवसाय प्रारूप (बिझनेस मॉडेल) आणि त्यामुळे होणारा कंपनीच्या शेअरवरील परिणाम याविषयी आपण समजून घेतले. आजच्या लेखांमध्ये आपण चर्चा करणार आहोत, ती शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना घसघशीत धनलाभाचे योग आणणाऱ्या काही घटनांविषयी.
तुम्ही एखाद्या कंपनीचे बऱ्याच वर्षांपासून भागधारक (शेअर होल्डर) असाल तर कंपनीच्या नफ्याच्या हिशेबामध्ये तुम्हाला लाभांश तर दिला जातोच. मात्र जसजशी कंपनी घवघवीत यश संपादन करते तसतसे भागधारकांना आपल्या नफ्यातील हिस्सा देण्यासाठी कंपनीतर्फे वापरला जाणारा हमखास मार्ग म्हणजे शेअरची पुनर्खरेदी अर्थात ‘बायबॅक ऑफर’ होय. याविषयी थोडक्यात सांगायचे झाल्यास कंपनी बाजारात नव्याने दाखल होताना प्रारंभिक समभाग विक्रीच्या अर्थात आयपीओच्या माध्यमातून शेअर विकते आणि लोकांकडून भांडवली रूपात निधी उभारते. याउलट शेअरच्या पुनर्खरेदीत भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपनी सध्या बाजारात शेअरचा जो भाव चालला आहे, त्यापेक्षा अधिक भावाने आपल्याच कंपनीचे शेअर भागधारकांकडून खरेदी करते. या पुनर्खरेदीसाठी एक निश्चित कालावधी ठरवला जातो. भागधारकांच्या सभेमध्ये आणि कंपनीच्या संचालक मंडळाने हिरवा कंदील दिल्यावर ही प्रक्रिया पार पाडण्यात येते.
हेही वाचा – Money Mantra: प्रश्न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचे: एनएव्ही म्हणजे काय व ती कसी ठरविली जाते?
‘बायबॅक’साठी निधी कुठून येतो ?
कंपन्यांच्या दरवर्षीच्या नफ्यातील भागधारकांना दिला जाणारा लाभांश वगळता उरलेला नफा कंपनीकडे राखीव गंगाजळीच्या स्वरूपात साठलेला असतो. त्यातील पैसे वापरून कंपनी शेअर्सची पुनर्खरेदी करते.
पुनर्खरेदीचा गुंतवणूकदारांना फायदा कसा होतो ?
कंपन्यांकडून शेअर बायबॅक केले जाण्याची अनेक कारणे आहेत. बऱ्याचदा कंपन्यांच्या ताळेबंदात रग्गड राखीव गंगाजळी असते. बाजार नियंत्रक ‘सेबी’च्या नियमानुसार, एका ठरावीक कालावधीत कंपन्यांना शिल्लक गंगाजळीचा विविध कार्यासाठी, गुंतवणुकीसाठी किंवा कंपनीच्या विस्तारासाठी वापर करावाच लागतो आणि त्या व्यतिरिक्तदेखील ठरावीक काळ कंपनीकडे अतिरिक्त निधी पडून असल्यास कंपनीला लाभांशाच्या माध्यमातून भागधारकांमध्ये तो वितरित करावा लागतो. शिवाय लाभांश वितरण करपात्र ठरविले गेल्यापासून, ताळेबंदात रग्गड राखीव गंगाजळी असलेल्या कंपन्यांकडून भागधारकांच्या पदरी लाभ पोहोचविताना, लाभांशापेक्षा समभागांच्या अधिमूल्यासह पुनर्खरेदीचा मार्ग अनुसरला जातो. शेअर बायबॅकमुळे भागधारकांना दुहेरी फायदा होतो. तो म्हणजे बऱ्याचदा बाजारात समभागाची किंमत कमी असते आणि त्यावेळी कंपनी बायबॅकच्या माध्यमातून बाजार किमतीपेक्षा अधिक किमतीला समभाग खरेदी करते. याचबरोबर बाजारातील समभागांची संख्या कमी होणार असल्याने लवकरच कंपनीच्या समभागाची किंमत वरच्या दिशेने जाण्याची शक्यता वाढते. आपण एका उदाहरणातून हा मुद्दा समजून घेऊया. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीने २०१७, २०१८, २०२० आणि २०२२ अशी चार वेळा भागधारकांसाठी बायबॅक योजना आणली.
वर्ष – टीसीएसचे ‘बायबॅक’ मूल्य
२०१७ – १६,००० कोटी रुपये
२०१८ – १६,००० कोटी रुपये
२०२० – १६,००० कोटी रुपये
२०२२ – १८,००० कोटी रुपये
पहिल्या वर्षी (२०१७) समभाग पुनर्खरेदीची किंमत २,८५० रुपये प्रति समभाग, तर २०१८ मध्ये टीसीएसने प्रति समभाग २,१०० रुपये, २०२० मध्ये ३,००० रुपये प्रतिसमभाग आणि २०२२ मध्ये ४,५०० रुपये प्रतिसमभाग एवढी होती. २०२२ मध्ये जेव्हा कंपनीने बायबॅक योजना जाहीर केली त्यादिवशी ‘टीसीएस’चा बाजार भाव ३,७०० रुपये होता आणि बायबॅकची किंमत ४,५०० रुपये प्रति समभाग एवढी ठरवली गेली होती. अर्थात म्हणजेच गुंतवणूकदारांना त्यावेळी २० टक्के अधिमूल्य प्राप्त झाले.
