आशीष थत्ते

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोठ्या कंपन्यांमध्ये धन्यवाद म्हणायची एक पद्धत असते. म्हणजे कंपनीकडून सुंदर ई-मेल लिहिणे किंवा ‘थँक यू’ नोट लिहिणे किंवा एखादा कागदी ‘स्माईली’ देऊन कृतज्ञता व्यक्त केली जाते, ‘स्माईली’ स्वीकारणारा व्यक्ती आपल्या टेबलावर तो अडकवून ठेवू शकतो. किंबहुना काही कंपन्यांमध्ये वर्षाला असे काही धन्यवाद लिहिणे त्यांच्या वार्षिक कार्यक्रमाचा भाग देखील असतो. आपण देखील आपल्या घरात लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना अधूनमधून धन्यवाद म्हणत असतोच. हल्ली त्यासोबत ‘जादू की झप्पी’ वगैरे देण्याची पद्धत आहे.

मात्र हा लेख तुम्हाला धन्यवाद म्हणायला लिहिला आहे. गेले वर्षभर जो एक वेगळा उपक्रम आम्ही चालवला होता, त्याला तुमच्याकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल सर्व वाचकांचे मनापासून आभार. काहींनी ‘ई-मेल’च्या माध्यमातून किंवा फोन करून कौतुक केले. त्यांचे पुन्हा एकदा खूप धन्यवाद. कदाचित काही ‘ई-मेल’ना उत्तर द्यायचे राहून गेले असेल तर त्यांना देखील आज धन्यवाद. सगळ्यात म्हणजे ‘लोकसत्ता’ परिवाराचे खूप खूप आभार ज्यांनी मला ही संकल्पना लिहिण्याची प्रेरणा दिली.

कित्येक संकल्पना ज्या कॉर्पोरेट क्षेत्रात किंवा लहान-मोठ्या कंपन्यांमध्ये वापरल्या जातात, त्या आपण कळत-नकळत घरात देखील वापरतो. आपण जर त्यांचा अधिक अभ्यास केला तर आपल्याला नक्की त्याचा फायदा होऊ शकतो. गेले वर्षभर व्यवस्थापन, अर्थ आणि वित्त शास्त्रातील संकल्पनांचा विचार केला, ज्या आपण रोजच्या जीवनात वापरतो. जे प्रमेय विचार किंवा संकल्पना आपण वर्षभर शिकलो किंवा त्याची तोंड ओळख करून घेतली त्याचा दैनंदिन जीवनात पुरेपूर फायदा करून घ्या. मी पहिल्या लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे विज्ञान आणि इतर शास्त्रे जी प्रयोगशाळेतून जन्म घेतात त्याचा उपयोग आपण करून घेतो. मात्र सामाजिक शास्त्रांचे मात्र तितकेसे उपयोग (ॲप्लिकेशन्स) जाणतेपणे आपण करून घेत नाही आणि म्हणून या लेखमालेचा विचार केला गेला. ‘अर्थमागील अर्थभान’ या शीर्षकाला न्याय देणारे खूप सारे अभिप्राय देखील प्राप्त झाले, ज्यात वाचकांनी कशाप्रकारे रोजच्या जीवनात व्यवस्थापनातील तत्त्वे जाणते-अजाणतेपणे ते वापरत होते असे सांगितले. ही लेखमाला तुम्हाला आवडली असेल याची मला खात्री आहे. तुमच्या काही सूचना किंवा अजून काही अभिप्राय असतील तर नक्की सुचवा.

पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद, नव्या वर्षांच्या आगाऊ शुभेच्छा आणि पुन्हा भेटूया काहीतरी नवीन घेऊन किंवा कदाचित जुनेच घेऊन पण थोड्या नव्या विचाराने आणि थोडेसे रंजकसुद्धा. अगदी मनोरंजन किंवा चित्तरंजन नसले तरी ‘वित्तरंजन’ होईल याची काळजी आपण घेऊया. पुढच्या सोमवारची नक्की वाट पहा.

@AshishThatte

ashishpthatte@gmail.com

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Professional thank you letter from company thank you note from company thank you notes for business zws