गुंतवणूकदारांसाठी आणखी आकर्षक बाब म्हणजे बायबॅकद्वारे भागधारकांना जो लाभ होतो तो प्राप्तिकरातून मुक्त आहे. अर्थातच कंपनी बायबॅकची प्रक्रिया पूर्ण करताना आवश्यक तो कर भरूनच गुंतवणूकदारांना पैसे परत करत असते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आणखी एक आघाडीची कंपनी ‘विप्रो’नेसुद्धा आपल्या भागधारकांना बायबॅकचे लाभ मिळवून दिले आहेत. यावर्षी एप्रिल महिन्यात कंपनीने बायबॅकची घोषणा केली. एकूण १२,००० कोटी रुपयांचे समभाग कंपनीने खरेदी केले. यापूर्वी २०२०, २०१९ या वर्षांमध्ये कंपनीने बायबॅक योजना आणली होती. कंपनी बायबॅकची घोषणा करून एक प्रकारे भागधारकांना आणि बाजारातील गुंतवणूकदारांना कंपनी सशक्त आहे असा संदेश देत असते. म्हणजेच कंपनीचा तिचा व्यवसायावर विश्वास असून कंपनी भविष्यात अधिक चांगली कामगिरी करेल, असा संदेशदेखील कंपनी देत असते. यामुळे इतर गुंतवणूकदारदेखील कंपनीच्या समभागाकडे आकर्षित होऊन समभाग खरेदी करतात आणि मागणी वाढल्यामुळे कंपनीच्या समभागाची किंमतदेखील वधारते. भांडवली बाजारात कंपनीच्या समभागांची संख्या (फ्री फ्लोट) खूप जास्त असेल आणि त्यामुळे समभागाच्या किमतीत हालचाल खूप धीमी असेल किंवा समभागाच्या किमतीतील वृद्धी कमी असेल तर कंपन्या बाजारातील उपलब्ध समभागांची संख्या कमी करतात. ज्यामुळे बाजारात समभाग संख्या घटल्याने किंमत वधारण्यासाठी मदत होऊ शकते. आता आगामी काळात लार्सन टुब्रो लिमिटेड, बीएसई या कंपन्यांनी बायबॅकची घोषणा केली आहे. आरती ड्रग्स लिमिटेड ही औषध आणि रसायने बनवणाऱ्या क्षेत्रातील कंपनी असून २०१६ पासून आजपर्यंत तब्बल चार वेळा कंपनीने बायबॅकची योजना राबवली आहे.
अलीकडील काळात समभागधारकांना आकर्षक फायदा कमावून देणारी योजना म्हणजे कंपन्यांनी आपला व्यवसाय वेगळा काढून बाजारात सूचिबद्ध करणे ही आहे. आकाराने महाकाय असलेल्या कंपन्या आपल्या उद्योगातील मूल्य वाढावे यासाठी आपल्या उपकंपन्या वेगळ्या करून त्या बाजारामध्ये आणतात. ‘आयटीसी’ या कंपनीने ‘आयटीसी हॉटेल्स’ ही कंपनी वेगळी काढून बाजारात सूचिबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपनीने ‘रिलायन्स जिओ फायनान्शियल’ ही आपली कंपनी वेगळी केली आहे. लवकरच तिचा समभागदेखील भांडवली बाजारात दाखल होईल.
हेही वाचा – वित्तरंजन : खणखणीत नाणे; पण जुने!
शेवटी दोन छोट्या गोष्टी‘लार्सन टुब्रो’ या कंपनीने गेल्या पंधरा वर्षांत चार वेळा बक्षीस समभाग (बोनस शेअर) दिला आहे. ‘आयटीसी’ या कंपनीने गेल्या पंधरा वर्षांत तीन वेळा बोनस शेअर दिला आहे. उत्तम व्यवसाय, दमदार नफा आणि विक्रीतील सातत्य असलेल्या कंपन्या गुंतवणूकदारांना अधिक श्रीमंत करतील यात शंकाच नाही.
‘एचडीएफसी’ आणि ‘एचडीएफसी बँक’ या कंपन्यांचे ‘महाविलीनीकरण’ झाल्यावर २५ एचडीएफसीचे शेअर असलेल्या समभागधारकांना एचडीएफसी बँकेचे ४२ शेअर देण्यात आले. ज्यांनी गेल्या दहा वर्षांत नियमितपणे ‘एचडीएफसी’मध्ये गुंतवणूक करत आपल्या पोर्टफोलिओत मुबलक ‘एचडीएफसी’ साठवून ठेवले असतील त्यांच्यासाठी ‘अधिकमास’ बहरणारा ठरला आहे!
(लेखक अर्थ अभ्यासक आणि वित्तीय मार्गदर्शक आहेत)